कोट्यवधी भारतीयांच्या आशा-आकांक्षांना पंखांत घेऊन ‘चांद्रयान-२’ अवकाशात झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘चांद्रयान-२’च्या रूपाने भारतीय भूमीवरून अवकाशात सर्वाधिक वजनाचे (३,८७२ किलो) प्रक्षेपण करण्याचाही विक्रम घडला. जगाच्या पाठीवर अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताचे नाव चमकवण्याची कामगिरी यापूर्वीही इस्रोने अनेकवेळा केली आहे. शिवाय अवकाश संशोधनामध्ये भारताचा दबदबाही निर्माण झाला आहे. आता ‘चांद्रयान-२’मुळे थेट चंद्रावर पाऊल टाकण्याकडे वाटचाल केली आहे. रशिया, अमेरिका आणि चीन यांच्यानंतर चंद्रावर यान उतरविणारा भारत हा चौथा देश असेल. पहिल्या उपग्रहाची सामग्री चक्क बैलगाडीवरून आणि सायकलवरून ज्या देशाने वाहून नेली, त्या देशाने थेट चंद्रावर यान पाठविण्यापर्यंत प्रगती केली हे निश्चितच सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. या चांद्रमोहिमेचा उपयोग भविष्यातील अवकाश संशोधनासह नव्या पिढीला प्रोत्साहित करण्यासाठीही होईल.
इस्रोचा भीमपराक्रम
मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्यास बरोबर ५० वर्ष झाली. याचा आनंदोत्सव जगभरात नुकताच साजरा करण्यात आला. आपला भारत देशही कधीतरी चंद्रावर स्वारी करेल, असे त्याकाळी कधी कुणी स्वप्नातही बघितले नसेल, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विक्रम सारभाई यांचा अपवाद वगळता! मात्र आज अवकाश क्षेत्रात भारताने केवळ झेपच घेतलेली नाही तर दबदबाही निर्माण केला आहे. इस्त्रोेची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी झाली. प्रारंभीच्या अवघ्या सहाच वर्षांत ‘आर्यभट्ट’ या उपग्रहाची जुळणी देशातील शास्त्रज्ञांनी यशस्वी करून दाखवली. इस्त्रोेच्या वाटचालीचा हा पहिला टप्पा होता. ‘इन्सॅट’ उपग्रहांची मालिका कार्यरत करणे हा दुसरा आणि १९९० पासून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही) तसेच भूसंकलिक उपग्रह प्रक्षेपण यान (जीएसएलव्ही) पूर्णत: भारतीय संशोधनातून बनवले जाण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनेही इस्त्रोेने स्वत: बनवणे, हा तिसरा टप्पा. त्यानंतर ‘चांद्रयान’ ते ‘मंगलयान’ हा चौथा टप्पा पार पडला. याला व्यावसायिक जोड देण्यासाठी २६ मे १९९९ पासून भारताने अन्य राष्ट्रांचे लहानलहान उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली. इस्रोने आतापर्यंत २८ हून जास्त देशांचे २३९ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्याचा भीमपराक्रम केला आहे.
‘चांद्रयान-१’च्या यशानंतर ११ वर्षांनी ‘चांद्रयान-२’ चे प्रक्षेपण
केवळ परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यातच नाही तर भारताला उपयुक्त ठरेल अशी अवकाश कामिगिरी इस्रो सतत करीत आहे. एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याचा विक्रम देखील इस्त्रोच्याच नावावर कोरला गेला आहे. १०४ पैकी १०१ उपग्रह अमेरिका, जर्मनी, इस्त्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स अशा प्रगत देशांचे होते. विशेष म्हणजे अंतराळ संशोधन क्षेत्रातील दिग्गज समजल्या जाणार्या अमेरिका आणि रशियालाही न जमलेली कामगिरी भारताने करून दाखवली आहे. ऑक्टोबर २००८ मध्ये ‘चांद्रयान’ मोहिम यशस्वीरित्या राबवत चार चांद लावले. इस्रोच्या ‘मंगळयान’ मोहिमेने २०१३ मध्ये जगातील भल्याभल्या शक्तींची झोप उडवली होती. कारण त्यावेळी भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चीनलाही अद्याप मंगळावर स्वारी करणे जमलेले नव्हते. भारताची ही मोहीम यशस्वी होणार नाही, अशी टीकाही केली जात होती. पण हे मंगळयान २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळावर यशस्वीरित्या पोहोचले आणि टीकाकारांची तोंडेही बंद झाली. ‘चांद्रयान-१’च्या यशानंतर ११ वर्षांनी ‘चांद्रयान-२’ चे प्रक्षेपण करण्यात आले. ‘चांद्रयान २’चे प्रक्षेपण हा देशाच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात स्मरणीय घटना ठरेल. भारताच्या स्वदेशी अवकाश कार्यक्रमाला पुढे नेणारे आपले शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे कौतुक करायलाच हवे. या मोहिमेमुळे पृथ्वीच्या भूतकाळाविषयीही माहिती मिळू शकते. चांद्रभूमीवरील विविध मूलद्रव्ये, खनिजे यांचे नेमके मापन करूनच चंद्राच्या निर्मितीचे रहस्य उलगडू शकते. चांद्रयान-१’ या मोहिमेतून चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचे पुरावे मिळाले होते. चंद्राच्या विविध भागांमध्ये, तसेच जमिनीच्या आणि मातीच्या विविध स्तरांमध्ये पाण्याचे वितरण कसे आहे, याची सखोल माहिती जमा करणे आवश्यक आहे. चंद्रावरील पाण्याचा उगम शोधण्यासाठी त्याच्या जमिनीचा, तसेच अत्यंत विरळ असणार्या वातावरणाचा अभ्यास आवश्यक आहे.
ब्रह्मांडातील सुपरपॉवर होण्याच्या दिशेने वाटचाल
सोमवारच्या प्रक्षेपणातून भारताच्या दुसर्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला असून, आता ‘चांद्रयान-२’ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचे आव्हान ‘इस्रो’समोर असणार आहे. यासाठी इस्त्रोचे प्रमुख के. सिवान ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतीलच अशी खात्री १२५ कोटी भारतीयांना आहे. या मोहिमेकडे भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. एकेकाळी सायकल व बैलगाड्यांवर उपग्रहांची वाहतूक करणार्या भारताने अल्पवधीतच ब्रह्मांडातील सुपरपॉवर होण्याच्या दिशेने वाटचाल करणे कौतुकास्पद आहे. काही टन वजन असणारे उपग्रह आपण अंतरिक्षात पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रक्षेपित करू शकतो किंवा मंगळ, चंद्र, शुक्र अशा ग्रहांवर ते पाठवण्याची क्षमता आपण प्राप्त केली. आता याचा पुढचा टप्पा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी २०२२ पर्यंत अंतराळामध्ये भारतीयाला पाठविण्याची घोषणा केली आहे. देशाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी २०२२ साली अंतराळात भारताचा तिरंगा फडकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत ‘मिशन गगनयान’ या मोहिमेची घोषणा केली आहे. आता भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला इस्रो अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे. भविष्यात हे शक्य झाल्यास भारताच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवणार्या भारतीय अंतराळ संशोधन केंद्रासाठी हे एक मोठे यश असणार आहे. कारण राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक असले तरी ते ‘सोयूझ’ या रशियन अंतराळ यानातून गेले होते. अंतराळात माणसाला पाठविण्याचे तंत्र आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया व चीन या तीनच देशांकडे आहे. भारतही लवकरच त्यांच्या पंक्तीत मानाचे स्थान पटकावेल, अशी खात्री इस्रोच्या आजपर्यंतच्या कामगिरीवरून वाटते. हा सोनियाचा दिवस लवकच यावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
Post a Comment