कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी!

एकदिवसीय आणि खासकरून टी-२० क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मागील काही वर्षांत कसोटी क्रिकेटची लोकप्रियता फारच कमी झाली आहे. त्यात भारतात आयपीएल हे क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनल्याने पाच दिवस चालणार्‍या कसोटी क्रिकेटला उतरती कळा लागली आहे. पाच दिवस चालणारा काहीसा निरस सामना पाहण्यापेक्षा दिवसातून दोन वेळा, असे पाच दिवस वेगवेगळे दहा सामने पाहण्याकडे कल वाढला आहे. अनेक खेळाडूदेखील मर्यादित षटकांच्या क्रिकेटलाच पसंती देत असल्याचे पाहयला मिळत आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटकडे पुन्हा चाहत्यांनी वळावे यासाठी आयसीसीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेत, पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची घोषणा केली आहे. मर्यादित षटकांची विश्वचषक स्पर्धा दर चार वर्षांनी होते मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप दोन वर्षांच्या कालावधीत खेळली जाणार आहे. पहिली स्पर्धा ऑगस्ट २०१९ ते जून २०२१ या काळात होणार आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीने द्विपक्षीय कसोटी क्रिकेट अधिक मनोरंजक होण्याच्या दृष्टीने आयसीसीने ही स्पर्धा आणली असल्याने पहिलीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अधिक चुरशीची होऊन कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे. 



कसोटी क्रिकेट वाचविण्यासाठी...

‘गोर्‍या’ साहेबांचा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख असली तरी हा खेळ आता नवा राहिलेला नाही. खरे क्रिकेट हे पाच दिवसांचे. कसोटी क्रिकेट नावाने ओळखले जाते. १९६० च्या दशकात तीन दिवसांचे क्रिकेट खेळले जायचे. हळूहळू सामने पाच दिवसांचे होऊ लागले. कधी कधी निकाल लागेपर्यंत थांबायचे ठरले, तर सामना सात-आठ दिवसांपर्यंत खेळला गेल्याची इतिहासात नोंद आढळते. पण, पाच दिवसही खेळून सामने अनिर्णित राहू लागल्याने मैदाने प्रेक्षकांअभावी रिकामी पडू लागली. कसोटी क्रिकेट खरे असले, तरी त्याची अवस्था आज पूर्वीपेक्षा अधिक भयाण झाली आहे. कसोटी क्रिकेट वाचविण्यासाठी अनेक कल्पना शोधल्या गेल्या. क्रिकेटकडे पाठ फिरविलेल्या प्रेक्षकांना परत कसे वळवायचे मर्यादित षटकांचा सामना खेळण्यास सुरुवात झाली. ६० च्या दशकात १९६३ मध्ये इंग्लंड कौंटी संघांमध्ये अशी एक स्पर्धा झाली. एकदिवसीय क्रिकेटची ती पहिली स्पर्धा. या स्पर्धेपासून स्फूर्ती घेत पुढे अनेक स्पर्धा निर्माण झाल्या. ‘प्लेअर ऑफ संडे लीग’, ‘बेन्सन अँड हेजेस’ या यातील काही महत्त्वाच्या स्पर्धा. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्या दरम्यान अ‍ॅशेस मालिकेतील एक सामना रद्द झाला. प्रेक्षक निराश झाले. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा काढून टाकण्यासाठी दोन्ही संघांत एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. या सामन्याला झालेली गर्दी बघता एकदिवसीय क्रिकेटला दुर्लक्षित करून चालणार नाही याची जाणीव सगळ्यांनाच झाली. त्यानंतर या दोन देशांदरम्यान ५५ षटकांच्या मालिकेचेही आयोजन करण्यात आले. 

कसोटी क्रिकेट झोकाळले

आंतरराष्ट्रीय सामन्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या स्वरूपातील क्रिकेटची विश्वकरंडक स्पर्धा घेण्याची संकल्पना पुढे आल्यानंतर १९७५ मध्ये पहिली विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. यानंतर क्रिकेटचे नवे रुप जगासामोर आले. पण म्हणतात ना, दुनिया गोल है ! ज्या कसोटी सामन्यांमुळे कंटाळवाणे होणार्‍या क्रिकेटला वाचविण्यासाठी मर्यादित षटकांचे सामने खेळण्यास सुरुवात झाली त्याच मर्यादित सामन्यांच्या लोकप्रियतेसमोर कसोटी क्रिकेट झोकाळत चालले आहे. कसोटी क्रिकेट जरी इ.स. १८७७ पासून खेळले जात असले तरी त्यातील नियमांत मोठे बदल झालेले नाहीत. यामुळे गेल्या काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटला गतवैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी हालचाली सुरु होत्या. सर्वात प्रथम २०१० मध्ये कसोटीच्या जागतिक स्पर्धेची चर्चा झाली. जेव्हा २०१३ पासून स्पर्धेला सुरुवात करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आयसीसी चॅपियन्स करंडक रद्द करण्याचा विचार काही संघांच्या विरोधामुळे २०१७पर्यंत निर्णय पुढे ढकलला. अनेक वर्षे चर्चा केल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अखेर मुहूर्त लागला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या अ‍ॅशेस मालिकेपासून या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होईल. ही स्पर्धा २०२१ पर्यंत चालणार असून, अंतिम सामना जून २०२१ मध्ये लॉर्ड्सवर होणार आहे. 

‘अती’ क्रिकेट थोडेसे कमी करायला हवे

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आयसीसीच्या जागतिक क्रमवारीतील पहिले ९ संघ आपापसात सहा मालिका खेळतील. यात भारत, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांचा समावेश होईल. आयर्लंड आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिका या स्पर्धेचा भाग नसतील. यापैकी तीन मालिका मायदेशी तर तीन परदेशात असतील. याचा अर्थ साखळी पध्दतीने प्रत्येक संघ उर्वरित आठपैकी सहा संघांविरुध्द मालिका खेळेल. प्रत्येक मालिकेत किमान दोन ते पाच सामने खेळले जातील. त्यामुळे प्रत्येक संघ सारखेच सामने खेळेल हे शक्य नाही. कसोटी सामने कमी-जास्त खेळले जाणार असले तरी प्रत्येक मालिका १२० गुणांची असणार आहे. म्हणजे सहा मालिकांतून प्रत्येक संघाला कमाल ७२० गुण कमावण्याची संधी आहे. या पद्धतीने दोन वर्षांच्या शेवटी जे दोन संघ अधिकाधिक गुण कमावून पहिल्या स्थानी असतील त्यांच्यात जून २०२१ मध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी वर्ल्डकप स्पर्धेत भारत १८ सामने खेळेल तर इंग्लंड २२, ऑस्ट्रेलिया १९, दक्षिण आफ्रिका १६, न्यूझीलंड १४, श्रीलंका १३, पाकिस्तान १३, बांगलादेश १४ तसेच वेस्ट इंडिज १५ सामने खेळणार आहे. सर्व संघांमध्ये रंगतदार खेळ होण्याची अपेक्षा आहे. याआधी जागतिक क्रमवारीमुळे सर्वोत्तम कसोटी संघ कोणता हे कळायला मदत व्हायची, पण आता संघाना गुण मिळवायचे आहेत ते जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी. त्यामुळे कसोटी सामने पुन्हा एकदा रंगतदार होतील आणि चाहते आपला संघ सोडून इतर संघांचेही सामने पाहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मात्र सध्याच्या फास्टफुडच्या जमान्यात क्रिकेटप्रेमी नव्या रंगाढंगातल्या कसोटी क्रिकेटला कितपत स्वीकारतात, याचे उत्तर येणार्‍या दोन वर्षात मिळेल. परंतु आयसीसीचा हा नवा प्रयोग निश्‍चितच कौतुकास्पद म्हणावा लागेल. या प्रयोगाला १०० टक्के यशस्वी करायचे असेल तर काही दिवस व्यावसायिक गणिते बाजूला ठेवून ‘अती’ क्रिकेट थोडेसे कमी करायला हवे, ने मात्र तितकेच खरे!

Post a Comment

Designed By Blogger