गांधी घराण्याव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष पण...

लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस अजूनही सावरलेला नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या राजीमान्यावरुन काँग्रेस पक्षात आतापर्यंत जे काही सुरू होते, त्याचे वर्णन ‘तमाशा’ या शब्दातच करावे लागेल! असाच तमाशा देशाने सोनिया गांधी यांनी पंतप्रधान स्विकारण्यास नकार दिल्यानंतर पाहिलेला आहे. त्याचाच पार्ट-२ सध्या देशात सुरु आहे. राहुल गांधी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या आपल्या निर्णयावर ठाम असतांना अन्य काँग्रेस नेते त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आग्रही असतांना राहुल गांधी यांनी चार पानी पत्र लिहून आपण अध्यक्षपद सोडण्यावर ठाम आहोत, पक्षाने नवा अध्यक्ष लवकर निवडावा, असे सूचित केले. कितीही मनधरणी केल्यानंतरही राहूल गांधी ऐकण्यास तयार नसल्याने तब्बल दोन दशकांपेक्षा जास्त कालावधीनंतर गांधी घराण्याव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्षाची चर्चा सुरु झाली आहे. असे असले तरी काँग्रेसला असा अध्यक्ष हवा जो गांधी घराण्याच्या मर्जीतीलच असेल. शिवाय, सीताराम केसरी प्रकरणानंतर काँग्रेस ताक देखील फुंकून पिणार, ने निश्‍चित आहे.


१९९८ नंतर गांधी घराण्याव्यतिरिक्त अध्यक्ष 

स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे १८ अध्यक्ष झाले आहेत. यातील ५ अध्यक्ष हे गांधी घराण्यातील आणि १३ अध्यक्ष गांधी घराण्याव्यतिरिक्त झाले आहेत. परंतु अध्यक्षपदावर सर्वाधिक काळ राहण्याचा रेकॉर्ड गांधी घराण्यातील व्यक्ती कडे राहिला आहे. देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर १९४७ मध्ये जेबी कृपलानी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. यानंतर पट्टाभी सीतारमैय्या, पुरुषोत्तम दास टंडन, यूएन ढेबर, नीलम संजीव रेड्डी, कामराज, एस निजलिंगप्पा, बाबू जगजीवन राम, शंकर दयाल शर्मा, देवकांत बरुआ, ब्रह्मनंद रेड्डी, इंदिरा गांधी, पी.व्ही. नरसिंम्हा राव, सीताराम केसरी यांनी अध्यक्षपद भूषवले. १९९६ ते ९८ दरम्यान सीताराम केसरी अध्यक्ष राहीले. १९९८ नंतर काँग्रेसने गांधी घराण्याव्यतिरिक्त अध्यक्ष पाहिलेला नाही. १९९८ ते २०१७ पर्यंत सोनिया गांधी या पदावर होत्या. त्यानंतर २०१७ रोजी राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाची कमान होती. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी सुरु असतांना त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे सस्पेन्स संपला असून आता नवा अध्यक्ष गांधी घराण्याव्यतिरिक्त असणार आहे हे स्पष्ट झाले.

राजकीय कारकीर्द कधी बहरलीच नाही

गांधी घराण्याचे वारसदार असलेले राहूल गांधी यांची राजकीय कारकीर्द कधी बहरलीच नाही. २००४ला जेव्हा राहुल गांधी राजकारणात आले तेव्हा भारतीय राजकारणाच्या मानकांनुसार ते लहानच होते. कारण तेव्हा त्यांचे वय ३४ वर्षं होते. सुरुवातीच्या काळात राहुल यांच्या मागे काँग्रेसमध्येही त्यांची थट्टा होत असे. भाजपाच्या एका गटातर्फे त्यांची पप्पू अशी प्रतिमा तयार करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. याला खुद्द राहूल देखील तितकेच जबाबदार आहेत, हे देखील विसरुन चालणार नाही. त्यांची विनोदी व तर्कहीन भाषणे, देहबोलीमुळे ते अनेकवेळा ट्रोल झाले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या किमान वर्षभर आधी त्यांनी स्वत:ची प्रतिमा बदलण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. याची पहिली झलक पहिल्यांदा पाहता आली जेव्हा राहुल गांधी बर्कले इथं कॅलिफोर्निया विद्यापीठात गेले होते. तिथे त्यांनी ‘भारताचे राजकारण आणि परराष्ट्र धोरण’ यावर खुलेपणाने चर्चा केली. तिथून परत आल्यानंतर त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वास दिसू लागला. कर्नाटकमध्ये त्यांनी विजय मिळवला नाही. पण तिथे त्यांनी भाजपला सरकार बनवू दिले नाही. त्यानंतर हिंदी पट्ट्यातील ३ राज्ये त्यांनी जिंकली. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांत नरेंद्र मोदी यांनी जोर लावूनही तिथे त्यांनी भाजपला सत्तेतून बाहेर केले. त्यानंतर असे वातावरण निर्माण झाले की भाजपला २०१९ची लोकसभा जिंकण्याची संधी मिळणार नाही. मात्र लोकसभेत काँग्रेसचा सफशेल धुव्वा उडाल्याने त्यांच्या नेतृत्वात प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले. या पराभवामुळे ते पुर्णपणे खचले. यामुळे ते राजीनाम्यावर ठाम राहीले. ते अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर तब्बल दोन दशकांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याव्यतिरिक्त व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळेल. सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव सध्या चर्चेत आहे. याआधी सर्व प्रथम अशोक गेहलोत यांचे नाव समोर आले होते. पण, सोनिया गांधींनी मात्र त्याला नकार दिला. राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यामधील गटबाजीमुळे देखील सोनिया गांधी नाराज होत्या.

लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष टिकला पाहिजे

जातीचे राजकारण पाहता दलित वर्ग आतापर्यंत काँग्रेसच्या मागे राहिला आहे. त्यामुळे सुशिलकुमार शिंदे यांना अध्यक्षपदी नेमल्यास काँग्रेसला जातीचे राजकारण देखील साधता येणार आहे. सुशिलकुमार शिंदे हे गांधी घराण्याच्या विश्वासातील देखील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेससमुक्त भारताची गोष्ट करत होते, पण देशात गांधी घराणेमुक्त काँग्रेस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुळात काँग्रेसचे नेतृत्व गांधी घराण्याने करायचे की घराण्याबाहेरच्या व्यक्तीने, याबाबतचा अधिकार काँग्रेस पक्षालाच आहे. आता याबाबतचा निर्णय पक्षाने लवकर घेतला पाहिजे. कारण देशाच्या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष टिकला पाहिजे, जगला पाहिजे. काँग्रेस भक्कम झाला तर तो सरकारवर अंकुश ठेवू शकेल. यासाठी काँग्रेसच्या श्रेष्ठींनी अध्यक्षपदाचे भिजत घोंगडे न ठेवता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देवू शकेल, अशा मातब्बर व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड करायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोनिया-राहूल या मायलेकांनी नव्या अध्यक्षाला कळसूत्री बाहुला बनवण्याचे स्वप्न पाहू नये. त्याला स्वतंत्रपणे काम करू द्यावे, तरच काँग्रेसला लवकर ‘अच्छे दिन’ येतील. राजकारणात कोणताही विजय हा जसा अंतिम नसतो, तसाच कोणताही पराभव हा अंतिम नसतो. विजयासाठी अनेक वर्ष संघर्ष करणार्‍या भाजपाला ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ हा एक ओळीचा अटलजींचा मंत्रच नंतर या पक्षाला उंचीवर घेऊन गेल्याचे इतीहास सांगतो.

Post a Comment

Designed By Blogger