भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील शेवटच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस मंगळवारी पार पडला. शेवटच्या अधिवेशनात सत्ताधार्यांकडून मोठं मोठ्या घोषणा व आश्वासनांचा पाऊस पडतो तर विरोधकांकडून सत्ताधार्यांना गत पाच वर्षांचा हिशोब विचारत आक्रमक पावित्रा घेतला जातो. यामुळे शक्यतो शेवटचे अधिवेशन हे गोंधळामुळे चर्चेत राहते. मात्र यावेळी या पारंपारिक संकल्पनेला छेद बसला आहे. लोकसभा निवडणुकीतील दैदिप्पमान यशामुळे फॉर्मात असलेल्या भाजपाकडून तुफान फटकेबाजी करण्यात आली तर राज्याचा विरोधीपक्ष नेत्यासह अनेक दिग्गज विरोधक भाजपाच्या तंबूत आल्याने सरकार शक्तिशाली, विरोधक शक्तिहीन असे चित्र अधिवेशना दरम्यान होते. विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तर विधान परिषदेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंढे यांनी खिंड लढविण्याचा थोडापार प्रयत्न केला याचा अपवाद वगळता सत्ताधारीच वरचढ राहिले. यातही माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे भावनिक भाषण म्हणजे जणू ते सभागृहात पुन्हा परतण्याची त्यांनाच खात्री नाही, अशा स्वरुपात त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली तर त्या उलट गेली साडेचार-पाच वर्ष विरोधकांसह स्वपक्षातील सर्वांनाच उरुन पुरुन निघालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन’ ही स्वत: लिहिलेली कविता खूप काही सांगून गेली.
आयाराम गयाराम संस्कृतीला सुगीचे दिवस
फडणवीस सरकारचे शेवटचे अधिवेशन अधिवेशन अनेक कारणांनी चर्चेत राहिले. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचा मान याच फडणवीस सरकारला मिळाला. चक्क राज्याचा विरोधी पक्षनेताच पळविण्याचा विक्रमही याच सरकारने केला. मात्र या राजकीय डावात सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का? याचे मुल्यमापन कोण करणार, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पारदर्शक व्यवहार, भ्रष्टाचारमुक्त सुशासन, लोकाभिमुख कारभार असे स्वप्न भाजप शिवसेने दखवत गत पंचवार्षिकला मते मागितली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील भ्रष्ट्र कारभाराला कंटाळलेल्या मतदारांनी भाजप-सेनेच्या पारड्यात भरभरुन मतांचे दान टाकले. परंतू गत साडेचार वर्ष प्रत्यक्षात काय चालले आहे याचा सत्ताधार्यांनी विचार करावा लागणार आहे. यात सर्वात महत्त्वाच मुद्दा आहे तो, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणारे नेते व कार्यकर्ते आणि निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करुन सत्तेचे फळे चाखणार्या संधीसाधूंची! आयाराम गयाराम संस्कृतीला फडणवीस सरकारच्या काळात सुगीचे दिवस आले. याच संस्कृतीमुळे राज्यातून लोकसभेत भाजपाचे संख्याबळ वाढले. दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात काँग्रेसमधून आलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपने गृहनिर्माण मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने पावन करुन त्यांना सेनेच्या कोट्यातील कॅबिनेट मंत्रिपद दिले. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिला आठवडा विधानसभेत विरोधी पक्षनेताच नव्हता. दुसर्या आठवड्यात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद देण्यात आले आहे. शिवसेनेत कॅबिनेट मंत्रिपद मिळणे कठीण असल्याचे लक्षात आल्यामुळे शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोर्हे यांना विधानपरिषदेच्या उपसभापती पदावर समाधान मानावे लागले, या सगळ्या राजकीय खेळी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या चतुराईने खेळल्या. या तोडाफोडीच्या राजकारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वजन वाढले आहे. त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या देहबोलीतून पदोपदी जाणवतो. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने केलेल्या जनहिताच्या कामांचा धावता आलेख मांडतानाच ‘मी पुन्हा येईन’ ही स्वत: लिहिलेली कविता वाचून विजयाचा विश्वास व्यक्त केला. आगामी निवडणुका भाजपच्या दृष्टीकोणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होतील यात शंका नाही. यावर खुद्द त्यांनीच शिक्कामोर्तब केले.
खडसेंच्या मनात सल
एकीकडे मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास वाढत असतांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बेजार झालेले एकनाथ खडसे नेहमीपेक्षा जरा जास्तच भावनिक झाल्याचे पहायला मिळाले. माझ्या जीवनात मी एकही निवडणूक हरलो नाही. ४० वर्षांत आपल्यावरील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. २८८ आमदारांपैकी सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार म्हणून मी आज इथे उभा असल्याचे खडसे उद्वगाने म्हणाले. त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ही सल अजूनही खडसेंच्या मनात आहे. वारंवार त्यांनी ही सल बोलूनही दाखवली आहे. पुन्हा आपल्या मनातील खदखद, सल त्यांनी विधानसभेत बोलून दाखविली. पाच वर्षांपूर्वी राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यांना वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणामुळे मंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. खडसे यांच्याबाबत भाजपमध्ये अजूनही निर्णय होताना दिसत नाही. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीश अत्राम आदींना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. यांच्याच पंग्तीत आपल्यालाही स्थान मिळाले अशी खंत खडसेंना आहे. विरोधी पक्षनेता असताना मीही आरोप केले. पण पुराव्यानिशी केले. माझ्यावरील आरोपांमुळे जे भोगलेय त्याच्या वेदना आजही होत आहेत. यापेक्षा अधिक वाईट प्रसंग माझ्या जीवनात येऊ शकत नाही, असे सांगत काही चुकीचे बोललो असेल तर सर्वांची क्षमा मागतो, असे सांगत खडसेंनी आपल्या भाषणाची सांगता केली. त्यांचे हे भाषण म्हणजे विधानसभेतील शेवटचे भाषण ठरणार नाही ना? असा प्रश्न त्यांच्या प्रत्येक शब्दावरुन पडत होता. मुख्यमंत्र्यांनी एकापाठोपाठ मिळवलेले यश निश्चितच कौतूकास्पद आहे. त्यांच्या ‘इनकमिंग’ किंवा ‘आयात’ धोरणांमुळे भाजपाचे संख्याबळ निश्चितच वाढले आहे. मात्र यामुळे खडसेंसारखे पक्षाशी एकनिष्ठ असलेले नेते दुरावले तर नाही ना? याचेही भान मुख्यमंत्र्यांनी ठेवणे आवश्यक आहे. कारण कधी कधी जवळचा फायदा पाहण्याच्या नादात दुरचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, हे समजण्याइतके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चितच हुषार आहेत.
Post a Comment