गेल्या चार दिवसांपासून पावसाने रौद्ररुप धारण करत मुंबई-ठाण्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसापुळे २६/७च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पावसामुळे मुंबईत मालाडमध्ये भिंत कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला. पुण्यातही कोंढवा येथे संरक्षक भिंत कोसळून १५ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती आंबेगाव बुद्रुक येथे होवून सहा जणांना जीव गमवावा लागला. मुसळधार पाऊस, वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे बेजार झालेल्या मुंबईकर आता राजकीय नेत्यांच्या बेताल वक्तव्यांनी हैराण झाले आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत असतांना तसेच पावसाने १८ निष्पाप जीवांचे बळी घेतल्यानंतरही मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबई तुंबलीच नसल्याचा केलेला दावा हास्सास्पदच म्हणावा लागेल. लोकसभा निवडणुकीदरम्यान वाचाळ वीरांमध्ये गणले गेलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर महाडेश्वर यांना मागे टाकत थेट रशियातही पूर आल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. जेथे लोकांचा जीव जातोय, अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले, काहींचे जीवन उद्ध्वस्त झाले असतांना तरी यावर राजकारण होणे ही महाराष्ट्राला काळीमा फासण्यापेक्षा कमी नाही.
पहिल्याच पावसात पितळ उघडे
पुढच्याला ठेच, मागचा शहाणा... अशी आपल्या माय मराठीत म्हण आहे. मात्र पुढच्याला कितीही ठेचा लागल्या तरी आपण त्यापासून काहीच बोध घ्यायचा नाही, असा चंगच जणू आपल्या राज्यकर्त्यांनी बांधला असल्याचा प्रत्यय वारंवार येता. दरवर्षी थोडा जरी जास्त पाऊस पडला तरी मुंबईची तुंबई व्हायला वेळ लागत नाही. प्रत्येक वेळी मान्सूनपूर्व तयारीचा ढोल पिटत त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखविण्यात येत असला तरी पहिल्याच मुसळधार पावसात त्याचे पितळ उघडे पडते. आताही तिच परिस्थिती मुंबईसह ठाणे व उपनगरांमध्ये निर्माण झाली आहे. अगदी नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी नौदलाला रस्त्यावर उतरावे लागल्याने महापालिकेने मान्सूनपूर्व नेमके कोणते काम केले? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, महापालिकेच्या गलथान कारभाराचा फटका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या कलानगर परिसराला बसला आहे. वांद्रेतील कलानगरमध्ये तुफान पाणी साचले आहे. चक्क मातोश्रीचा परिसर जलमय झाल्याने महापालिकेच्याच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच ‘मातोश्री’जवळच्या नाल्याची सफाई झाली नसल्याचे उद्धव ठाकरेंनी महापौरांना लक्षात आणून दिले होते. त्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी नाला साफ करण्याचे आदेश देऊनही हा नाला साफ न झाल्याने महापौरांची अभियंत्यासोबत शाब्दिक चकमक झाली होती. आता तर पावसाने रौद्ररुप धारण केल्याने मुंबई-ठाण्यावर अस्मानी संकट कोसळले आहे.
राजकीय नेत्यांच्या बेताल वक्तव्यांनी हैराण
मुंबईतील अनेकांच्या घरांमध्ये मध्यरात्रीपासून पाणी भरल्याने अनेकांना अख्खी रात्र जागून काढावी लागली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते आणि रेल्वेरुळही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मुसळधार पावसाचा विमानसेवेलाही फटका बसला आहे तरी मुंबईच्या महापौरांना मात्र ते मान्य नाही. मुंबई कुठेच तुंबली नाही, तुम्ही विनाकारण प्रश्न निर्माण करत आहात. मुंबईत सारे काही व्यवस्थित सुरू आहे. कुठेही पाणी तुंबलेले नाही किंवा वाहतूक कोंडीही झालेली नाही. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेले नाही, असा अजब दावा महापौर करत आहेत. खासदार संजय राऊत यांनीही महापालिकेच्या गलथान कारभारावर पांघरुण टाकत मालाडमधील घटना हे महापालिकेचे अपयश नसल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी मुंबईतील परिस्थितीला थेट रशियाशी जोडला. याची फिरकी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेते, प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या घरात पाणी साचल्याचे काही फोटो पोस्ट केले. माझं घर.... असं लिहित त्यांनी घरातील काही फोटो पोस्ट केले. या पोस्टमध्ये त्यांच्या घरात गुडघ्यांपर्यंत पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. मलिक यांनी ‘करुन दाखवलं’ असे लिहित या पोस्टच्या माध्यमातून शिवसेनेला टोला लगावला आहे. ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.
विधीमंडळाच्या अधिवेशनात पडसाद
पावसाचे पडसाद राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटणे अपेक्षित होतेच, पावसाची स्थिती हाताळण्यास मुंबई महापालिका अपयशी ठरली आहे. नियमांची पायमल्ली होत आहे, भ्रष्टाचार बोकाळला आहे. नाले सफाई दौर्यांचाही काही उपयोग झालेला नाही. गरज असेल तर महापालिकेवर प्रशासक नेमून मुंबई महानगरपालिकाच बरखास्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. ‘आम्ही मुंबई बुडवून दाखवली’ हे मान्य करून शिवसेनेने जनतेची माफी मागितली पाहिजे, असे म्हणत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. राज्य सरकाने मुसळधार पावासामुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर करत मुंबईकरांचा राग शांत करण्याचा प्रयत्नही केला. मुळात मुंबई मोठा पाऊस झाल्यानंतर विविध भाग तुंबण्याची परिस्थिती वारंवार निर्माण होत आहे. याला प्रामुख्याने नाले कारणीभूत असल्याचा आरोप होतो. नाल्यांची सफाई न झाल्याने पाणी वाहून जात नाही. याला महापालिकाच जबाबदार आहे. हे उघड सत्य मान्य करायला कोणीच तयार नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाले सफाईबाबतचे धोरण मुंबई महापालिकेने जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. यानंतर तरी महापालिकेला जाग येते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेणे शक्य नाही. तसेच या विषयावरुन भाजप-शिवसेना यांच्यातील संंबंध ताणले जावू नये, याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांचे प्राधान्य राहील, हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही. सत्ताधार्यांच्या या सोयीच्या राजकारणात मुंबई दरवर्षी पावसात अशीच तुंबत राहील. यामुळे देवा मुंबई ऐवजी ग्रामीण भागात जा, तेथे शेतकरी तुझ्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत, अशी प्रार्थना करुया!
Post a Comment