लॉड्सवर क्रिकेटच जिंकले

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्‍या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरदेखील टाय झाली. अशा या थरारक लढतीत सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या प्रमाणावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला. विल्यमसन आणि त्याच्या न्यूझीलंड संघाने विश्वचषक गमावला, पण त्यांनी सार्‍यांची मने जिंकली. अतिशय रोमहर्षक झालेले अंतिम सामन्यात नशिबाने साथ न दिल्याने पराभव पदरी पडल्यानंतर केनच्या चेहर्‍यावर शेवटच्या क्षणापर्यंत राहिलेले स्मितहास्य देखील चर्चेत राहिले. केनच्या या खिळाडूवृत्तीचे जगभरात कौतुक होत आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतरही पराभव शांतपणे स्वीकारत हसणार्‍या केनची मुद्रा पाहून केन तर धोनीपेक्षाही कूल म्हटला गेला. हार जीत हा कोणत्याही खेळाचा हिस्सा असतो, मात्र या खेळात शेवटी क्रिकेट जिंकले ऐवढेच म्हणावे लागेल.


 इंग्लंडने घडवला इतिहास 

विश्वचषक सामन्यातील अंतिम सामन्यात इयॉन मॉर्गनच्या इंग्लंडने वन डे विश्वचषकावर आपले नाव कोरुन नवा इतिहास घडवला. इंग्लंडच्या या विजयामुळे यजमान संघाने विश्वचषक उंचावण्याची ही हॅट्ट्रिक ठरली. या आधी २०११ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताकडे यजमानपद होते. तो विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. तर २०१५ साली विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद संयुक्तपणे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याकडे होते. तो विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकला होता. त्या पाठोपाठ २०१९ चा विश्वचषक इंग्लंडने उंचावला. या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडकडे होते. त्यामुळे यजमान संघाची विश्वविजेतेपदाची हॅट्ट्रिक झाली. इंग्लंडच्या या विजयाची एवढी चर्चा होण्यामागे अनेक कारणे आहेत. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, क्रिकेटचा श्रीगणेशा साहेबांचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या ब्रिटनमध्ये (इंग्लंड) झाला. मात्र दुर्दैवाने इंग्लंडचा संघ आजपर्यंत विश्‍वविजेता ठरला नव्हता. १९७५मध्ये सुरू झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत विजेता होण्याचे इंग्लंडचे स्वप्न कधीच पूर्ण झाले नव्हते. अगदी पहिल्या तीन वर्ल्डकप सह एकूण पाचवेळा वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंडमध्येच झाली मात्र, प्रत्येकवेळी साहेबांच्या पदरी अपयशच आले. याआधीही इंग्लंडला विश्वचषक जिंकण्याची संधी मिळाली होती. १९७९, १९८७ आणि १९९२ च्या विश्वचषक फायनलमध्ये क्रिकेटच्या जन्मदात्याला नशिबाची साथ मिळाली नव्हती. इंग्लंडला १९७९ च्या विश्वचषक फायनलमध्ये वेस्ट इंडीज, १९८७ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि १९९२ च्या विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानने पराभूत केले होते. त्यामुळे इंग्लंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 

दुसरी सुपर ओव्हर का नाही?

१९९२ च्या विश्वचषकानंतर इंग्लंडची गाडी जणू रुळावरुन उतरली. इंग्लंडला विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी २७ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. २०१९ च्या विश्वचषकात २७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इंग्लंडने केवळ सेमी फायनल आणि फायनलमध्ये जागा मिळवली नाही, तर विश्वचषक जिंकून इतिहास रचला. अंतिम सामन्यात इंग्लंडच्या विजयाची जेवढी चर्चा झाली किंवा होत आहे, त्यापेक्षा जास्त चर्चा न्यूझीलंड व त्यांचा कर्णधार केन विल्यमसन यांची होत आहे. म्हणतात ना, ‘तेरे जीत से ज्यादा हमारे हार के चर्चे है...’यासह आयसीसीच्या नियमांवरदेखील टीका होत आहे. कारण, सामना टाय झाला...त्यानंतर सुपर ओव्हर टाय झाली... आणि मग सामन्याचा निकाल लागला तो दोन्ही संघांनी फटकावलेल्या चौकार आणि षटकारांच्या निकषावर. न्यूझीलंडने अंतिम सामन्यात १७ चौकार-षटकार लावले. पण या बाबतीत इंग्लंडची बाजू उजवी ठरली. इंग्लंडच्या तराजूत २६ चौकार-षटकारांची रास होती. त्यामुळे निकालाचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले. या निर्णयावर काही माजी खेळाडूंनीही नाराजी व्यक्त केली. खरे पाहिले तर जेव्हा विश्‍वचषक स्पर्धेत पावसामुळे एखादा सामना रद्द झाला तर त्यासाठी दुसरा दिवस राखीव ठेवला जातो, एखादी सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळली जाते मग सुपर ओव्हर टाय झाली तर पुन्हा दुसरी सुपर ओव्हर का खेळली जात नाही? असा प्रश्‍न क्रिकेटप्रेमींना पडणे स्वाभाविकच आहे. 

न्यूझीलंडच्या नशिबाचाच भाग

क्रिकेट हा अनिश्‍चिततेचा खेळ म्हटला जातो. याची प्रचिती अंतिम सामन्यात अनेकवेळा आली. याचा पहिला क्षण म्हणजे, इंग्लंडला जिंकण्यासाठी ९ चेंडूत २२ धावांचे आव्हान असताना स्टोक्सचा मिडविकेट सीमारेषेजवळ उडालेला झेल ट्रेंट बोल्टने घेतला खरा पण त्याच्या काही इंच मागे सीमारेषा असल्याचे तो विसरला आणि त्याचे ज्यावेळी त्याला भान आले तेव्हा स्टोक्स आणि इंग्लंडच्या खात्यात सहा धावा जमा झाल्या होत्या. दुसरे म्हणजे सुपर ओव्हरच्या आधी झालेल्या अखेरच्या षटकात ३ चेंडूंमध्ये ९ धावांची आवश्यकता असताना स्टोक्सने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्याला धावबाद करण्यासाठी न्यूझीलंडच्या गप्टिलने चेंडू फेकला. त्यावेळी धावबाद होऊ नये यासाठी स्टोक्सने स्वतःला खेळपट्टीवर झोकून दिले. त्याचवेळी चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागला आणि चेंडूची दिशा बदलली व चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. यानंतर धावून काढलेल्या २ धावा आणि अतिरिक्त चार धावा अशाप्रकारे ६ धावा स्टोक्सला ऐनवेळी मिळाल्या आणि याच प्रसंगानंतर सामना न्यूझीलंडच्या हातून निसटला. याला न्यूझीलंडच्या नशिबाचाच भाग म्हणावा लागेल. यातील एक योगायोग म्हणजे, भारत विरुध्द न्यूझीलंडमध्ये झालेल्या सेमी फायनलमध्ये याच गप्टिलच्या एका अप्रतिम थ्रोवर धोनी धावचीत झाला आणि न्यूझीलंडला फायनलचं तिकीट मिळाले. गप्टिल रातोरात हिरो झाला. याच गप्टिलच्या फायनलमधल्या शेवटच्या षटकातल्या थ्रोमुळे न्यूझीलंडचे विश्‍वविजेता होण्याचे स्वप्न भंगले. अंतिम सामना हरल्यानंतरही विश्वचषक स्पर्धेत ५७८ धावा करत आपल्या नेतृत्वाच्या जोरावर संघाला अंतिम सामन्यामध्ये नेणार्‍या केनला सर्वोकृष्ट खेळाडूचा देण्यात आला. हा अंतिम सामना अनेक कारणांची कायम चर्चेत राहणार असला तरी न्यूझीलंडची शेवटच्या क्षणापर्यंतची चिवट झुंझ, केनचे खिलाडूवृत्तीचे स्मित हास्य, इंग्लडचा खेळाडू स्टोक्सची तुफान फटकेबाजी व आयसीसीचे विचित्र नियम कोणीही विसरु शकणार नाही!

Post a Comment

Designed By Blogger