स्पर्धा परीक्षा एक आजार!

गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचे फॅड दिवसेंदिवस वाढत आहे. स्पर्धा परीक्षा यशस्वीतेचा मार्ग का मृगजळ यावर देखील चर्चा होते मात्र दिवसेंदिवस वाढते खाजगी क्लासेसचे प्रस्थ, अभ्यासिकांचे फुटलेले बेसूमार पेव, टेस्ट सिरीजच्या नावाने सुरु असलेली लूट व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोटिव्हेशनल व्याख्यानांच्या नावाखाली चालणारे फसवे क्षणिक हिप्नोटिझम! या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पुण्यातील फर्ग्युसन या नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला आहे. महाविद्यालयात नवीन प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. ‘स्पर्धा परीक्षा एक आजार’ असे या पथनाट्याचे नाव असून त्याद्वारे स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याआधी इतर करिअर ऑप्शन्सकडे सुद्धा लक्ष द्या, असे आवाहन या पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आले. पथनाट्याचा विषय कटू जरी असले तरी सत्य म्हणता येईल. सत्ता आणि प्रतिष्ठा यामुळे ग्रामीण भागातील तरुणवर्ग या स्पर्धा परीक्षांकडे वेगाने खेचला जात असला तरी त्यात यश मिळवणार्‍यांचे प्रमाण किती कमी असते यावर सोईस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. कारण, स्पर्धा परीक्षांचा बाजार मांडणार्‍यांनी तसे वातावरण आपल्या अवतीभवती निर्माण केले आहे, या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी व पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी केले आहे.


क्लासेसकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट

पु. ल. देशपांडे म्हणतात, की ‘पोटापाण्यासाठी लागेल तेवढे शिका. हवा तो व्यवसाय करा, पण त्याचबरोबर कला, क्रीडा, नृत्य, नाट्य, चित्रपट, शिल्पकला यातल्या एकातरी कलेशी मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगावे ते सांगून जाईल.’ याचा संदर्भ स्पर्धा परीक्षा व करियर यांच्याशी जोडल्यास अनेक जटील प्रश्‍नांची सहजतेने उकल होण्यास मदत होईल. साधारण २००६-०७ पासून महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार निर्माण होण्यास सुरुवात झाली. आज ते परमोच्च शिखरावर पोहचले आहे. ही जितकी अभिनंदनीय बाब आहे तितकीच चिंतनाची देखील आहे, हे आपण सोईस्कररित्या विसरतोय! कारण एका बाजूला स्पर्धा परीक्षांमुळे गरीब कुटुंबातील सर्वसामान्य विद्यार्थी मोठ्या हुद्यावरील शासकीय अधिकारी होत असले तरी दुसर्‍या बाजूला हीच गोष्ट अनेकांच्या उद्ध्वस्तीकरणाला कारणीभूत ठरत आहे. आज विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची मोठी क्रेझ असल्याने त्याकडेच त्यांचा अधिक ओढा असतो. आपल्या मुलाला अधिकारी म्हणून पाहण्याची पालकांची इच्छा असल्याने पालक देखील पदरमोड करुन पाल्याला पुणे, मुंबई किंवा दिल्ली येथे शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी पाठवतात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या क्लासेस तसेच अभ्यासिकांची संख्या देखील या शहरांमध्ये मोठी आहे. अनेकदा क्लासेसकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट देखील होत असते. सरकारी नोकरीच्या जागा काही शे मध्ये असतात. परंतु त्यासाठी तयारी करणार्‍यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. एकानंतर एक असे अनेक प्रयत्न विद्यार्थ्यांकडून केले जात असल्याने इतर नोकर्‍यांसाठीचे त्यांचे वयदेखील निघून जाते. 

उमेदीची अनेक वर्षं खर्ची

आज दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात मात्र त्यापैकी किती जणांना नोकरी मिळते, याचा अभ्यास करण्यासाठी गत पाच वर्षातील आकडेवारीवर नजर टाकणे आवश्यक आहे. आज महाराष्ट्रात सर्वत्र राज्य सेवा आणि सनदी सेवा परीक्षांचे मार्गदर्शन करणार्‍या क्लासेसचे लोण मोठ्या प्रमाणात पसरले आहे. आधी केवळ यूपीएससी-एमपीएससी परीक्षांसाठीचे मार्गदर्शन, नंतर त्यादृष्टीने आवश्यक ते अभ्यास साहित्य प्रकाशन, त्यानंतर २४ तासांची अभ्यासिका यांचे पीक प्रचंड प्रमाणात फोफावले आहे. यासाठी पाच हजारांपासून लाखभर रुपयांपर्यंतची रक्कम विद्यार्थ्यांच्या खिशातून सहज काढून घेतली जाते. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली उमेदीची अनेक वर्षं खर्ची पडतात. एकीकडे अधिकारपदाची स्वप्नं आणि त्याच वेळी इतर करिअरचे माहित नसलेले पर्याय यामुळे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या मागे लागतात. एकीकडे स्पर्धा परीक्षांच्या तयारीदरम्यान व्यक्तिमत्त्व विकासापासून ज्ञानसंपन्नतेपर्यंत काही सकारात्मक गोष्टी होत असताना या मृगजळामुळे उभे राहणारे सामाजिक प्रश्‍नही मोठे आहेत. 

 ‘प्लान बी’ तयार ठेवायलाच हवा!

आयुष्याला कलाटणी देण्यासाठीचा मंत्र म्हणजे स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरीत जाणे, असे वाटणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा ओघ लक्षणीय आहे. शेती परवडत नाही, ग्रामीण भागात करिअरच्या संधी नाहीत. यामुळे या परीक्षेकडे विद्यार्थी वळतात. स्पर्धा परीक्षांचा निकाल जेव्हा घोषित होतो तेव्हा रिक्षावाल्याला मुलगा, शेतकर्‍याची मुलगी पास झाली, अशा अनेक बातम्या वाचण्यात येतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख फुटतात व त्यांना पालकांच्या अपेक्षांचे बळ मिळते व त्यात हवा भरण्याचे काम खासगी क्लासेसकडून केले जाते. खासगी क्लासेसकडून आयोजित प्रेरणादायी व्याख्यांनांमुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या संसर्गजन्य रोगाला बळी पडतात आणि अशाश्वत ध्येयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होते. या वाटचालीत शे-पाचशेच्या जागांसाठी लाखो अर्ज येतात. जागा कमी अन् जीवघेणी स्पर्धा जास्त अशी स्थिती होते. या ‘रॅट रेस’मध्ये सतत भासणारी आर्थिक चणचण, वाढते वय, घरची जबाबदारी, सामाजिक तणाव, यशाची अजिबात खात्री नाही, सततच्या अपयशामुळे येणारे नैराश्य यातून स्वत:ची घुसमट वाढते. अधिकारी होण्याचे मोठे स्वप पाहिले असल्याने कमी दर्जाचे काम करण्याची मानसिकता आपोआप तयार होते. या दृष्टचक्रातून बाहेर पडणे कठीण असते. काहीजण स्वप्न भंगली असली तरी त्या स्वप्नातून बाहेर पडत नाहीत. अशा परिस्थितीत ती मुले स्वप्नंच जगायला लागतात, स्वप्नातच वावरायला लागतात. स्पर्धा परीक्षा करणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने ठराविक वर्षं त्यासाठी दिली पाहिजेत आणि त्या वर्षात आपण यशस्वी झालो नाही तर निराश न होता त्यातून बाहेर पडले पाहिजे. ज्या कोणत्या शाखेचे तुम्ही शिक्षण घेतलेले आहे, त्या शिक्षणासंबंधीचा व्यवसाय किंवा नोकरी करावी. स्पर्धा परीक्षा देतांना प्रत्येकाने ‘प्लान बी’ तयार ठेवायलाच हवा! स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, ‘एव्हरीथिंग इन अ‍ॅक्सस इज पॉइझन’ तसा स्पर्धा परीक्षांचा ओव्हरडोस निश्‍चितच परवडणारा नाही.

Post a Comment

Designed By Blogger