भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राज्याच्या राजकारणात ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे चंद्रकात पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभेची निवडणूक भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात लढवणार हे निश्चित झाले आहे. राज्यात क्रमांक दोनवरील नेते म्हणून ओळखले जाणार्या दादांनी मराठा आरक्षणाचा विषय कुशलतेने हाताळला, नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपाला यश मिळवून देण्यासाठी कंबर कसली होती. तसेच बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तगडा उमेदवरा उभा करून राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांच्या बालेकिल्ल्यातच कोंडी केली होती. पाटील यांच्या रणनीतीमुळे भाजपाला यावेळच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये लक्षणीय यश मिळाले. याची पुनरावृत्ती राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत करण्यासाठी भाजपाने चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने पुन्हा एकदा मराठा कार्ड खेळण्याची चतुर खेळी खेळली आहे. महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होवून ऑक्टोबर मध्यापर्यंत विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका होईपर्यंत प्रदेशाध्यक्षपदावर दानवेंना कायम ठेवले जाईल असे वाटत होते. मात्र दानवेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने पक्षाकडून तातडीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यात प्रदेशाध्यक्षपदी दादांची वर्णी लागली आहे.
अवघ्या काही वर्षात दादा राजकारणाच्या रंगात रंगले
वयाच्या १८ व्या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करणारे दादा २००४ साली भाजपात सामील झाले, २०१३ साली ते पक्षाचे उपाध्यक्ष झाले व जून २०१४ साली महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर निवडून गेले. त्यानंतर ऑक्टोबर २०१४ मध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले. जुलै २०१६ पासून ते महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री आहेत. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या नंतर चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले क्रमांक दोनचे मंत्री झाले. मितभाषी, कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारे. आयुष्याचा मोठा काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि विद्यार्थी परिषदेत गेलेला. त्यामुळे राजकारण्यांची गेंड्याची कातडी दादांना कधी आली नव्हती. दादा प्रकाशझोतात आले तेव्हा ते राजकारणात कसे फिट बसतील? असा प्रश्न विचारला जावू लागला. नैतिकता वगैरे गोष्टी इतर संघटनेत ठिक असतात. राजकारणात त्याचे काही चालत नाही हे दादांना त्यावेळी ऐकवले जावू लागले. आपल्या वक्तव्यांमुळे वाद झाला तर त्याचा विपर्यास केला गेला, आपण असे बोललोच नाही, विरोधकांचा कट होता ही खास राजकारण्यांची स्टाईल दादांना तोपर्यंत माहित नव्हती. पण अवघ्या काही वर्षात दादा राजकारणाच्या रंगात पूर्णपणे रंगले. आपणही कसलेले राजकारणी आहोत हे दादांनी मंत्रिपदाच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात दाखवून दिले.
भावी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नाव
याकाळात मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणार्या भूमिका व विधानांमुळे ते बर्याचदा चर्चेत देखील राहिले. भावी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत देखील त्यांचे नाव घेतले गेले. विशेषतः राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पेटला असतांना देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याची चर्चा सुरु झाली होती. यावेळी दादांचे नाव आघाडीवर होते, मात्र त्यांनी त्यावर कधीच भाष्य केले नाही. मराठा आरक्षणासाठी एकूण ५७ मोर्चे निघाल्यानंतर जनभावनेचा विचार करुन राज्य सरकारने सुरुवातीला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन, तसा अध्यादेश काढला. यानंतर सुरु झालेल्या न्यायालयीन लढाईत डॅमेज कंट्रोलची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी चंद्रकातदादांकडे सोपवली. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत बसणारे, संवैधानिक पातळीवर टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका घेऊन मागासवर्ग आयोगाकडे हे प्रकरण सोपवल्यानंतर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत त्यातील सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मराठा समाजातील तळमळीचे नेते म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती नियुक्त केली. दादांनी दुसर्या दिवसापासून मराठा आरक्षणापूर्वी मराठा समाजातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक, नोकर्यांमध्ये भेडसावणार्या अडचणी दूर करण्यासाठी काम हातात घेतले. मराठा समाजातील तरुणांना शैक्षणिक सोईसुविधा मिळाव्यात यासाठी राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवली. यासह तातडीने अनेक धाडसी निर्णय घेत मराठा तरुणांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची नवी दारे खुली करुन दिली. याशिवाय, अनेक गरीब कुटुबांतील मुलांना एमबीबीएस, बीडीएस सारख्या अभ्यासक्रमांमधून शिक्षण घेण्याची इच्छा मराठा आंदोलनाच्या माध्यमातून पुढे येत होती. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी मराठा समाजाच्या तरुणांसाठी दादांनी अनेक सकारात्मक निर्णय घेत मराठा समाजातील तरुणांना दिलासा दिला. हा किचकट विषय कुशलतेने हाताळल्यानंतर दादांचे राजकीय वजन वाढले.
मनाचा मोठेपणा
अशातच दादांनी मुख्यमंत्री अडचणीत येतील अशी काही विधाने केल्याने दादा विरुध्द मुख्यमंत्री असे चित्र निर्माण झाले होते. या विषयात अनेक नाट्यमय वळणे आली. चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भूखंड घोटाळ्याचे आरोप केल्याने दादांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पुन्हा जुळवून घेतल्यानंतर हा वाद शमला. मराठा आरक्षणाचा विषय असो की खड्ड्यांचा, भाजपामध्ये प्रवेश करणार्या आयारामांचा की दूधाच्या आंदोलनाचा... दादांच्या वक्तव्यांनी अनेकदा वाद निर्माण केले. पण दादांचा दबदबा मोठा असल्याने परिस्थिती हाताबाहेर कधी गेली नाही आणि दादांनीही मनाचा मोठेपणा दाखवत दिलगीरी व्यक्त करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आता भाजपात ‘दादा’पर्वाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळवण्याचा करिष्मा करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून पक्षाला आहे. आधीच पक्षात मोठे वजन असणार्या मुख्यमंत्र्यांशी सुसंवाद साधत कधी कधी अंगावर धावून येणार्या शिवसेनेलाही सांभाळण्याची कसरत दादांना करावी लागणार आहे. भाजपाने मराठा कार्ड खेळले असले तरी आता भाजपासह राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष हे पश्चिम महाराष्ट्रातीलच असून, तिघेही मराठा समाजाचे आहेत.
Post a Comment