काँग्रेस राज ठाकरेंना टाळी देणार का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण येणे स्वाभाविक आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपविरोधी प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेसची मदतच केली होती. मात्र राष्ट्रवादी अनुकूल असतानाही काँग्रेसने मनसेला सोबत घेणे टाळले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची वाताहत झाली. त्यामुळे आता तरी काँग्रेस राज ठाकरेंना टाळी देणार का, याची उत्सूकता अवघ्या महाराष्ट्राला लागून आहे. यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही दिल्लीत भेट झाली होती. आता राज ठाकरे आणि सोनिया गांधी या त्यांच्या पुढच्या पिढीतील नेत्यांची भेट गांधी आणि ठाकरे घराण्याच्या भेटीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणारी ठरणार का? याचे उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच मिळेल!


राज ठाकरे - सोनिया गांधीं भेटी मुळे राज्यात नवी समीकरणे

महाराष्ट्रात पुढच्या तीन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळीही राज ठाकरेंनी मोदी-शाहंविरोधात जोरदार प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला साथ दिली होती. त्यावेळी मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती. राज ठाकरेंच्या सभा भरपूर गाजल्या होत्या. या सभांची चर्चा भरपूर झाली. पण प्रत्यक्षात मतदारांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यावेळी मनसे लोकसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करेल मोबदल्यात दोन्ही पक्ष त्यांना विधानसभेला साथ देतील अशी अटकळ बांधील जात होती. त्याचा पहिला अंक नवी दिल्लीत पार पडला. दिल्ली दौर्‍यावर गेलेल्या राज ठाकरे यांनी सोनिया गांधींच्या भेटी मुळे विधानसभा निवडणुकीत नव्या समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने विरोध केला होता. मात्र आता राज ठाकरे हे थेट सोनिया गांधींच्याच भेटीला गेल्याने मनसेला महाराष्ट्रातील महाआघाडीत सामावून घेण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होण्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. 

मनसेच्या वेलीला कॉँग्रेसच्या खोडाचा आधार

याचा इतीहास देखील खूप रंजक आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या मनसेच्या इंजिनाची काँग्रेसने साखळी ओढून बे्रक लावला होता. मनसेला सोबत घेतल्यास उत्तर भारतातील काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांवर परिणाम होईल, असा युक्तीवाद काँग्रेसतर्फे करण्यात आला होता. यानंतरही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवी झेंडी दाखविल्याने मनसे इंजिन राज्यात धावले. राज ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार सभांदरम्यान केलेला ‘लाव रे तो व्हिडिओ’ प्रचंड गाजला. मात्र लोकसभा निकालानंतर राज ठाकरेंच्या सभांचा आघाडीला काडीमात्रही फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांदरम्यान राजकीय गणिते काय असतील? यावर चर्चा सुरु असतांना राज ठाकरे ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस व मनसे या दोन्ही पक्षांना उतरती कळा लागली आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असला तरी त्याची अवस्था एखाद्या प्रादेशिक पक्षासारखी झाली आहे. जसे राहूल गांधी व राजकीय पराभव हे एक सूत्र झाले आहे तशीच काहीशी परिस्थिती राज ठाकरेंचीही आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मनसे स्थापन झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले. हा अपवाद वगळता मनसेला उतरती कळाच लागली यास नाशिक महापालिकेचा अपवाद होता मात्र तेथेही करिष्मा करु न शकल्याने मनसेला मतदारांनी नाकारले. आता राज ठाकरे आपले बंद पडलेले इंजिन दुसर्‍याला जोडू पाहत आहेत. त्यांच्याकडे एकही आमदार, खासदार नाही म्हणून एकाकी झुंज देण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावाच लागतो. वेलीला झाडाच्या खोडाचा आधार मिळाला, तरच तो वेल उंचावर जातो. राज ठाकरेंच्या बाबतीत तसेच झाले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रुपाने खोड मिळाले तर मनसेचा वेल वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा बाळगून राज ठाकरेंनी राजकीय गाठीभेटी सुरु केल्या असतील, ही दाट शक्यता आहे.

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र

‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नात्याने राज ठाकरेंना जवळ केल्यास भविष्यातील संभाव्य धोक्यांचाही विचार काँग्रेसला करावाच लागणार आहे. कारण मनसेच्या भूमिकेमुळे काँग्रेसवर परिणाम होऊ शकतो. काँग्रेसची विचारधारा सर्वसमावेशक असेल आणि ती बदलणारी नाही. त्यांच्या मुलभूत भूमिकेत बदल होऊ शकणार नाही. त्यामुळे भाजपाविरोध हा सामायिक धागा सोडला तर काँग्रेस व मनसेत कोणतेच तार जुळत नाहीत. शिवाय, उद्या जर मनसैनिकांनी पुन्हा परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण करणे, काही ठराविक सिनेमांना विरोध करणे, बिहारी फेरीवाल्यांना मारहाण करणे, या आपल्या जुन्या कार्यक्रमांना सुरुवात केली तर काँगे्रसच्या अडचणी वाढू शकतात. या पार्श्‍वभूमीवर आता काँग्रेस मनसेची साथ घेणार का, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या करिष्म्याचा फायदा काँग्रेस करुन घेणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज ठाकरे यांचे नेतृत्व तरुणांमध्ये लोकप्रिय आहे, त्यांची भाषणशैली प्रभावी आहे. या गोष्टीचा फायदा करत काँग्रेस भाजपला मात देणार का, नवी राजकीय समीकरणे जन्माला येणार का, याबाबत महाराष्ट्रासह देशभरातील राजकारणात उत्सुकता आहे. त्याआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यातही भाजप-शिवसेना यांच्या विरोधात महाआघाडी तयार करण्याबाबत चर्चा झाली. सर्व भाजपविरोधी पक्षांचा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याने त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे शेट्टी म्हणाले होते. विशेष म्हणजे, महाआघाडीत मनसेच्या समावेशाला असलेला काँग्रेसचा विरोधसुद्धा मावळेल असे भाकित त्यांनी वर्तविले होते. ते खरे ठरु पाहत आहे. 

Post a Comment

Designed By Blogger