क्रिकेटचाच नव्हे दुर्दम्य इच्छाशक्तिचा ‘युवराज’

सिक्सर किंग आणि २०११ च्या क्रिकेट विश्वचषकाचा नायक युवराज सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्याने एका योध्याची १९ वर्षांची कारकीर्द संपुष्टात आली. नुसत्या क्रिकेटच्या मैदानात नाही, तर दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीने युवराज जीवनाच्या रणांगणात अपराजित ठरला आहे. कर्करोगावर मात करत पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करणे यातूनच युवराजची लढवय्या वृत्ती त्याला इतरांपासून वेगळा सिध्द करते. युवराजच्या नावावर २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि १९  वर्षांखालील वर्ल्ड कप आहेत आणि हे तीनही वर्ल्ड कप जिंकणारा तो एक खेळाडू! गेली दोन वर्ष युवराज भारताकडून एकही वन डे किंवा ट्वेंटी -२० सामना खेळलेला नाही. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्यताही कमी असल्याने त्याने निवृत्ती स्वीकारली. निवृत्ती तर कधीतरी घ्यावीच लागणार होती मात्र एकेकाळी मैदान गाजवणार्‍या एका वादळाने मैदानाबाहेरुन निवृत्ती घेतली, याची वेदना काय असते हे युवराजपेक्षा दुसर्‍या कोणालाच कळणार नाही.


ट्वेण्टी-२० क्रिकेटचा स्पेशालिस्ट

भारतीय क्रिकेटला अनेक रत्न लाभले. यापैकी एक म्हणजे युवराज सिंग. युवराज २००० सालापासून भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे. युवराज सिंहने ३ ऑक्टोबर २००० मध्ये केनियाविरोधात नैरोबीमध्ये वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर युवराजने ३०८ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. वनडेमध्ये युवराज सिंहने ३६.५५ च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या आहेत. यामध्ये ५२ अर्धशतके आणि १४ शतकांचा समावेश आहे. वनडे शिवाय युवी कसोटी फॉरमॅटमध्ये ४० सामना खेळला आहे. कसोटीमध्ये युवराजने ३३.९२ च्या सरासरीने १९०० धावा केल्या आहे. त्याने तीन शतके आणि ११ अर्धशतक करण्याचा पराक्रम केला आहे. तर ट्वेण्टी-२० क्रिकेटचा स्पेशालिस्ट समजला जाणारा युवराज भारतीय संघासाठी ५८ वेळा मैदानात उतरला आहे. टी-२० मध्ये युवराज सिंहने ११७७ धावा बनवल्या आहेत, ज्यात आठ वेळा ५० किंवा यापेक्षा जास्त धावांची खेळी रचली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंह हा जगातील एकमेव खेळाडू आहे, ज्याच्या नावावर सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आहे.

एका षटकात सहा षटकारांची आतषबाजी

युवराजकडे क्रिकेटसाठी अनुकूल विपुल गुणवत्ता होती. प्रतिस्पर्धी गोलंदाजावर आक्रमण करणारी डावखुरी फलंदाजी, मोक्याच्या क्षणी बळी मिळवणारी डावखुरी फिरकी गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण ही त्याची वैशिष्ट्ये कसोटी क्रिकेटमध्ये तो आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध करू शकला नाही. परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र त्याने अनेक सामने गाजवले. २००४मध्ये लाहोरला पाकिस्तानविरुद्ध पहिले कसोटी शतक नोंदवले. २००७च्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एका षटकात सहा षटकारांची आतषबाजी केली. तर २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आक्रमक युवराजने मालिकावीर पुरस्काराला गवसणी घातली. हे युवराजच्या क्रिकेट कारकीर्दीतील महत्त्वाचे क्षण ठरले. युवराज सिंहने साल २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध केवळ १२ चेंडूंमध्ये ५० धावा करण्याचा कारनामा केला होता. युवराजने याच सामन्यात इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ चेंडूंवर सलग सहा षटकार लगावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. यामुळे युवराजला ‘सिक्सर किंग’ ही नवी ओळख मिळाली. २००७ ते २००८ पर्यंत तो भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार होता.

२००७ आणि २०११ च्या वर्ल्डकपमध्ये सामनावीराचा किताब

संघातील भरवशाचे खेळाडू नांगी टाकत असत, त्या त्या वेळी युवराज सिंगची बॅट मैदानात तळपत असे. युवराज सिंग खेळत असेल, तर भारताचा पराभव अशक्य आहे असा विश्वास क्रिकेटप्रेमींना वाटायचा. युवराजने २००७ आणि २०११ च्या वर्ल्डकपमध्ये सामनावीराचा किताब पटकावला होता. युवराजचा हा झंझावात केवळ मैदानावरच होता असे नाही, मैदानाबाहेर व्यक्तीगत जीवनातही युवराज एक योध्दाप्रमाणे लढला. २०११ मध्ये त्याला त्याच्या डाव्या फुफ्फुसाचा एक कर्करोगाच्या गाठीचे निदान झाले आणि इनडियनॅपलिस मध्ये बोस्टन मध्ये कर्करोग संशोधन संस्था तसेच वैद्यक सुविधा येथे केमोथेरपीच्या उपचार करून घेतला. त्याला दोन्ही फुफ्फुसांमध्ये ट्युमर असल्याचे समजल्यानंतरही त्याने निकराने या आजाराशी लढा दिला. जसे की त्याने विरोधकांना हरवले होते. तो पूर्णतः तंदुरुस्त झाल्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला. त्याच्या या लढवय्या वृत्तीचे जगभरात कौतूक झाले. त्याच्यापासून अनेकांनी प्रेरणा देखील घेतली. युवराज फलंदाजी करत असतांना जशी तो प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांची दाणादाण उडवायचा तशीच त्याने कॅन्सरची देखील उडवली. जणू कॅन्सरने त्याची धडकीची घेतली होती की काय, अशी अविस्मरणीय खेळी युवराजने केली.

कॅन्सर रुग्णांसाठी काम

क्रीडा क्षेत्रात त्याच्या कार्याची दखल घेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन २०१२ मध्ये युवराज सिंह ला भारतातील दुसर्‍या सर्वोच्च क्रीडा अर्जुन पुरस्कार बहाल केला. यानंतर त्याने केलेले पुनरागमन यशस्वी ठरले नाही. खेळात सातत्य न ठेवल्याने तो अनेकवेळा संघाच्या बाहेरच राहिला. गेली दोन वर्ष युवराज भारताकडून एकही वन डे किंवा ट्वेंटी -२० सामना खेळलेला नाही. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमधील वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना त्याचा अखेरचा ठरला. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारली. युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाच नव्हे, तर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटलाही अलविदा केला. २०१५च्या आयपीएल’मध्ये तो सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला होता, परंतु यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये त्याला मूळ किमतीतच मुंबई इंडियन्सने संघात स्थान दिले, याचे दुख: त्याच्यासह क्रिकेटप्रेमींना देखील झाले होते. निवृत्तीनंतर काय करणार या प्रश्‍नावर युवराजने दिलेल्या उत्तराने त्याने पुन्हा एकदा भारतियांची मने जिंकली. तो म्हणाला की, माझ्या आयुष्यातील मोठा काळ क्रिकेटला दिल्यानंतर आता मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता मी कॅन्सर रुग्णांसाठी काम आहे. यातही तो मैदान गाजवेल याची खात्री आहे. युवराजला या पुढच्या इनिंकसाठी मनापासून शुभेच्छा!

Post a Comment

Designed By Blogger