अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता हरपला!

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य, नाट्य, सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अंतर्मुख करणारे सर्जनशील लेखन, नवदृष्टी देणारे दिग्दर्शन आणि प्रभावीपण, संयत अभिनयामुळे भारतीय साहित्य व कला क्षेत्रावर स्वत:चा अमीट ठसा उमटवणारे, विविध भूमिकांमध्ये वेगळीच उंची गाठणारे कर्नाड यांच्या निधनामुळे भारतीय साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक वर्तुळातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले आहे. भारतीय सांस्कृतिक घडामोडीतील एक विद्वान माणूस असलेल्या कर्नाड यांनी भारतीय रंगभूमीवर त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अत्यंत मोठा पुरस्कर्ता म्हणून त्यांनी सतत भारतीय राजकारण, समाज व्यवस्था, जातीव्यवस्था, धर्म व्यवस्था यांच्यावर भाष्य केले. वेळप्रसंगी तत्त्वांसाठी लढण्यासाठी ते रस्त्यावरदेखील उतरले. पत्रकार गौरी लंकेश व कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चांमध्ये ते सहभागी झाले होते. देशातील पुरोगामी चळवळीचे ते एक आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनामुळे कधी न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.


प्रयोगशीलता मोठे अस्त्र

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माथेरानला १९ मे १९३८ साली जन्मलेले कर्नाड यांनी कर्नाटक विद्यापीठातून १९५८ साली पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे फेलोशिप मिळवून उच्च शिक्षणासाठी त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेत एमएची पदवी घेतली. ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले असले तरी ते साहित्य व नाट्यक्षेत्रात रमायचे. वाचन व चिंतन हे त्यांचे जवळचे मित्र! पारंपरिक ढाच्यात स्वत:ला न बसवता काही तरी नाविन्य करण्याच्या त्यांच्या धाडसी (बंडखोर म्हटले तरी चालेल) स्वभावामुळे त्यांचे साहित्य व नाट्यकृती बहरले. प्रयोगशीलता हे त्यांचे मोठे अस्त्र होते. त्यांच्या साहित्य व नाट्यकृतीतून त्यांची ही सर्जकता सतत प्रतिबिंबित होत राहिली. गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाटकात पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आधुनिक आशय व्यक्त केला. सोशिकता ही नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखांची परंपरा त्यांनी मोडली. त्यांच्या नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखा डिमांडिंग असे. कर्नाड यांनी आपल्या नाटकात केलेली पारंपरिक मांडणी, आशय यांची पुनर्मांडणी अद्भुत आहे. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास प्रेरणादायी होता. 

वेगळ्या धाटणीची नाटके

बहुभाषिक व्यक्तिमत्त्व असलेल्या कर्नाड यांनी तब्बल चार दशके नाट्यलेखन, दिग्दर्शन व अभिनयाने रंगभूमी गाजवली. कन्नड, मराठी, हिंदी व इंग्रजीसह विविध भाषांमध्ये त्यांची नाटके रूपांतरित झाली. वेगळ्या धाटणीची व नवा दृष्टिकोन देणारी त्यांची नाटके प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. यात ययाति, तुघलक, हयवन, अंजु मल्लिगे, अग्निमतु माले, नागमंडल आणि अग्नी और बरखा ही नाटके प्रचंड गाजली. १९६४ साली रंगभूमीवर आलेल्या त्यांच्या ‘तुघलक’ या नाटकाने इतिहास घडवला. या नाटकामुळे त्यांचे नाव देशभरात परिचित झाले. ते केवळ रंगभूमीवरच रमले नाहीत. सिनेमाचा पडदाही त्यांनी गाजवला. सत्यजित रे यांचे चित्रपट पाहून गिरीश कर्नाड प्रभावित झाले आणि त्यांनी सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतला. यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारीत ‘संस्कार’ चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. त्यांच्या पहिल्याच सिनेमाला राष्ट्रपतींचे सुवर्ण कमळ पुरस्कार लाभला. आर के नारायण यांच्या पुस्तकावर आधारित मालगुडी डेजमध्ये त्यांनी स्वामीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. आजही त्यांची भूमिका प्रसिद्ध आहे. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (१९९९) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर निशांत (१९७५), मंथन (१९७६), पुकार (२०००), इक्बाल (२००५), डोर (२००६), तस्वीर (२००९), आशायें (२०१०), एक था टायगर (२०१२), टायगर ज़िंदा है (२०१७) अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट - वंशवृक्ष (१९७२), काडू (१९७४), ओन्दानुंडू कालाडल्ली (१९७८) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (१९८०) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे. याशिवाय उंबरठा या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते. ३३ वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या या गाजलेल्या मराठी चित्रपटात गिरीश कर्नाड यांनी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची भूमिका केली होती. यासह दूरदर्शनच्या ‘टर्निंग पॉइंट’ या विज्ञानविषयक कार्यक्रमात त्यांनी निवेदकाची भूमिका पार पाडली. 

संवेदनशील व्यक्तिमत्व

१९९४ साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्कार चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना १९९८ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. वयाची पंच्च्याहत्तरी पार केल्यानंतरही कर्नाड कार्यरत होते. सार्वजनिक कार्यक्रम, चर्चासत्रे व साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर हजेरी लावत होते. आपली मते ठामपणे मांडणार्‍या गिरीश कर्नाड यांनी त्यांची मते वा भूमिका कधीच लपवल्या नाहीत. देशातील वाढती असहिष्णुता व साहित्यिक, पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांविरोधात त्यांनी नीडरपणे आवाज उठवला. अभिनय, नाटक, लेखन अशा विविध क्षेत्रात छाप पाडतानाच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखड मत व्यक्त करणारे संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. गेल्या अनेक दिवसांपासून आजारपणाशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पत्नी सरस्वती, मुलगा रघु आणि पत्रकार, लेखिका कन्या राधा असा परिवार आहे. गिरीश कर्नाड यांच्या आत्म्याला शांती लाभो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना.

Post a Comment

Designed By Blogger