ट्रम्प यांचे काय चुकले?

नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी ओळखले जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील अस्वच्छतेबाबत स्वत:चे एक विधान केले आहे. भारतातील अस्वच्छता आणि प्रदुषणाबद्दल नाराजी व्यक्त करत भारतात शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान स्वच्छतेबाबत धडे देत असतांना तसेच त्यावर कोट्यावधी रुपये खर्च देखील होत असतांना एखाद्या परक्या देशाच्या प्रमुखाने आपल्या देशाला नाव ठेवल्याने अनेकांचे देशप्रेम व स्वाभिमान जागा झाला. (जसा १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला जागा होतो तसाच) ट्रम्पसारख्या लहरी व्यक्तिमत्वाच्या टीकेकडे दुर्लक्ष जरी केले तरी प्रदूषणासंदर्भात ग्रीनपीस आग्नेय आशिया या पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनेच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या आयक्यूएअर एअर व्हिज्युअल २०१८ वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमधील आकडेवारीवर नजर टाकल्यास जगभरातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांपैकी १५ शहरे भारतात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर सेंटर ऑफ सायन्स अँन्ड एन्व्हायर्नमेंटच्या (सीएसइ) एका रिपोर्टनुसार, देशात दरवर्षी १ लाख लहान मुले प्रदूषित हवेमुळे पाच वर्षाच्या आतच जीव गमावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे, हे पाहता ट्रम्प यांचे नेमके काय चुकले?


ट्रम्प यांनी भारताला आरसा दाखविला

ट्रम्प यांनी एका इंग्रजी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जगातील पर्यावरण आणि अमेरिका यासंदर्भात भाष्य करत प्रदूषणाला भारतासह चीन व रशियाही जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. जागतिक पर्यावरणाचा विचार करून हे दोन्ही देश आपली जबाबदारी पार पाडत नाहीत. शिवाय या देशांना प्रदुषणासंदर्भातील जबाबदारीचे भान नाही. भारतासह अन्य काही देशांमध्ये शुद्ध हवाही मिळत नाही. तर स्वच्छ पाणीदेखील उपलब्ध होत नाही. आपण तेथील काही शहरांमध्ये गेल्यास तुम्ही तेथे श्वासही घेऊ शकणार नाहीत. अमेरिका जगातील सर्वात स्वच्छ देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगत स्वत:ची टिमकी वाजवून घेतली आहे. मानवी स्वभाव पाहता दुसर्‍याने आपल्याला नावे ठेवली तर राग येणारच, त्यातही जर विषय देशाचा आला तर सोशल मीडियावर देशभक्तीची लाट आल्याशिवाय राहणारच नाही. मात्र ट्रम्प यांनी भारताला जो आरसा दाखविला आहे, त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 

वाढत्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रिम प्रोजेक्टपैकी पहिल्या पाच योजनांमध्ये स्वच्छता अभियानाचा समावेश होतो. गंगा स्वच्छतेवर गेल्या पाच वर्षांपासून काम सुरु असून त्यावर कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. वायू प्रदूषण रोखण्यासाठी नो-व्हेइकल डे, इलेक्ट्रिक वाहने, सीएनजीसारखे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मात्र  ग्रीनपीस संस्थेने जगातील तीन हजार शहरांचे सर्वेक्षण करून जो अहवाल तयार केला. त्यात जगभरातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांपैकी १५ शहरे भारतात असून गुरुग्राम, गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा आणि भिवाडी ही शहरे पहिल्या सहा प्रदूषित शहरांमध्ये आहेत. जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून प्रदूषणामुळे ढासळलेल्या गुणवत्तेचे विदारक चित्र पुढे आले. वाढत्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे, हे सत्य आपण अजूनही गांभीर्याने घेण्यास तयार नाही. एका अहवालानुसार, पुढील वर्षी प्रदूषण कायम राहिल्यास ७० लाख माणसांच्या मृत्यूला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या हवेचे प्रदूषण कारणीभूत ठरणार आहे. तसेच अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास जागतिक पातळीवर १ अब्ज ५८ कोटी रुपयांचे नुकसान होईल, मात्र यात आपले काय जाते? या मानसिकतेत आपण आजही अडकून पडलो आहोत. पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्वसंध्येला स्टेट ऑफ इंडिया एन्व्हायर्नमेंट -२०१९ चा रिपोर्ट जाहीर करण्यात आला. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारतात होणार्‍या एकूण व्यक्तींचा मृत्युमध्ये प्रदूषणामुळे १२ टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू होतो आहे. वायु प्रदूषणामुळे देशात ५ वयापेक्षा कमी वयाच्या दर १० हजार मुलांपैकी सरासरी ८ पेक्षा अधिक लहान मुलांचा मृत्यू होत आहे. मुलींमध्ये हे प्रमाण अधिक जास्त आहे. दरवर्षी दर १० हजार मुलींपैकी सरासरी ९ पेक्षा अधिक मुलींचा त्या पाच वर्षांच्या होण्याआधीच प्रदूषणामुळे मृत्यू होत आहे. 

विषारी वायुमुळे गंभीर आजार 

भौगोलिक दृष्ट्या संपन्न, विविध जाती, प्रजाती, विविध प्रदेश, ऐतिहासिक असा देश म्हणून भारताचा नावलौकिक आहे. परंतु, त्याच्या अगदी विरुद्ध सध्या देशाची स्थिती आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद यांसह देशातील विविध मोठ्या शहरांमध्ये हजारो वाहने दररोज रस्त्यावर धावत धूर ओकत असतात. वाहनांच्या धूरातून बाहेर पडणार्‍या वायूमध्ये कार्बनडाय ऑक्साइड, कार्बन मोनाक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, ओझोन, सल्फरडाय ऑक्साइड या वायूंचा समावेश असतो. हे वायू श्वासावाटे फुफ्फुसात गेल्याने दमा, घसादुखी, त्याशिवाय फुफ्फुसाचा कॅन्सर बळावतो. फुफ्फुसातून रक्तात गेलेल्या वायूमुळे हृदयावर परिणाम झाल्याने रक्तदाब वाढतो. पॅरालिसिसचा झटका येतो. मूत्रपिंड खराब होते. वाढत्या प्रदूषणामुळे मेंदूवर परिणाम होऊन स्वभाव चिडखोर होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञ वर्तवितात. प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने देशातील नव्हे शहरांसह ग्रामीण भागातील पूर्वीची शुद्ध हवा आता मिळत नाही, ही मोठी खंताची बाब आहे. हवा प्रदूषण थांबवायचे असेल तर आपल्याला वृक्षलागवडीशिवाय तरणोपाय नाही. प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपायोजना केल्या पाहिजेत. नागरिकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. प्रत्येकाला आपण घरापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत प्रदूषणात राहत असल्याची जाणीव झाली पाहिजे. 

सस्टेनेबल डेव्हलपमेंटची व्याख्या बदलण्याची गरज 

प्रदूषणाला रोखण्यासाठी सीएनजी वाहनांचा वापर वाढला पाहिजे. त्याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली पाहिजे. शहरीकरण व औद्योगिकरणामुळे होत असलेली जंगलतोड थांबवली पाहिजे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. तसेच, कारखान्याचे रासायनिक दूषित पाणी नदीत सोडले जात आहे. त्या जलप्रदूषणामुळे अनेक साथीचे रोगही निर्माण होत आहेत, यावर उपाययोजनाच नव्हे तर त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. जगाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची आपली स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेत आपण सर्व हिरिरीने सहभागी झालो आहोत पण ह्या स्पर्धेच्या जोशात त्या खेळाचे नियमही ओलांडून मिळवलेले तात्पुरते विजय हे आपल्याला आपल्या विनाशाच्या अधिक जवळ नेत आहेत, हे आपल्याला आज लक्षात येत नाही. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटची व्याख्या ही प्रत्येक देशाप्रमाणे बदलत जात आहे. जगाची ही व्याख्या समान करण्याचा प्रयत्न करणे आणि अशा समस्येवर जागतिक उपाययोजना स्वीकारणे हेच या समस्येचे एकमेव उत्तर आहे. 

Post a Comment

Designed By Blogger