लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीची झालेली पडझड, दिग्गज नेत्यांची भाजपात सुरु असलेली इनकमिंग व राज्यात घोंगावणारे महायुतीचे वारे या पार्श्वभूमीवर आघाडीच्या अनेक प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते द्विधा मन:स्थितीत आहेत. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी कोण बसवणार? यावर चर्चा सुरु झाली आहे. केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवरील मातब्बर नेत्यांमध्ये ज्यांचा समावेश होतो ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे त्यांचे नातू पार्थ पवारच्या परभवानंतर गृहकलहात अडकून पडले आहेत. राष्ट्रवादीचा गड मानला जाणार्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गढ्यांना भाजपाने सुरुंग लावला आहे. अध्यक्ष शरद पवार जेव्हा पण राजकीय पटलावर सारीपाट मांडतात तेव्हा तो गेमचेंजर ठरतो, असा आजवरचा इतिहास असल्याने किमान राज्यात तरी कोणताही पक्ष किंवा नेता त्यांच्या वाटेला गेलेला आढळत नाही मात्र मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी थेट बारामतीचे पाणी रोखण्याचे धाडस दाखविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वरकरणी हा विषय साधा वाटत असला तरी यातून अनेक अर्थ काढले जात आहेत. याचा थेट संबंध राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकांशी जोडला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसचे पराभूत झालेले दोन माजी मुख्यमंत्री, पक्षाला रामराम ठोकणारे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाच्या वाटेवर असलेले आमदार अब्दूल सत्तार व भाजपा नेत्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या संपर्कात असलेले आठ ते दहा आमदार, असे अनेक हर्डल्स आघाडीच्या मार्गात असल्याने ‘भाजपा चलती की गाडी और आघाडीमे बिघाडी’, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात कॉँग्रेसची पडझड
शरद पवार यांनी ‘पुलोद’चा प्रयोग करतांना राज्यातील काँग्रेस पक्ष फोडल्याला आता चाळीस वर्ष उलटून गेली तरी महाराष्ट्रात कॉँग्रेसची सुरू झालेली पडझड अजूनही थांबलेली नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर लागलेली गळती आता इतकी मोठी झाली आहे की, कुठे कुठे ठिगळ लावावे? असा प्रश्न दिल्लीश्वरांना पडत नसेल तर नवलच! सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे तीन माजी मुख्यमंत्री आणि नेते सध्या राज्यात आहेत. शिंदे व चव्हाण यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत स्वत:चा गड देखील सांभाळत आला नाही. सेनापतीच पराभूत झाल्याने सैन्याचे मनोबल खचणे स्वाभाविक आहे. त्यांच्यानंतरचे मोठे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तर स्वत:च्या मुलाचा भाजपा प्रवेश घडवून आणत त्याला लोकसभेचे तिकीट देखील मिळवून दिले. काँग्रेसचा हा दिग्गज नेता भाजपा कार्यालयात बसून पत्रकार परिषदा घेतांना उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. आपला नेताच अशी भूमिका घेतो मग आपण मागे का राहायचे? हे होणारच होते. मराठवाड्यातील काँग्रेस नेते आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. यासह अजून आठ ते दहा आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत.
दोन गुगलींची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा
राजकीय डावपेचात दोन गुगलींची सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? कारण, शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आले होते. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा अफवा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र ही चर्चा सुरु झालीच कशी, याचा शोध घेणे गरजेचे आहे. दुसरी गुगली म्हणजे, महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यतेची. याला तशी पार्श्वभूमीदेखील आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाला आघाडीत घेण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न होते. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज यांची भेटही घेतली होती. मात्र, आघाडीत मनसेला स्थान देण्यास काँग्रेसने स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. आता राज्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर विधानसभेच्या गणितांची जुळवाजुळव सुरू झाली असून, यानिमित्ताने राष्ट्रवादी-मनसे आघाडीच्या चर्चेला राष्ट्रवादीकडूनच नव्याने फोडणी देण्यात आल्याने यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील किमान ३० जागांवर मनसेचा प्रभाव आहे. २००९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेची जादू दिसली होती. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली होती. मनसेने तेव्हा १३ जागा जिंकल्या होत्या. शिवसेना आणि भाजपची मते मोठ्या प्रमाणात मनसेकडे वळल्याने त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला होता. या दोन्ही गुगल्या गेमचेंजर ठरु शकतात हे नाकारुन चालणार नाही.
वाढत्या इनकमिंगमुळे निष्ठावानांचे काय होणार?
राज्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर विधानसभेच्या गणितांची जुळवाजुळव सुरू झाल्यानंतर युतीच्याच नेत्यांनी २८८ पैकी १८ जागा मित्रपक्षांना सोडून २७० जागा भाजपा-शिवसेनेने वाटून घेण्याचे समीकरण मांडले आहे. यात फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला म्हणून दोन्ही पक्षांनी १३५ जागांवर लढायचे असे ठरण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे दोन्ही पक्षांची गाडी हवेत असली तरी वाढत्या इनकमिंगमुळे निष्ठावानांचे काय होणार? यावर अंतर्गत धूसफूस सुरु होण्याची शक्यता आहे. यातही भाजपात आलेले मोहिते-पाटील, विखे-पाटील यांच्या सारखे ज्येष्ठ नेते शिवसेनेसाठी काम करतील का? हा प्रश्न महत्त्वाचा ठरु शकतो. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तोडगा असेलच म्हणा. कारण गेली साडेचार-पाच वर्ष त्यांनी मराठा मोर्चे, धनगर आरक्षण, शेतकरी मोर्चे व कर्जमाफीसारखे किचकट विषय लिलया हाताळले असल्याने त्यांची चांगलीच प्रॅक्टीस झाली असेलच. राज्यात मोठा भाऊ कोण व छोटा भाऊ कोण? या जटील प्रश्नाचे उत्तर त्यांनी ज्या पध्दतीने दिले ते खूप काही सांगून जाते. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते की, उध्दवजी माझे मोठे भाऊ आहेत व मोदीजी उध्दवजींचे मोठे भाऊ आहेत, या एका वाक्यात राज्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होते.
Post a Comment