नेमकं काय ठरलयं?

लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना-भाजपाने युती केली असली तरी विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदावरुन दोघांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. मुख्यमंत्री आमचाच अशा दोन्ही पक्षाच्या भूमिकेवरुन नेते एकमेकांच्या विरोधी भूमिका घेत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी आमचं ठरलंय ही सावध भूमिका मांडली आहे. मात्र नेमकं काय ठरलयं, मुख्यमंत्री कोणाचा? छोटा भाऊ कोण व मोठा भाऊ कोण? या प्रश्‍नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. या वादाला माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या वक्तव्यानंतर फोडणी मिळाली आहे. भाजपाची विशेषत: अमित शहांची आजवरची वाटचाल पाहता ते शिवसेनेवर कुरघोडीचे राजकारण करण्याची एकही संधी सोडणार नाही. याची झलक मुख्यमंत्र्यांच्या परिपक्व राजकीय वक्तव्यांवरुन सातत्याने येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील भाषण फारच सूचक होते. वाघ आणि सिंह एकत्र आल्याने सत्ता कोणाची येणार हे सांगण्याची गरज नाही, असे फडणवीस म्हणाले होते. या विधानामधील वाघ शिवसेना तर सिंह भाजपा असल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असेल तर सिंह जंगलाचा राजा असतो त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचा असेल असे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन स्पष्ट होते.


शिवधनुष्य फडणवीसांनी पेलले

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजप आणि शिवसेना उत्साहाने विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दुरावलेल्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीदरम्यान पुन्हा जवळ आणून गेली साडेचार वर्षे महाराष्ट्रातील सत्ता सांभाळणार्‍या फडणवीस यांनी पुन्हा एकदा गेल्याएवढेच यश मिळवून दाखविले. गेल्या साडेचार वर्षांमध्ये शिवसेनेने सत्तेत असूनही विरोधी पक्षाची भूमिका बजावली. फडणवीस यांना या कालावधीत राज्य राबविताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तरीही हे शिवधनुष्य फडणवीसांनी लिलया पेलले. यामुळे राज्यात त्यांचे वजन चांगलेच वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडून अपेक्षा निश्‍चितच वाढल्या आहेत. लोकसभेसाठी जागा वाटपाची चर्चा करतांना फडणवीस व ठाकरे यांनी विधानसभेसाठी फिफ्टी-५० चा फॉर्म्युला निश्‍चित केला असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे. मात्र यात अनेक अडचणींचा सामना दोन्ही नेत्यांना करावा लागणार आहे. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री कोणाचा, कोणत्या जागा कोण लढवणार, असे काही जटील प्रश्‍न सोडवितांना युतीची नाळ तुटेस्तव ताणली जाईल, असे चित्र सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय हेव्यादाव्यांवरुन दिसून येत आहे. 

युतीच्या चर्चेआड २८८ जागांवर चाचपणी 

यंदा सर्वात मोठी अडचण आहे ती गेल्या निवडणुकीत भाजपाने जिंकलेल्या जागांची. कारण, गेल्या निवडणुकीत भाजपाने १२३ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. ज्या जिंकलेल्या जागा आहेत त्यापैकी एकही जागा भाजपा सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतला आहे. यामुळे काही जागांवर दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यातही मुख्यमंत्री कोणाचा? हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. गेल्यावेळी अशीच परिस्थिती होती. शेवटपर्यंत युतीची चर्चा सुरु असतांना ऐनवेळी जागा वाटपावरुन बिनसल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र चुली मांडल्याचा इतिहास आहे. आताही युतीच्या चर्चेआड दोन्ही पक्षांनी २८८ जागांवर चाचपणी सुरु केली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. तर लोकसभा निवडणुकीत जे यश मिळाले त्यामुळे भाजपाच मोठा भाऊ आहे असे वक्तव्य खासदार पूनम महाजन यांनी केले. दरम्यान रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री कोण होणार हे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे ठरले आहे असे सूचक उत्तर दिले. त्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युती बाबत ठरले आहे. इतर कोणी त्यात आता तोंड घालू नये असे सडेतोड उत्तर देत भाजपाच्या बोलघेवड्या नेत्यांना चपराक दिली मात्र नेमकं काय ठरलयं? हे त्यांनीही स्पष्ट न केल्याने गोंधळ अजूनच वाढला. मुख्यमंत्री कोण होईल, याची मला पर्वा नाही. मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणार्‍यांनी शेतकर्‍यांचा क्षोभ शमवावा. अन्यथा, ते सत्तेची आसने जाळून खाक करतील, असा इशारा त्यांनीही दिला. शेतकर्‍यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. ज्या गोरगरीब शेतकर्‍यांनी आपल्याला निवडून दिले त्यांचे प्रश्न सोडवणे हे मुख्यमंत्री कोण होणार या विषयापेक्षा अधिक महत्वाचे आहे. ग्रामीण भागात शेतकर्‍यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला का? उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ किती गरिबांना मिळाला? गॅस घरोघरी खरोखरच पोहोचले आहेत का? शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला का? शेतकरी कर्जमुक्त झाला का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे, असे ते म्हणाल्याने त्यांनी त्यांच्यात सरकारच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. यामुळे दोन्ही पक्ष खरोखर मनापासून एकत्र येत आहेत का? या प्रश्‍नाचे उत्तर आपोआप मिळते.

प्लॅन बी असणारच

भाजपासाठी हा विषय केवळ महाराष्ट्रासाठीच आहे असे नाही. विधानसभा निवडणुकीत युती करा पण मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच ठेवा असा आदेश अमित शहा यांनी दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत दिल्याचे बोलले गेले. शहा हे प्रचंड महत्त्वकांक्षी आहेत हे काही लपून राहिलेले नाही, ज्या अर्थी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत असे भाष्य केल्याने त्यांच्याकडे निश्‍चितच काही तरी प्लॅन बी असणारच. या वादात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भाजपामध्ये येणार्‍या आमदारांच्या काही जागा या शिवसेनेकडे आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदाबाबत काय आश्वासन भाजपने दिले आहे? हे उघडपणे शिवसेनाही बोलत नाही आणि मुख्यमंत्रीही ते स्पष्ट करताना दिसत नाही. आता तर वादाला सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीआधी उध्दव ठाकरेंनी शिवसेनेच्या खासदारांसह अयोध्या वारी करत भाजपची राम मंदिरावरून कोंडी केली. भाजपाला राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेला पाठींबा दर्शवण्याखेरीज पर्याय उरला नाही. आता विधानसभा निवडणुकांआधी पुन्हा एकदा उध्दव ठाकरे अयोध्या वारी करत भाजपावर दबावतंत्र सुरुच ठेवले आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेमध्ये ठिणगी पडणार का? या सगळ्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

Designed By Blogger