येरे येरे पावसा...

जून महिना निम्मा उलटत आला तरी राज्यात पावसाचे आगमन झालेले नाही. मान्सूनपूर्व पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली मात्र त्यातही फायदा कमी व नुकसान जास्त, अशी अवस्था करुन सोडली. आधीच गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसणार्‍या महाराष्ट्राला किमान यंदा तरी दमदार पावसाची अपेक्षा आहे. मात्र वरुणराजा रुसून बसला आहे. मान्सूनचा पाऊस यायला अजून उशीर असतांना राज्यातल्या धरणांमध्ये फक्त ७ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे चिंता वाढली आहे. पाण्याअभावी पेरण्या खोळंबल्या असून शेतकर्‍यांकडे मान्सूनपर्यंत वाट पाहण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. त्यातच मान्सून वेळेवर आला नाही किंवा चांगला बरसला नाही तर ही स्थिती आणखी विदारक होण्याची भीती बळीराजाला सतावू लागली आहे.


शेतकरी धास्तावला 

दुष्काळ तसा आपल्या पाचवीलाच पूजलेला. परंतु, पाणीपातळी दिवसेंदिवस खाली चालल्याने त्याची दाहकता वाढत चालली आहे. जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाल्यानंतरही शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे नजर लावून बसले आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, राज्यात लवकरच मान्सूनचे आगमन होण्याची अपेक्षा आहे. नेर्ऋत्य मोसमी वार्‍यांच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले असून, अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील भागात ते दाखल झाले आहेत. असे असले तरी, राज्य सध्या उन्हाने होरपळून निघत आहे. बहुतांश भागातील जलसाठे कोरडे पडले आहेत. अशा स्थितीत मोसमी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. मोसमी पावसापूर्वीच्या पावसाने सध्या ओढ दिली असली, तरी पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मात्र पेरणीचा कालावधी निघून जात असल्याने शेतकरी धास्तावला आहे. पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पाणी व चारा नसल्याने जनावरे विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. पाण्याअभावी अनेक उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर पोहचले आहेत. 

विपरित परिणात सर्वच क्षेत्रांवर

देशात आजही सर्वाधिक रोजगार शेतीतूनच निर्माण होतो आणि ही शेती प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून आहे. परिणामी आपली अर्थव्यवस्थाही त्यावर विसंबून आहे. शेतीचे देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेतले योगदान १४ टक्के असले तरी, यामुळे देशातल्या १.३ अब्ज लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळेच पावसाबद्दल व्यक्त करण्यात येणार्‍या अंदाजाला अनन्यसाधारण महत्त्व असतेे. आधीच गत तिन चार वर्षापासून कमी अधिक पडणार्‍या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याचा विपरित परिणात सर्वच क्षेत्रांवर दिसून येत आहे. महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. दृष्काळाच्या दृष्टचक्रात शेतकरी व सर्वसामान्य भरडला जात आहे.म्हणूनच पाऊस लांबला, की चिंतेचे मळभ दाटून येते. आधीच शेतकरी अडचणीत आहेत. शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी देण्यात आलेल्या कर्जमाफीचे गुर्‍हाळ अनेक दिवस सुरूच होते. कर्जमाफी हा शेतकर्‍यांच्या समस्यांवरील इलाज नाही हे मान्य केले तरी, शेतकर्‍यांवर एक तर कर्ज काढण्याची वेळच येणार नाही आणि काढावे लागले तरी त्यांची पूर्तता संस्थात्मक यंत्रणेद्वारे होईल हे पाहणे आवश्यक आहे. 

अनेक प्रकल्प कोरडेठाक

केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ केल्याचा मोठा डांगोरा पिटला. परंतु शासन शेतीमालाची खरेदी करत नसेल तर हमीभावातील वाढीला तसा अर्थ उरत नाही; कारण बाजारभाव नेहमी हमीभावापेक्षा कमीच असतो. या सत्य परिस्थितीकडे राज्यकर्ते सोईस्कररित्या दुर्लक्ष करतात. यामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ येते, हे एक मोठे दुर्दव्यच आहे. राज्यातील स्थितीबाबत बोलायचे म्हटल्यास, एकीकडे सरकार शेतकर्‍यांना मदत करत नाही दुसरीकडे गेल्या तिन-चार वर्षांपासून जणू वरुणराजा महाराष्ट्रावर रुसला की काय? अशी परिस्थिती आहे. राज्यात दुष्काळाने तीव्र स्वरूप धारण करायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने हे संकट येणार, हे अपेक्षित होते. सिंचन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, औरंगाबाद विभागात एक टक्क्यांपेक्षाही कमी तर नागपूर विभागात सहा टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक प्रकल्पातला उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आहे. विदर्भातला गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प देशातला दुसरा सर्वात मोठा प्रकल्प आहे. पण सध्या या धरणात उपयुक्त पाणी साठा आहे शून्य टक्के. खान्देशातील अनेक प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. परिणामी अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ महिलांवर आली आहे. उन्हाळ्यात सिंचन प्रकल्पासंदर्भात हवे तसे नियोजन राज्य सरकारने केल्याचे यावरुन उघड होते. एकीकडे धरणे कोरडी पडत असताना धरणातला गाळ काढून पाणीसाठा भविष्यासाठी वाढवता आला असता. पण यासंदर्भातही काहीही काम झालेले नाही. शासकीय यंत्रणेला दुष्काळाची गंभीरताच दिसत नाही. 

दुष्काळाचे राजकारण

लोकसभा निवडणुकीचे राज्यातील चार टप्पे पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेत पाणी, चारा, टँकर, मनरेगा, रोहयो, तातडीची मदत अशा बाजूंचा आढावा घेत निपचित पडलेल्या प्रशासनाला हलवून जागे केले. मुख्य म्हणजे मंत्री, पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जाऊन दुष्काळावर जागल्याची जबाबदारी दिली. मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. जणू काही यांना दुष्काळाशी काही एक घेणे देणेच नाही. त्या उलट इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा सदस्य व मराठमोळ्या केदार जाधवने मात्र अशा परिस्थितीतही आपले सामाजिक भान राखले आहे. इंग्लंडमध्ये सध्या पावसाचे वातावरण आहे. बहुतांश सामन्यांवर पावसाचे सावट आहे. केदार जाधवने न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी, नॉटिंगहॅम शहरात आकाशात गर्दी केलेल्या ढगांकडे पाहून, वरुणराजाला एक सुंदर प्रार्थना केली आहे. माझ्या महाराष्ट्रात तुझी जास्त गरज आहे, असे म्हणत केदारने जा रे जा रे पावसा अशी वरुणराजाला विनवणी केली आहे. केदारचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. केदारच्या या कृतीचे कौतूक करावे तितके कमीच आहे. कारण इकडे दुष्काळाचे एकतर राजकारण होते नाही तर त्यावरील उपाययोजनांकडे केवळ शासकीय आदेश म्हणून पाहिले जाते. असे असतांना केदारने दाखविलेल्या सामाजिक भानमुळे त्याने संपुर्ण महाराष्ट्रवासियांची मने जिंकली आहेत.

Post a Comment

Designed By Blogger