चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची तारीख घोषित केल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने भारत आता स्वत:चे अंतराळ स्थानक निर्माण करणार असल्याची घोषणा केली आहे. हे स्थानक २०३० पर्यंत पूर्ण होईल. अंतराळमध्ये अमेरिका, रशिया, जपान आणि कॅनडा यांचे एक संयुक्त स्थानक, तर दुसरे आहे चीनचे. भारताने आपले अंतराळ स्थानक बनवले तर तिसरे स्थानक आपले राहील. देशाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी २०२२ साली अंतराळात भारताचा तिरंगा फडकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत ‘मिशन गगनयान’ या मोहिमेची घोषणा केली होती. आता भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला इस्रो अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. इस्त्रोने अन्य देशांचे २०० च्यावर उपग्रह अवकाशात सोडून आधीच अंतराळात दबदबा निर्माण केला आहे. एकेकाळी सायकल व बैलगाड्यांवर उपग्रहांची वाहतूक करणार्या भारताने अल्पवधीतच ब्रम्हांडातील सुपरपॉवर होण्याच्या दिशेने वाटचाल करणे कौतूकास्पद आहे.
अवकाशात दबदबा
जगाच्या पाठीवर अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताचे नाव चमकवण्याची कामगिरी यापूर्वीही इस्रोने अनेकवेळा केली आहे. ४ ऑक्टोबर १९५७ रोजी माणसाने अवकाशात प्रक्षेपित केलेला पहिला उपग्रह - स्पुटनिकनंतर अठरा वर्षांनी भारतीय बनावटीच्या पहिल्या आर्यभट्ट या उपग्रहाचे प्रक्षेपण रशियाच्या कॉसमॉस -३ एम या रॉकेटच्या साह्याने १९ एप्रिल १९७५ ला करण्यात आले. तेव्हापासून चार दशकांच्या कालावधीत इस्रोने सर्व प्रकारचे कृत्रिम उपग्रह बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित करतानाच अवकाश संशोधनामध्ये भारताचा दबदबाही निर्माण केला आहे. प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचे सुटे भाग सायकलवरून नेणे आणि आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहास बैलगाडीतून प्रक्षेपण स्थळावर नेणार्या इस्रोने अल्पवधीतच केलेली वाटचाल केवळ अभिमानास्पद आहे. आज अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी जगातील अनेक प्रगत देशही भारताची मदत घेतात. एकाच वेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडण्याचा नवा विक्रम करून भारताने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. कारण त्याआधी रशियाने एकाच वेळी ३७ उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. इस्रोने आतापर्यंत २८ हून जास्त देशांचे २३९ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करत अवकाशात दबदबा निर्माण केला आहे. चांद्रयान-१, मार्स ऑर्बायटर मिशन (मॉम) आणि अॅस्ट्रोसॅट या मोहिमांद्वारे इस्रोने वैज्ञानिक संशोधनासाठीच्या अद्ययावत उपग्रहांच्या निर्मितीतही आपण मागे नाही हे दाखवून दिले.
अंतराळमध्ये भारतीयाला पाठविण्याचे इस्त्रोचे स्वप्न
इस्रोने २०१३ मध्ये ‘मंगळयान’ मोहिमेची घोषणा करत अमेरिका, चीन, रशियासह अन्य देशांना जोरदार धक्का दिला होता. जे अन्य मोठ्या देशांना जमले नाही ते काम करण्याचे धाडस भारत करत असल्याने भारताची मंगळावर स्वारी यशस्वी होणार नाही, अशी टीका करण्यात आली. पण हे मंगळयान २४ सप्टेंबर, २०१४ ला मंगळावर यशस्वीरित्या पोहोचले आणि टीकाकारांची तोंडेही बंद झाली. चांद्रयान-१ च्या यशा नंतर इस्रो चांद्रयान-२ ची घोषणा केली. २०२२ पर्यंत अंतराळमध्ये भारतीयाला पाठविण्याचे इस्त्रोचे स्वप्न आहे. राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक असले तरी ते ‘सोयूझ’ या रशियन अंतराळ यानातून गेले होते. अंतराळात माणसाला पाठविण्याचे तंत्र आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया व चीन या तीनच देशांकडे आहे. भारतही लवकरच त्यांच्या पंक्तीत मानाचे स्थान पटकावेल, अशी खात्री इस्रोच्या आजपर्यंतच्या कामगिरीवरून सर्व १३० कोटी भारतियांना आहे. यासह इस्रो येत्या दोन-तीन वर्षांत शुक्र मोहीम राबवणार आहे. वंचितांना सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने दुर्गम भागात पोहोचणे हा भारतीय अंतराळ कार्यक्रमाचा उद्देश आहे. सौर मंडलातील रहस्यांची उकल करणे हा दुसरा उद्देश आहे. गगनयानमुळे याची माहिती मिळेल. चांद्रयान, गगनयान, मंगळयान व अंतराळ स्थानक याचाच भाग आहेत.
१५ जुलै रोजी मध्यरात्री चंद्राकडे झेपावणार
आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास अंतराळ स्थानकाच्या बाबतीत अमेरिका व रशिया यांचाच दबदबा राहिला आहे. सोव्हिएत रशियाने ‘मीर’ (शांतता) हे अंतराळ स्टेशन सुरू केले. मीर हे सोव्हिएत युनियनच्या प्रथम मालकीचे आणि पुढे १९९० च्या सोवियत युनियनच्या विघटनानंतर रशियाद्वारे चालवले जाणारे अंतराळ स्थानक होते. हे स्थानक इ.स.१९८६ पासून ते इ.स. २००१ पर्यंत कार्यरत होते. अल्माज, सॅल्यूट मालिका, स्कायलॅब आणि मीर ही जुनी अंतराळस्थानके आहेत. अल्माज नावाचा हा गुप्त प्रकल्प पुढे सेलूट (१९७१ ते १०८२) नावाच्या स्पेस स्टेशन प्रकल्पाचा भाग झाला. आधुनिक काळातील पहिले अंतराळ स्थानक ‘सॅल्यूट-१’ हे रशियाने १९ एप्रिल १९७१ रोजी अंतराळात स्थापित करण्यात यश प्राप्त केले होते त्यानंतर अत्याधुनिक ‘मीर’ हे स्थानक सुरु झाले. २००१ पर्यंत हे अवकाश स्थानक कार्यरत होते. मात्र त्यानंतर अवकाश स्थानकाची निगा राखण्याचा खर्च परवडत नसल्यानेव रशियाने हे अवकाश स्थानक समुद्रात पाडले. रशिया पाठोपाठ अमेरिकेने स्वत:ची अंतराळ स्थानके सुरु केली. रशिया व अमेरिकेशी स्पर्धा करत चीनने तियांगोंग-१ हे अंतराळस्थानक सुरु केले. यातील अमेरिका व रशियाच्या अंतराळ स्थानकांची मुदत संपली आहे. सध्या फक्त दोन स्थानके असून त्यांच्या पंक्तीत बसण्यासाठी इस्त्रोने कंबर कसली आहे. यावर्षी जुलैमध्ये चंद्रयान २ लाँच होणार आहे. ‘चंद्रयान-२’ श्रीहरीकोट्ट्यावरून १५ जुलै रोजी मध्यरात्री चंद्राकडे झेपावणार आहे. प्रक्षेपणानंतर काही आठवड्यांमध्ये चंद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. हा चंद्राचा असा भाग आहे, जिथे आतापर्यंत कुठलंच अवकाश यान उतरलेले नाही. इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहीमेनंतर गगनयान कार्यक्रम सुरूच ठेवण्यात येणार आहे. यासाठी भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक असावे या दृष्टीने इस्रो योजना बनवली आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत अंतराळात माणूस पाठवण्याचे भारताचे उद्दिष्ट असून गगनयान मोहिमेद्वारे भारताचे हे स्वप्न साकार होणार आहे. इस्त्रोची आजवरची वाटचाल पाहिल्यास संपूर्ण आकाश आपल्या मुठ्ठीत घेण्यास उंच झेप घेतली आहे. यात आपल्या शास्त्रज्ञांना यश मिळणारच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
Post a Comment