इतिहासाची पुनरावृत्ती का नवा अध्याय?

केवळ भारताचेच नव्हे तर संपुर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभेच्या सतराव्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी जाहीर होत आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपाला दणदणीत यश मिळत एनडीएचे सरकार येणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. मात्र विरोधकांनी शायनिंग इंडियाचा दाखला देत भाजपाचा पराभव होण्याचा दावा केला आहे. निकाला जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक असल्याने निकालाची उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. यंदा २०१४ ची पुनरावृत्ती होणार की नवा अध्याय लिहीला जाणार, याचा फैसला निकालानंतरच होईल. स्वातंत्र्यानंतर देशाचा इतिहास पाहिल्यास कॉँग्रेसने आजवर सोळापैकी दहा वेळा सरकार स्थापन केले. त्यापैकी सातवेळा पूर्ण बहुमत होते. तर १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्टीय लोकशाही आघाडीने कार्यकाळ पूर्ण केला. २०१४ मध्ये भाजपचे स्वबळावरील सरकार स्पष्ट बहुमत होते. पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर भाजपला पुन्हा मतदारांनी बहुमत दिल्यास इतिहासाची पुनरावृत्ती होईत. तर पराभव झाल्यास कॉँग्रेससह तब्बल २२ पक्षांनी समविचाराचने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढलेल्या निवडणुकीचा नवा अध्याय लिहीला जाईल.


सोळापैकी दहा वेळा काँग्रेस सरकार 

२०१४ च्या सुरुवातीलाच राष्ट्रीय राजकारात घट्ट पाय रोवणारे व त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणारे नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून अवघ्या चार-पाच महिन्यांनंतर पंतप्रधान होतील, अशी कल्पना कोणीच केली नसेल मात्र मोदींनी तो करिष्मा घडवून आणला. यानंतर मोदींच्या गारुडाने केवळ भारतालाच नव्हे तर संपुर्ण जगला मोहीनी घातली. २०१४ साली आलेल्या मोदी लाटेत काँग्रेससह अनेक विरोधीपक्षांचा धुव्वा उडाला. काँग्रेसचा पराभव करणे ही सोपी गोष्ट नाही. कारण कॉँग्रेसने आजवर सोळापैकी दहा वेळा सरकार स्थापन केले. त्यापैकी १९५२, १९५७, १९६२, १९६७, १९७१, १९८० व १९८४ मध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत होते. चारवेळा बिगरकॉँग्रेस पक्षांची सरकारे आली. यातही केवळ १९७७ मध्ये जनता पक्ष व मावळत्या पंचवार्षिक अर्थात २०१४ मध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. यातही जनता पक्षाच्या १९७७ मधील सरकारने पाच वर्षे पूर्ण केली नाही. प्रथमच सत्तेवर आलेले बिगरकॉँग्रेसी जनता सरकार अडीच वर्षात कोसळले. कॉँग्रेस १९९१ मध्ये सर्वाधिक मोठा पक्ष होता, पण बहुमत नव्हते. काँग्रेसच्या धुरंधरांनी छोटे पक्ष व अपक्षांची एकत्रित मोट बांधत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी बहुमत सिद्ध केले. २००४ व २००९ मध्ये कॉँग्रेसला बहुमत मिळाले नाही. मात्र कॉँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीकडे (युपीए) दहा वर्षे सत्ता होती. याकाळत डॉ.मनमोहनसिंग यांनी सलग दहा वर्ष पंतप्रधान पद भुषविण्याचा विक्रम केला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग १० वर्षे सत्तेवर राहण्याचा मानही मिळवणारे डॉ. मनमोहनसिंग गांधी घराण्याबाहेरचे पहिले पंतप्रधान ठरले. 

विक्रम करण्यासाठी मोदी उत्सूक

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुर्ण पाच वर्ष पंतप्रधान पद भुषविले आहे. २०१९ मध्ये एनडीए सत्तेत आली तर पंतप्रधानपद त्यांच्यांचकडे राहील हे निश्‍चित मानले जात आहे. तसे झाल्यास १० वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचा मान मोदी यांना मिळू शकतो. हा विक्रम करण्यासाठी मोदी देखील उत्सूक आहेत. मात्र नोटबंदी, जीएसटी, बेरोजगारी, काळापैसा आदींचे अडथळे मोदींच्या मार्गात असल्याने यंदा त्यांची जादू चालणार नाही, असा कयास विरोधकांकडून लावला जात आहे. मोदींना रोखण्यासाठी काँग्रेससह तब्बल २२ विरोधपक्ष आपआपसातील मतभेद विसरुन एकत्र आले आहेत. हा देखील एक विक्रमच म्हणावा लागेल. यंदा भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तरी एनडीए बहुमताचा आकडा पार करेल, असा विश्‍वास एनडीएतील घटकपक्षांना आहे. एकंदरीत निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास प्रादेशिक पक्षांचे सहाजिकपणे वजन वाढणार आहे. 

निकाल त्रिशंकू?

संसदेच्या इतिहासात डोकावून पहिल्यास, असे लक्षात येते की, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या १९८४ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रदेशशिक पक्षांचे महत्त्व वाढले. १९९६ साली कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजप सर्वाधिक १६१ जागा जिंकून विरोधी बाकावर होता. तर १४० जागा जिंकून दुसर्‍या क्रमांकावरील कॉँग्रेसला बाहेरून पाठिंबा देत केवळ ४६ जागा जिंकलेल्या जनता दलाने एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. याकाळात देवेगौडांसह गुजराल यांनाही पंतप्रधानपदाची लॉटरी लागली. अशी त्रिशंकू परिस्थिती यंदाही निर्माण होण्याची आशा विरोधक बाळगून आहेत. यासाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देशम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही धाव घेतली आहे. नरेंद्र मोदींच्या कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनीही कंबर कसली आहे. निकाल त्रिशंकू लागल्यास अखिलेश यादव व मायावती यांचेही भाव वाढतील मात्र त्यांनी अद्यापही भुमिका स्पष्ट केलेली नाही. 

देशाला स्थिर व भक्कम सरकारची गरज 

अनेक घटकपक्षांचे नेते दिल्लीत तळ ठोकून असल्याने दिल्लीत जोर बैठका सुरु आहेत. तर काही पक्षांनी निकालानंतर भुमिका स्पष्ट करण्याची सावध खेळी केली आहे. २०१४ मध्ये उधळलेला मोदींचा वारु रोखण्यासाठी राष्ट्रवादी, तेलुगू देसम्, द्रविडीयन पक्ष, अकाली दल, आप, जनता दल, बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्रीय समिती, तृणमूल कॉँग्रेस, डावी आघाडी आदी प्रादेशिक पक्षांची काँग्रेसला कितपत मदत मिळते, याचाही निकाल गुरुवारी लागेल. २०१४ च्या दारुण पराभवानंतर कॉँग्रेसला पुन्हा उभारी मिळणार का? घटकपक्षांच्या आधारे सरकार स्थापन करून कॉँग्रेसविरोधकांच्या पुन्हा सत्तेवर न येण्याच्या परंपरेची पुनरावृत्ती करणार का? याचाही फैसला गुरुवारी होईल. यंदा सत्ता कोणाचीही येवो, मात्र देशाला स्थिर व भक्कम सरकारची गरज आहे. देव करो आणि पुढील पाच वषर्र्र्े देशाला स्थिर सरकार लाभो!

Post a Comment

Designed By Blogger