लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांनी पुन्हा एकदा विश्वास टाकत भाजपाला स्पष्ट बहुमत दिले आहे. २०१४ मध्ये मोदी लाट होती, असे वारंवार बोलले जाते मात्र यंदाच्या निकालाची आकडेवारी पाहता यंदा तर ‘मोदी’ त्सुनामी आली आहे, असे वर्णन भाजपाच्या विजयाचे करावे लागेल. भाजपाप्रणित एनडीएने ५४२ पैकी तब्बल ३४५ जागांवर यश संपादन करत विरोधकांच्या चारिमुंड्या चीत केल्या आहेत. या निकालामुळे मोदी लाट ओसरली म्हणणार्यांना जोरदार चपराक बसली असून, संधीसाधू राजकारण्यांनाही त्यांची जागा दाखवली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु, इंदिरा गांधी व डॉ. मनमोहन सिंग यांच्या नंतर सलग दोनवेळा पंतप्रधानपद भुषविण्याचा मान मोदींना मिळणार आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देशाच्या इतिहासात सलग दोन वेळा काँग्रेसेतर सरकार पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करणार आहे. हे केवळ मोदी करिष्म्यामुळेच शक्य झाले आहे.
देशात वर्षानुवर्षे भारत आणि काँग्रेस हे समीकरण
आपल्या देशात वर्षानुवर्षे भारत आणि काँग्रेस हे एकच समीकरण होते. कॉँग्रेसने आजवर सोळापैकी दहा वेळा सरकार स्थापन केले. त्यापैकी १९५२, १९५७, १९६२, १९६७, १९७१, १९८० व १९८४ मध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत होते. चारवेळा बिगरकॉँग्रेस पक्षांची सरकारे आली. कॉँग्रेस १९९१ मध्ये सर्वाधिक मोठा पक्ष होता पण बहुमत नव्हते. काँग्रेसच्या धुरंधरांनी छोटे पक्ष व अपक्षांची एकत्रित मोट बांधत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी बहुमत सिद्ध केले. २००४ व २००९ मध्ये कॉँग्रेसला बहुमत मिळाले नाही. मात्र कॉँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीकडे (यूपीए) दहा वर्षे सत्ता होती. यामुळे काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाहीच जणू! असे चित्र निर्माण झाले होते. यास तडा गेला तो २०१४ मध्ये, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले.
मोदी नावाची त्सुनामी
पाच वर्षात मोदींचा डंका केवळ देशातच नव्हे तर परदेशातही वाजला मात्र नोटाबंदी, जीएसटी, काळापैसा, शेतकरी आत्महत्या, महागाई आदी धोरणांवरुन मोदींवर टीकाही झाली. परिणामी लोकसभा निवडणुकीच्या चार-पाच महिने आधी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा पाच राज्यांमध्ये पराभव झाला. तेव्हापासून मोदी लाट ओसरली अशी चर्चा सुरु झाली. गुरूवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर खरोखरच मोदी लाट ओसरली असून, मोदी नावाची त्सुनामी आल्याचा प्रत्यय आला. यंदा मोदींच्या विरोधात एक, दोन नव्हे तर तब्बल २१ विरोधी पक्ष एकत्र आले होते. आपल्या महाराष्ट्रात ‘मोदी मुक्त देश’ असा आक्रमक पवित्रा घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला होता. लोकसभा निवडणुकीत उभे न राहता राज यांनी ‘लाव रे तो व्हीडिओ’ म्हणत भाजपा विरोधात जोरदार प्रचार केला. मात्र ‘अबकी बार तीनशे पार’चे चित्र निकालानंतर समोर आले. त्यामुळे राज यांचा ‘लाव रे तो व्हीडिओ’चा प्रभाव शून्य ठरला.
ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू यांना धक्का
देशपातळीवर बोलायचे म्हटल्यास मोदी-शहा यांच्या कट्टर विरोधक म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर उघडपणे आक्रमक भूमिका घेतली. एक्झिट पोलमध्ये भाजपाला बहुमत मिळणार असे कल समोर आल्यानंतरही केंद्रात तिसर्या आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या चार दिवस आधी विरोधी पक्षांची मोट बांधणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला. आंध्रात जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेसला क्लिन स्वीप केलेे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही चंद्राबाबूंना सपाटून मार खावा लागल्याने त्यांचे मुख्यमंत्रीपदही जाण्याची शक्यता आहे. या विजयाचे श्रेय गेल्या पाच वर्षात सरकारने लागू केलेल्या विविध योजनांना द्यायला हवे. निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणावर याचा मोठ परिणाम होणार, हे निश्चित आहे.
राष्ट्रवादाचा फॉर्म्युला हिट
नरेंद्र मोदी हे भाजपाचा चेहरा आहेत. या यशामुळे देशात आणि जगात मोदी हे एक मोठा ब्रॅण्ड म्हणून अधिक मोठे होतील. मोदींना मिळालेल्या या यशामुळे त्यांचा राष्ट्रवादाचा फॉर्म्युला हिट ठरला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर बालकोटमध्ये भारतीय हवाई दलाने घुसून एअर स्ट्राईक केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय लोकांच्या पसंतीस उतरला. त्यात मोदींनी आणि भाजपाने या एअर स्ट्राईकचा पुरेपूर वापर निवडणुकीच्या प्रचारात करुन घेतला. देशभक्ती, दहशतवाद हे मुद्दे प्रामुख्याने निवडणुकीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू बनले. नवीन मतदारांना आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जवानांसाठी मतदान करा असा उल्लेख केला त्यामुळे देशभक्तीचा मुद्दा हा भाजपाच्या विजयाचे प्रमुख कारण ठरला.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
भाजपा सरकारने गेल्या ५ वर्षात अनेक योजना आणल्या. ५ वर्षात स्वच्छ भारत अभियान सुरु करुन गावागावांत शौचालय निर्मिती, उज्ज्वला योजनेतंर्गत गॅस सिलिंडर, प्रत्येकाला घर यासारख्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यात भाजपाला यश आले. या योजनांचे मार्केटिंग करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहचविण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपाने निवडणुकीच्या प्रचारात आणखी एक मुद्दा प्रामुख्याने घेतला तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पंतप्रधानपद यशस्वीरित्या सांभाळेल असा कोणताही नेता विरोधी पक्षात नाही. मोदींना पर्याय कोण? असा प्रचार भाजपा कार्यकर्त्यांकडून केला गेला. याचाही फायदा भाजपाला झाला. काँग्रेसने ही निवडणूक गमावल्याने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यांनी राफेल करार, शेतकरी आणि बेरोजगारीवरुन उपस्थित केलेले मुद्दे फेल ठरले आहेत. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी व त्यांच्यासोबत २३ विरोधी पक्ष अशीच होती. यामुळे या सर्वांना पराभूत करुन ते नरेंद्र ‘बाहुबली’ ठरले आहेत यात तिळमात्रही शंका नाही. संपूर्ण देशाने त्यांच्यावर पुन्हा एकदा १०० टक्के विश्वास दर्शविला आहे. त्यांच्याकडून देशवासियांना मोठ्या अपेक्षा आधीही होत्या, त्या आता कितीतरी पटीने वाढल्या आहेत. सलग दुसर्यांना त्यांना एकहाती सत्ता मिळाली असल्याने आता ते कोणतीही सबब देवू शकत नाही. मोदीजी सर्वसामान्यांच्या सर्व अशा आकांक्षा पूर्ण करोत, ही अपेक्षा ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूपखूप शुभेच्छा!
Post a Comment