केंद्रात पाच वर्षे पूर्ण बहुमताची सत्ता गाजविल्यानंतर १७व्या लोकसभेत पुन्हा ३०० च्यावर जागा मिळवत सत्तेत परतण्याचा इतिहास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने रचला. २०१४ नंतर स्वबळावर बहुमतासह २०१९ मध्ये सलग दुसर्यांदा सत्ता मिळवून नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कामगिरीची बरोबरी करताना विरोधकांची पार वाताहत केली. या निवडणुकीत देशातील २३ राज्यांतून काँग्रेसजवळपास हद्दपार झाली आहे. या २३ पैकी १७ राज्य काँग्रेसमुक्त झाले आहेत, तर ६ राज्यांत काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. याचे श्रेय मोदींच्या नेतृत्त्वासह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रणनितीला जाते. पक्ष बांधणीसह तिकीट देतांना केवळ मेरिटचा निकष लावण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला, यामुळे काही नेते नाराज झाले मात्र निकालानंतर ‘शहानिती’ योग्यच असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले.
यशात अमित शहांचा मोठा वाटा
२०१४ मध्ये भाजपाला मिळालेल्या यशाचे मोठे श्रेय हे मोदी वा त्यांचे सल्लागार अमित शहा यांच्याऐवजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारातील अनागोंदीकडे जाते. मात्र आता २०१९ मधील यशात अमित शहांचा मोठा वाटा आहे. पक्षबांधणीसह हिंदूत्त्व, राष्ट्रवाद याचा शहांनी योग्य वापर करुन घेतला. अमित शहा यांनी लोकसभेच्या ५४३ जागांसाठी पक्षाकडून ६०० कार्यकर्त्यांना पूर्णवेळ कामासाठी नियुक्त केले. त्यापैकी ५४३ जणांवर लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच ज्या लोकसभेच्या जागांवर भाजपाचा जोर नाही अशा जागांसाठी ५-५ सुपरवायझरही नियुक्त करण्यात आले होते. तसेच साडेतीन लाख कार्यकर्त्यांनी एकत्रित दीन दयाल विस्तारक योजनेअंतर्गत पक्षाच्या सक्षमीकरणासाठी बूथ लेवलवर काम केले होते. तसेच ४ हजार कार्यकर्त्यांना सहा महिन्यांपासून एका वर्षापर्यंत पूर्ण वेळ वॉलेंटियर्स म्हणूनही काम सोपवण्यात आले होते. ज्या ठिकाणी भाजपाची पकड कमी होती, अशा १२० पेक्षा अधिक जागांवर शाह यांनी विशेष लक्ष दिले होते. या जागांचा शाह यांनी विशेष आढावा घेतला होता. तसेच त्यांनी केंद्रीय युनिटशी जोडलेल्या १९ विभागांच्या कामांवरही विशेष लक्ष दिले होते. याच ‘शहानिती’चा भाजपाला फायदा झाला.
... म्हणून यशाची पुनरावृत्ती
निवडणुकच्या पहिल्या दोन टप्प्यात मोदी सरकारच्या गत पाच वर्षातील विकास कामांवर भर देण्याची रणणिती भाजपाने आखली होती. त्यात शेतकर्यांना कर्जमाफीचे भाजपने जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन, पीक विमा योजना, गरीबांना मुद्रा योजनेतून कर्ज, जनधन खात्यातून सरकारी सबसिडी, गरीबांना शौचालयासाठी आर्थिक मदत, प्रत्येक गरीबाला पक्के घर, उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन अशा विविध कल्याणकारी योजनांचे भांडवल करण्यात आले. मतदानाच्या दोन टप्प्यांनंतर शहांनी हिंदुत्वाचा आक्रमकपणे पुकारा सुरु केला. तो हिंदी पट्ट्यात लाभाचा ठरला. परिणामी २०१४ च्या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशाची पुनरावृत्ती केली.
अमित शहाच्या रणनीतीपुढे विरोधक गारद
उत्तर भारतात भाजपच्या जागा कमी होतील, या शक्यतेचा विचार करून शहांनी त्यावर मात करण्याची जोरदार तयारी केली होती. उत्तरेतील कमी होणार्या जागा पश्चिम बंगाल, ओडिशा आणि ईशान्य भारतातून भरून काढण्याची रणनीती शहा यांनी अत्यंत योजनाबद्धरीत्या राबवली. हे करताना उत्तरेत कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठीची बांधणीही ताकदीने केली. अमित शहा यांनी सर्वात आधी उत्तर प्रदेशला आपले कार्यक्षेत्र बनवले. त्यानंतर त्यांनी त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि ओडिशाला आपले कर्मक्षेत्र बनवले. बिहारमध्ये गठबंधन तारण्यासाठी भाजपने २०१४मध्ये जिंकलेल्या २२ जागांपैकी केवळ १७ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गिरिराज सिंह सारख्या दिग्गज नेत्यालाही सीट नाकारली. शहांचा हा धाडसी निर्णय होता. जातीच्या राजकारणाचा वापर कसा करावा, हे अमित शहा जाणतात. त्याचा त्यांनी उत्तम वापर उत्तर प्रदेशमध्ये केला. अमित शहा यांच्या निवडणूक लढण्याची रणनीती विरोधकांनाही ठाऊक आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे स्पष्ट दिसून आले. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात याचा प्रत्यय आला. भाजप महागठबंधनपासून वाचण्यासाठी त्यांनी वेगळी रणनीती आखली.
हार्डकोअर हिंद्त्व
भाजपाला मिळालेले हे यश हा योगायोग नाही, हे अमित शहा यांच्या धूर्त रणनीतीने पुन्हा सिद्ध करून दाखविले. मोदीलाट मे २०१४ इतकीच प्रभावी ठरली. इतकी की, उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघामध्ये भाजप उमेदवारांनीच बाजी मारली. लोकसभेत भोपाळमधून हिंदूत्वच्या मुद्यावर त्यांनी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी तिकीट दिले. यावरुनही अनेक वाद झाले. त्यामुळे मोदी यांच्या भाषणाचा फायदा झाला असला तरी, अमित शाहा यांच्या निर्णयांचा भाजपला जास्त फायदा झाला आहे. मोदींच्या चेहर्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चतुरस्र रणनीतीची जोड देत भाजपच्या सर्वात मोठ्या विजयाचा इतिहास रचला.
शहांपुढे प्रियांकास्त्र फेल
या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाची जबाबदारी पक्षाने प्रियंका यांच्यावर सोपवण्यात आली. उत्तर प्रदेशच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून अस्तित्वासाठी झगडत असलेल्या आपल्या पक्षास प्रियांका यांच्या नेतृत्वामुळे नवसंजीवनी मिळेल ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा मात्र साफ फोल ठरली. शहांपुढे प्रियंका गांधी नावाचे काँग्रेसचे कथित ब्रह्मास्त्र निष्प्रभ ठरले. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला पहिल्यांदाच मोठा विजय मिळाला. गेल्या निवडणुकीत २ जागा जिंकणार्या भाजपाने तब्बल १८ जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या तोंडचे पाणी पळवले. गेल्या दोन वर्षांपासूनच अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विजयाचे प्रयत्न सुरू केले होते. निवडणुकीपूर्वीच केंद्रात पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असतानाच शाह यांनी पश्चिम बंगालकडेही आपला मोर्चा वळवला होता. हिंदुत्व आणि घुसखोरीसारखे महत्त्वाचे मुद्दे शहांनी उचलून धरले. अन्य राज्यांच्या तुलनेत त्यांनी पश्चिम बंगालमध्ये आक्रमकतेवर भर दिला. ज्याचा भाजपाला मोठ्याप्रमाणात फायदा झाल्याने निकालानंतर स्पष्ट झाले. राजकारणात चाणक्यनितीचा वर्षानुवर्षे वापर होत आला आहे. मात्र आता ‘शहानिती’ हा १०० यशाचा हिट फॉम्यूला ठरत आहे. या निकालामुळे शहांचे राजकीय वजन निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढले असून मोदी सरकार २.० मध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे.
Amit Shah, BJP, Narendra Modi, Loksabha Election, Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Post a Comment