गांधी परिवाराव्यातिरीक्त अध्यक्षाची चर्चा निरर्थक!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची दाणादाण उडाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. परिणामी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला. मात्र गांधी घराण्याची सवय लागलेल्या काँग्रेसच्या पचनी हे पडणे कठीण असल्याने पराभवावर मंथन करण्याऐवजी राहुल गांधींचे गुणगान करत चापलुसीची परंपरा काँग्रेस नेत्यांनी कायम ठेवली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि चिदंबरम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षहितापेक्षा मुलांना अधिक महत्त्व दिले. त्यामुळे दुसर्‍या मतदारसंघात त्यांनी लक्ष दिले नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी या नेत्यांना सुनावत स्वत:चे अपयश लपविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी राहुल यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध लढण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना एकट्याला सोडून दिले, अशा शब्दांत एकाप्रकारे राहुल यांच्या अपयशावर पांघरुण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. या पार्श्‍वभूमीवर गांधी परिवाराच्या व्यतिरिक्त अध्यक्ष ही चर्चा निरर्थक असल्याचे स्पष्ट होते.


गांधी परिवाराला धक्का

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसचा अत्यंत वाईट पराभव झाला होता. त्यापाठोपाठ २०१९ मध्येही काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झाली. २०१४ साली त्यांच्या पक्षाला केवळ ४४ जागा मिळाल्या होत्या. मात्र तेव्हा राहुल यांना पराभवासाठी पूर्णपणे जबाबदार ठरवले नव्हते, कारण तेव्हा ते पक्षाध्यक्षही नव्हते. परंतु त्यानंतर अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला पराभव सहन करावा लागला. यास अपवाद पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा म्हणावा लागेल. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गांधी परिवाराला खूप मोठा धक्का दिला आहे. राहुल गांधी यांच्या खांद्यावर नेहरू-गांधी घराण्याच्या वारसाचा भार आहे. त्यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले आणि सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले नेते होते. त्यांची आजी इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या, तर त्यांचे वडील राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. त्यांच्या आई सोनिया गांधी या सलग दहा वर्षे युपीएच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे नामधारी पंतप्रधान होते, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. या तुलनेत राहुल गांधींची कामगिरी अत्यंत सुमार ठरली आहे.

राहुल गांधींची धोरणे कारणीभूत

यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या तर तब्बल १८ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. हे अपयश अचानक आलेले नाही, मुळात राहुल गांधी यांची धोरणे चुकत गेली. कधी ते कन्हैय्याच्या तुकडा तुकडा गँगमध्ये सामील झाले तर कधी पाकिस्तानचे गुणगाण करणार्‍या सिद्धू यांना जवळ केले. दिल्लीत आम आदमी पक्षाशी हातमिळवणी करण्याची गरज होती पण शीला दीक्षित यांचा विरोध होता. त्याचे परिणाम काय झाले हे सगळ्यांसमोर आहे. शीला दीक्षित तर पडल्याच, मात्र त्यांनी दिल्लीत काँग्रेसला संपविले. आंध्रात राहुल यांनी चंद्राबाबू नायडू यांना जवळ केले मात्र एकेकाळच्या स्वपक्षीय जगन रेड्डी यांना दूर लोटले. असे अनेक ठिकाणी झाले. परिणामी काँग्रेस अनेकांपासून तुटला. यास राहुल गांधींची धोरणे कारणीभूत आहेत. काँग्रेसमध्ये इतके दिग्गज असतांना कोणालाच यातील चुका लक्षात येवू नये याचे मोठे आश्‍चर्य वाटते.

राहुल यांना अमित शाह यांच्यासारख्या सहकार्‍याची गरज

निवडणूक प्रचारादरम्यान सातही टप्प्यांमध्ये नरेंद्र मोदी व अमित शहा यांची रणनीती वेगळी होती. त्यांचे आरोप-प्रत्यारोप वेगळे होते. परंतु राहुल हे राफेल व चौकीदार चोर हैं यांच्या बाहेर शेवटपर्यंत निघालेच नाहीत. दुसरीकडे मोदी-शहा या जोडीने सर्वसामान्यांच्या मनाला साद घालणारे मुद्दे उचलले. राष्ट्रवाद, देशभक्ती, विकासकामे यांचा योग्य पध्दतीने वापर केला. मोदींनी जेव्हा पंडित नेहरु व राजीव गांधींवर हल्ला चढविला तर तेव्हा त्याला देखील काँग्रेसने योग्य प्रत्युत्तर दिले नाही. त्यांनी केवळ हवेत तीर सोडले. अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या ऐवजी त्यांचे राजकीय गुरु माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचा दाखला देणे अपेक्षित होते, मात्र राहुल गांधी नेहरु व राजीव गांधींच्या बाहेर निघालेच नाहीत. राव पंतप्रधानपदी आले तेव्हा सोने गहाण ठेवण्याची वेळ देशावर आली होती आणि आठवडाभराची परदेशी देणी चुकवता येतील इतकेच परकीय चलन तिजोरीत होते. परंतु त्यानंतर राव यांनी अत्यंत धीराने आाणि धोरणीपणाने पावले टाकली आणि अवघ्या २८ महिन्यांत देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र पूर्ण बदलले. त्यांनी साधलेली आर्थिक प्रगती कोणत्याही सरकारला साधता आलेली नाही, मात्र त्यांचे कौतुक करण्याचे मोठेपण राहुल यांनी किंवा काँग्रेसच्या अन्य कोणत्याही नेत्याने दाखविले नाही. यामुळे राहुल यांना अमित शाह यांच्यासारख्या सहकार्‍याची गरज आहे, असा सूर काँग्रेसमध्ये आता उमटू लागला आहे.

कर्तृत्ववान काँग्रेसजनांचा शोध घ्यावा

काँग्रेसच्या या दयनीय अवस्थेनंतरही योग्य सल्ला देण्याऐवजी नेते जर खुशमस्करीमध्ये गुंतले असतील तर पक्ष कशी उभारी घेणार? यास काही ठळक उदाहरणे द्यावयाची म्हटल्यास, एकीकडे राहुल यांनी चिदंबरम यांच्यावर नाराजी व्यक्त केली असतांना चिदंबरम यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, असे केल्याने दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील असे ते म्हणाले. हा प्रकार जरा अतीच वाटतो. राहुल गांधी यांनी पदत्याग केल्यास काही सदस्यांनी प्रियांका गांधी यांचे नाव सुचवले. मात्र पुढील अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती असावी, असा आग्रह राहुल गांधी यांनी धरला. त्यानंतर पक्षाध्यक्ष पदासाठी ए. के. अ‍ॅन्टोनी, कॅप्टन अमरिंदरसिंग, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे यांची नावे चर्चेत आली आहेत. मात्र काँग्रेसचा इतिहास पाहता गांधी परिवाराव्यतिरीक्त अन्य कोणत्याही नेत्याकडे पक्षाची धुरा देण्याची शक्यता जवळपास नाही. राहुल गांधी यांना काँग्रेसने बदलावे असे वाटत असेल तर त्यासाठी आपली आई, बहीण आणि दिवंगत वडील यांच्या पलीकडच्या कर्तृत्ववान काँग्रेसजनांचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना पुढे करावे लागेल. जे शक्य नाही. मग काँग्रेसची कितीही वाताहत झाली तरी चालेल. या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे राहुल गांधी यांना हटवून अन्य अध्यक्षाकडे काँग्रेसची धुरा सोपविण्यात येईल याची चर्चा होणे, हे सपशेल नाटकी वाटते!

Post a Comment

Designed By Blogger