महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली. कोकण, पुणे, लातूर, औरंगाबादमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या जास्त आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८२.४० टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९०.२५ टक्के आहेत. सालाबादाप्रमाणे यशाला गवसणी घालण्याची परंपरा मुलींनी यंदाही कायम ठेवली आहे. मुलींची ही यशाची भरारी डोळ्यात भरणारी आहे. याचे निश्चितच कौतुक आहे. मुलींचे शिक्षण हे प्रगतीचे लक्षण आहे. यंदाच्या निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे लक्षात येते की, यंदा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मुलींनी मोठी आघाडी घेतली आहे. मुलींच्या शिक्षणासाठी शहरी भागातील पालक जागरूक असतात, त्या तुलनेत ग्रामीण भागातील पालकांमध्ये तेवढी उत्सुकता व जागरूकता दिसत नाही. ग्रामीण भागातील पालक स्वतः शिक्षणाच्या बाबतीत अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटत नाही. असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात असतांना सावित्रीच्या लेकींनी मिळवलेले यश निश्चितच अभिमानास्पद आहे.
मुलींना शिक्षण देणे गरजचे
मंगळवारी इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत मुलींनी घवघवीत यश संपादन केल्याचे पाहून खूप बरे वाटले. असे म्हणतात मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी संपूर्ण कुटूंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते. संपूर्ण कुटूंब तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्री उद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे. आपल्या देशात विविध क्षेत्रात महिलांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले गेले आहे. त्यांच्यासह अनेक राज्यांमध्ये महिलांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. मावळत्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्यासह केंद्रीय मंत्री म्हणून सुषमा स्वराज, स्मृती इराणी, निर्मला सितारमण यांनी नारी शक्ती काय करु शकते हे केवळ देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. देशाच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर, क्रीडा क्षेत्रात पी. टी. उषा यांच्यापासून कविता राऊत, मल्लेश्वरी, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, मिताली राज इत्यादी सर्व महिलांनी आपल्या अपूर्व योगदानाने देशाला यशोशिखरावर नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाबाबत अनास्था
बारावीच्या परीक्षेत मुलींनी मिळवलेले हे यश म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे. मुलींनी हे जे यश संपादन केले आहे ते खरेच कौतुकास्पद आहे. कारण त्यांना घरातील संपूर्ण कामे करावी लागतात आणि कामानंतर संपूर्ण रात्र-रात्र जागून, डोळ्यात तेल घालून अभ्यास करावा लागतो म्हणून त्यांना आज हे यश प्राप्त झाले आहे. मात्र, मुलींच्या प्रगतीसाठी आपल्याकडे खरोखरच पोषक वातावरण आहे का? याचा विचार केल्यास नकारात्मक उत्तरे मिळतात. त्यास अनेक कारणे आहेत. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाबाबत समाजात व सरकारी पातळीवर प्रचंड अनास्था दिसून येते. याची सुरुवात घरापासूनच होते. शहरी भागात हा दुजाभाव नाही, असे ठामपणे म्हणता येणार नाही मात्र त्याचे प्रमाण कमी आहे, याचाच तेवढाच दिलासा!
मुलांच्या व मुलींच्या शिक्षणाबाबत दुजाभाव
शिक्षण हा मानवी जीवन विकासाचा मुख्य स्त्रोत आहे. शिक्षण घेतल्यामुळे आपल्या जीवनाला एक दिशा मिळते, संजीवनी मिळते. असे असले तरी समाजात आजही मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत पालक जागरुक नाहीत, असे म्हणण्यापेक्षा मुलांच्या व मुलींच्या शिक्षणाबाबत दुजाभाव करीत असतात. मुलगी शिकून काय करणार? ही पालकांची भावना अजूनही दूर झालेली नाही. पूर्वी ग्रामीण भागात शाळा होत्या पण शाळेत मुलींना पाठवले जात नसे. कालांतराने मुलीही शाळेत जायला लागल्या पण सहावी-सातवीनंतर त्यांची शाळा थांबायची. नंतर हे चित्र हळूहळू बदलू लागले. गावात शाळा नसेल, तर तालुक्याला आणि जिल्ह्याच्याही ठिकाणी खेड्यापाड्यातील मुली शिकताना दिसू लागल्या. यासाठी शासनानेही मोलाचा हातभार लावला. प्राथमिक शिक्षणात सर्व शिक्षा अभियान मोहिमेमुळे मुलींच्या शिक्षणाला प्रेरणा मिळाली. शासनाने मुलींच्या शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मुलींचा उपस्थिती भत्ता, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मोफत गणवेश, मोफत पुस्तके, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, विद्यावेतन, शाळेला ये-जा करण्यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजना, एसटीने मोफत प्रवास करण्यासाठी अहिल्याबाई होळकर योजना, कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालय, मानव विकास योजना तसेच लेक वाचवा लेक शिकवा यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी शासन प्रयत्न करीत होते आणि करीत आहे. त्यांना त्यात काही अंशी यश मिळाले, हे नाकारुन चालणार नाही. मात्र ही दरी अजूनही मिटलेली नाही.
‘त्यांना’ पश्चाताप होईलच
यंदा बारावीच्या परीक्षेत मुलींनी मिळवलेले यश निश्चितच प्रेरणादायी ठरु शकते. मुलींनी मिळवलेल्या यशामुळे ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलीला जन्माला येण्याआगोदरच तिचे जीवन संपवले आहे अशा आई-वडिलांना आज या मुलींची गुणवत्ता व कार्य बघून नक्कीच पश्चाताप झाल्याशिवाय रहणार नाही. मात्र येथे अर्थात समाजाची व शासनाची जबाबदारी संपली, असे नाही. कारण, या मुलींच्या यशामुळे अन्य मुलींना प्रेरणा मिळाली आहे मात्र, त्यापैकी अनेकांकडे इच्छा असूनही सोयीसुविधा नाहीत किंवा शिक्षणासाठी पोषक असे वातावरण नाही. यासाठी प्रत्येकाने जबाबदारी उचलायला हवी. मुलींच्या शिक्षणाबाबत जनजागृती निर्माण करायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलगी घराबाहेर पडल्यानंतर ती सुरक्षित आहे, असा विश्वास तिच्यासह तिच्या कुटुंबाला देखील देण्याची जबाबदारी समाजाचीच आहे. हा चमत्कार एका रात्रीतून होणारा नाही मात्र त्या बदलाच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे. तेव्हाच खर्या अर्थाने नारीशक्तिचे स्वप्न पूर्ण होईल.
Post a Comment