मोदींच्या ‘नव्या भारता’ने पाकिस्तानला लाथाडले!

लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश संपादन केल्यानंतर नरेंद्र मोदी आज, ३० रोजी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात अत्यंत साध्या पण देखण्या समारंभात शपथविधी पार पडणार असून, या कार्यक्रमाला १४ राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ च्या निवडणुकीनंतर शपथविधी सोहळ्याला सार्क देशांना आमंत्रित केले होते. त्यात पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा समावेश होता. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबाबत आक्र्र्र्र्र्र्रमक भूमिका घेतली असून, यंदा पाकिस्तानला लाथाडत शपथविधी सोहळ्याला ‘बीमस्टेक’ समुहाला आमंत्रित केले आहे. यात बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळच्या पंतप्रधानांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. मोदींच्या या भूमिकेमुळे भारत आगामी काळात पाकिस्तानचे कोणत्याही प्रकारे लाड करणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.


काश्मीर हा शत्रूत्त्वाचा मुख्य मुद्दा

कुत्र्याची शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ती सरळ होत नाही हे पाकिस्तानला तंतोतंत लागू पडते. भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी भारताने कितीही वेळा मैत्रीचा हात पुढे केला तरी पाठीमागून वार करण्याची पाकिस्तानची खोड अद्यापही गेलेली नाही. काश्मीर हा शत्रूत्त्वाचा मुख्य मुद्दा आहे. पाकिस्तानी लष्करात एक भीतीगंड आहे - ‘भारत आपल्याला गिळेल, आपले आणखी तुकडे पाडेल’. काश्मीरचा मुद्दा काढून इस्लामी आणि मित्र देशांकडून शस्त्रे आणि पैसे उकळणे हा पाकिस्तानचा धंदा आहे. काश्मीरचा प्रश्न सुटला तर पैशाचा ओघ थांबेल ही लष्कर आणि सरकारची भीती आहे. त्यामुळे काहीही करून काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानला पेटता ठेवायचा आहे. ही कटूता कमी करण्यासाठी २०१४ मध्ये पहिल्यांदा मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी जुने झाले गेले ते विसरुन पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले. त्यांच्या आईला साडी-चोळी पाठवली. एवढेच नव्हे तर त्यांच्या कौटुंबिक कार्याक्रमाला सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून हजेरी लावली. मात्र, पाकिस्तानने त्याची परतफेड भारतात दहशतवादी हल्ले घडवून केली. पठाणकोट व उरी हल्ल्यानंतर भारताने मवाळ धोरणाला तिलांजली देत घरात घुसून मारत बदला घेतला. सर्जिकल स्ट्राईक व पुलवामा हल्ल्यानंतर थेट एअरस्ट्राईक करत ‘ये नया भारत है’ हे भारताने दाखवून दिले. याची धास्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी इतकी घेतली आहे की, ते सध्या मोदींच्या नावाचा जप करत भारत-पाक मैत्रीचे गीत गात फिरत आहे. 

सार्क ऐवजी ‘बीमस्टेक’ देशांच्या नेत्यांना निमंत्रण

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पाक पुरस्कृत दहशतवाद हा भाजपचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. त्याचवेळी त्यांचे धोरण काय असेल? याची प्रचिती आली. आता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची दुसर्‍यांदा शपथ घेत असतांना ते पाकिस्तानला आमंत्रित करतात का? याकडेही जगभरातील विश्‍लेषक व तज्ञांचे लक्ष लागून होते. मात्र भारताने यावेळी पाकिस्तानला मोदींच्या शपथविधीपासून दूर ठेवण्यासाठी सार्क ऐवजी ‘बीमस्टेक’ देशांच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. यातून दहशतवादी कारवाया आणि पाकिस्तानसोबत चर्चा एकाचवेळी होऊ शकणार नाही हे भारताचे पाक संदर्भातील धोरण सुरूच राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त स्पष्ट झाले आहे. यावरुन पाकिस्तानचा जळफळाट झाला असून, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी स्वत:च्या देशाची बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. भारताच्या अंतर्गत राजकारणामुळे पाकिस्तानला निमंत्रण देण्यात आलेले नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण प्रचार पाकिस्तानवर केंद्रीत करण्यात आला होता. यातून ते लवकर बाहेर येतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. भारतातील राजकारण त्यांना पाकिस्तानला निमंत्रण देण्यास परवानगी देणार नाही. काश्मीरच्या मुद्यावरून दोन्ही देशांतर्गत संवाद होणे गरजेचे आहे. याबरोबरच सियाचीन आणि सरक्रीक यावरील वादांवरही चर्चा होणे शपथग्रहण कार्यक्रमापेक्षा आवश्यक आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानची ही भूमिका म्हणजे ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’, अशीच आहे. आतापर्यंत भारतात जे पण सरकार आले त्यांनी पाकिस्तानबाबत मवाळ धोरणच स्वीकारले होते. यास अटलजींचे सरकारही अपवाद नव्हते. भारताच्या चांगुलपणाला कमजोरी समजत पाकिस्तानच्या कुरापाती सुरुच राहिल्या, मात्र जी चूक आधीच्या पंतप्रधानांनी केली ती मोदी करणार नाहीत याची जाणीव पाकिस्तानला झालेली आहेच. 

दहशतवाद संपत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा न करण्याचे धोरण

मुळात मोदी यांची ओळख कट्टर हिंदुत्त्ववादी अशी असली तरी प्रखर राष्ट्रवाद त्यांनीच रुजवला आहे. याची झलक कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या बाबतीत पहायला मिळाली. चीनसारख्या बलाढ्य देशाचे सुरक्षाकवच भेदत भारताने त्यास आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करुन दाखविले आहे. भारताची सहनशीलता संपल्याने आता भारताने सर्व आघाड्यांवर दहशतवादाविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. दहशतवाद संपत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा न करण्याचे सरकारचे धोरण योग्यच असून, १३ व १४ जून रोजी किरगिझस्तान येथे होत असलेल्या शांघाय सहकार्य परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीबाबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. ३० रोजी, दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यापेक्षा अधिक आक्रमकतेने कामाला लागतील हे त्यांच्या देहबोलीवरुन दिसत आहे आणि तसे संकेतही त्यांनी वेळोवेळी दिले आहेत. पाकिस्तानबरोबर युध्द भारतालाही नको असले, तरी दहशतवादाविरोधात सुरु केलेली लढाई आगामी काळात अधिक तेज करण्याची आवश्यकता आहे. जसे शपथविधी कार्यक्रमाला आमंत्रित न करुन पाकला त्याची जागा दाखवून दिली आहे तशीच आक्रमक धोरणे आगामी काळातही मोदींकडून अपेक्षित आहेत. यात त्यांना यश मिळो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करत दुसर्‍या टर्मसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूप खूप शुभेच्छा...! 

Post a Comment

Designed By Blogger