क्रिकेटचा महाकुंभमेळा समजल्या जाणार्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या महासंग्रामाला गुरुवारपासून सुरूवात झाली आहे. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या या १२व्या पर्वात जगातील अव्वल १० देश जगज्जेतेपदावर आपली नाममुद्रा कोरण्यासाठी एकमेकांशी पुढील दीड महिना झुंजणार आहेत. क्रिकेटच्या जन्मदात्या म्हणून ओळखल्या जाणार्या इंग्लंडला गेल्या ४४ वर्षांपासूनचा विश्वचषक विजयाचा दुष्काळ संपवता आलेला नाही. मात्र यंदा मायदेशातील खेळपट्ट्या चाहत्यांचा पाठिंबा आणि गेल्या वर्षभरातील दिमाखदार कामगिरीमुळे साहजिकच यजमान इंग्लंडला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. इंग्लंडसोबत टीम इंडियाबाबत उत्सुकता आहे. याआधी दोन वेळा विश्वचषकाला गवसणी घालणारा आपला भारतीय संघही या वेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सज्ज आहे. गेल्या एक-दोन वर्षांपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी दमदार होत असल्याने भारताला विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.
राऊंड रॉबिन पद्धतीनुसार सामने
तब्बल १५० खेळाडू आणि १० संघांतील तुंबळ लढती वन-डे क्रिकेट वर्ल्डकपच्या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहेत. क्रिकेट विश्वचषकाच्या थराराला उच्चतम पातळीवर नेण्यासाठी तब्बल ४६ दिवस रंगणार्या या महासंग्रामात राऊंड रॉबिन पद्धतीनुसार एकूण ४८ एकदिवसीय सामने होणार आहेत. विश्वचषकात १९९२ नंतर प्रथमच राउंड रॉबिन पद्धतीने सामने खेळवण्यात येत आहेत. साखळीत प्रत्येक संघ एकमेकांशी भिडणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विजय मिळवून बाद फेरी गाठताना सर्व संघांची कसोटी लागणार आहे. प्राथमिक फेरीत पहिल्या चार स्थानांवर राहणारे संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यामुळे यंदा सर्वच संघांना उपांत्य फेरी गाठण्याची समान संधी मिळणार आहे. साहजिकच स्पर्धेत चुरसही अधिक दिसून येणार आहे. विशेष म्हणजे सर्वच संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने या वेळी अनेक रंगतदार लढतीही पाहायला मिळणार आहेत. भारतीय संघ हा यंदाच्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये जेतेपदासाठी फेव्हरिट मानला जात आहे.
भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड संघ मातब्बर
१९८३ वर्ल्ड कपमध्ये भारताने कपिल देवच्या नेतृत्त्वाखाली विजेतेपद पटकावले होते, त्यानंतर २००३ वर्ल्ड कपमध्ये भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर २०११मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात पुन्हा एकदा भारतीय संघाने वर्ल्ड कप उंचावला. आता या वेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप उंचावण्यासाठी उत्सुक आहे. मात्र ही लढाई सोपी नाही. क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडमध्ये १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९नंतर पाचव्यांदा विश्वचषकाचे आयोजन होत असले तरी यजमानांना गेल्या ४४ वर्षांपासूनचा विश्वचषक विजयाचा दुष्काळ संपवता आलेला नाही. यजमानांना २०१५च्या विश्वचषकात इंग्लंडला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र २०१७च्या चॅम्पियन्स करंडकानंतर यंदा नव्या दमाच्या खेळाडूंसह इंग्लंडने कर्णधार ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली मोर्चेबांधणी केली. विशेषत: फलंदाजीत इंग्लंडने जवळपास अनेक विक्रम मोडीत काढून भल्याभल्या गोलंदाजांना पाणी पाजले आहे. सर्व संघाची गेल्या वर्षभरातील कामगिरीवर नजर टाकल्यास भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड असे संघ हे मातब्बर मानले जात आहेत. हे संघ या वेळी बर्यापैकी संतुलित दिसत असून त्यातही इंग्लंडचा संघ कांकणभर सरस आहे. वेस्ट इंडिज, श्रीलंका, न्यूझीलंड, आणि पाकिस्तान यांनाही कमी लेखून चालणारे नाही. तर अफगाणिस्तान आणि बांगलादेश यंदाच्या स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय संघ फेव्हरिट
एकंदरीत आधीच्या विश्वचषक स्पर्धांपेक्षा यंदाची विश्वचषक स्पर्धा वेगळी ठरणार आहे. प्रथमच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या महासंग्रामात सहभागी होत आहे. विराटने कर्णधार म्हणूनही त्याने गेल्या अनेक मालिकांत भारताता निर्विवाद यश मिळवून दिले आहे. त्याच्या या नेतृत्वाची कसोटी इथे लागेल. भारतीय संघाचा विचार केल्यास संघात रोहित शर्मा, शिखर धवन, स्वत: कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल, केदार जाधव अशी फलंदाजांची तगडी फळी आहे. सोबतीला हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा हे अष्टपैलू आणि महेंद्रसिंग धोनीसारखा चाणाक्ष आणि अनुभवी यष्टीरक्षक आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी ही मंडळी इंग्लंडमधील गोलंदाजीला अनुकूल हवामानाचा लाभ उठवत प्रतिस्पर्धी संघांची दाणादाण उडवू शकतात. तर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव प्रतिस्पर्ध्यांची फिरकी घेण्याची क्षमता बाळगून आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला प्रत्येक फेरीत कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. ५ जूनला होणारी भारत आणि दक्षिण आफ्रिका, ९ जूनला होणारी भारत आणि ऑस्ट्रेलिया, १३ जूनला होणारी भारत आणि न्यूझीलंड, २५ जूनला होणारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, ३० जूनला होणारी भारत आणि यजमान इंग्लंड आणि ६ जुलै रोजी होणारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या लढती विशेष लक्षवेधी ठरणार आहेत.
आयपीएलचे साईड इफेक्ट
मात्र भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यातील लढत यंदाही खास ठरणार आहे. विश्वचषकाचा इतीहास पाहिल्यास पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात अपराजित राहिलेला भारतीय संघ १६ जून रोजी होणार्या या लढतीत विजय मिळवून विजयी घोडदौड कायम ठेवण्यास सज्ज झाला आहे. या हायहोल्टेज सामन्याची क्रिकेटप्रेमींना आतापासूनच उत्सुकता लागून आहे. मात्र भारतासाठी केवळ हिच एक लढत महत्त्वाची नसून प्रत्येक सामना करो या मरो ठरणारा आहे. आधीच आयपीएलमुळे अन्य देशाच्या खेळाडूंंना भारतीय खेळाडूंच्या जमेच्या व कमजोर बाजू समजल्या असतीलच, या विषयावर नेहमीच चर्चा होते बीसीसीआय ही शक्यता नेहमीच फेटाळून लावत आला आहे. मात्र कितीही नाही म्हटले तरी हे सत्य नाकारुन चालणार नाही. आता आयपीएलचा हा साईड इफेक्ट कितपत हानी कारक ठरतो याचे उत्तर येत्या ४६ दिवसांमध्ये मिळेलच. आपला भारतीय संघ हे आव्हान परतवून तिसर्यांदा विश्वचषक उंचावतो का, याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळेल. यासाठी टीम इंडियाला खूप-खूप शुभेच्छा...!
Post a Comment