लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासून सुरु झालेले ईव्हीएम पुराण निकालांआधी आलेल्या एक्झिट पोल्सनंतर तीव्र झाले आहे. ईव्हीएम मशीनवरून विरोधकांची सुरु असलेली आदळआपट संपुर्ण देश बघत आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीनंतरचा ट्रेंड पाहिला तर असे लक्षात येते पराभव झाल्यानंतर पराभवाचे खापर ईव्हीएम मशिनवर फोडण्याची जणू फॅशनच झाली आहे. यंदातर ईव्हीएम पुराणाने कळस गाठला आहे. ईव्हीएमवर शंका घेणार्या विरोधीपक्षांची व्हीव्हीपॅटची मागणी निवडणूक आयोगाने पुर्ण केल्यानंतर आता १०० टक्के ईव्हीएम व्हीव्हीपॅटशी पडताळून पाहण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत. या मागणीवरुन सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षाच्या नेत्यांना फटकारल्यानंतरही त्यांचा याविषयावरुन आकालतांडव सुरु आहे. पराभव समोर दिसत असल्याने हा कांगावा सुरु आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ईव्हीएमशी कथित छेडछाडीच्या शक्यतांबाबत चिंता व्यक्त केल्याने हा गोंधळ अजूनच वाढला आहे.
आरोप निराधार?
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरलेले असतानाच विरोधकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अंतिम टप्प्यातील मतदानानंतर समोर आलेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोल मध्ये भाजपाला दणदणीत यश मिळत पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले. यामुळे विरोधीपक्ष बिथरला. यामुळे ईव्हीएमपुराण सुरु होईल, असे अपेक्षितच होते. याची तयारी देखील आधीपासून सुरु करण्यात आली होती. टेक्नोक्रॅट्सच्या एका ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात दखल केलेल्या एका याचिकेत व्हेरिफिकेशनाठी सर्व ईव्हीएममध्ये व्हीव्हीपॅट सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ निवडणूक आयोगानेही विरोधकांना झटका दिला. उत्तर प्रदेशातील चार जिल्ह्यातील ईव्हीएमच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आकांडतांडव सुरु होते. मात्र निवडणूक आयोगाने विरोधकांचे हे सर्व मुद्दे फेटाळून लावले. सर्व पक्षाच्या उमेदवारांसमोरच ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या होत्या. त्याची व्हिडिओ शुटींगही करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी लावलेले आरोप निराधार आहेत, असे आयोगाने स्पष्ट केल्यानंतरही सुरु असलेला हा गोंधळ म्हणजे निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयावरही अविश्वास दाखवणारा आहे.
राजधानीत घडामोडींना वेग
दुसरीकडे निकालानंतर काही नेत्यांना केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटत असल्याने राजधानीत घडामोडींना वेग घेतला. मंगळवारी झालेल्या एका बैठकीला डावे पक्ष, बसपा, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि टीएमसीच्या नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी, टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन आणि सपा नेते रामगोपाल यादव आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास काय निर्णय घ्यायचा? याबाबतची चर्चा करण्यात आली. तसेच १०० टक्के ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे लावून धरण्यावरही चर्चा करण्यात आली. तब्बल तासभर ही चर्चा झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू, गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल यांनी निवडणूक आयोगाचे दरवाजे पुन्हा ठोठावले. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होवून देशात संशयकल्लोळ वाढत आहे. मतदानानंतर सर्व प्रक्रिया सर्वांच्या समोर झाल्या आहेत. जेथे ईव्हीएम मशिन्स जेथे ठेवण्यात आले आहेत तेथे प्रचंड बंदोबस्तासह राजकीय पक्षाच्या कार्याकर्त्यांही कडा पहारा ठेवला आहे. असे असतांना ईव्हीएममध्ये फेरफार होवू शकते, असा आरोप करणे म्हणजे सुरक्षा यंत्रणांसह स्वत:वरही अविश्वास दाखविण्यासारखा आहे.
राजकारण खालच्या पातळीवर
निवडणुकांचा बिगूल वाजण्यापुर्वीच कथित हॅकर सय्यद शुजा नामक एका व्यक्तीने लंडनमध्ये पत्रकार परिषद घेत पाच वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिन हॅक करत भाजपाने विजय मिळवला होता, असा आरोप केला. यावेळी शुजाने ईव्हीएम घोटाळा प्रकरणाची माहिती मिळाल्याने गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप केल्याने देशात खळबळ उडाली होती. याचवेळी ईव्हीएमवरुन चालणारे घाणेरडे राजकारण यंदा अत्यंत खालच्या पातळीवर जाईल, याची कल्पना निश्चितच आली होती. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाचा दणदणीत पराभव झाल्यानंतर कोणीही ईव्हीएमला दोष दिला नाही, याचे मोठे आश्चर्य आहे.
घटनात्मक संस्थेवरच अविश्वास
आता पुन्हा लोकसभा निवडणुकांपुर्वी यावरुन वाद सुरु झाला आहे. मंगळवारी बिहारमध्ये राजद कार्यकर्त्यांनी ईव्हीएमने भरलेली गाडी पकडल्याची कथित छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चिघळले. यावरुन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी आक्रमक पवित्रा घेत कुणी निवडणुकीचे निकालच चोरण्याचा प्रयत्न करणार असेल तर मतरक्षणासाठी आम्हाला शस्त्रे हाती घ्यावी लागतील. लोक शस्त्रे हाती घेतील. रस्त्यावर रक्ताचे पाट वाहतील, या धमकीने आगीत तेल ओतण्याचे काम केले. हा गोंधळ का कमी होता म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ईव्हीएमशी कथित छेडछाडीच्या शक्यतांबाबत चिंता व्यक्त करत निवडणूक आयोगाच्या ताब्यात असणार्या सर्व ईव्हीएमची सुरक्षा ही आयोगाची जबाबदारी असल्याचे मुखर्जी यांनी म्हटले. मुखर्जी यांनी एक निवदेन जारी केले. त्यात ते लिहितात, आपल्या लोकशाहीच्या मूळ तत्वांना आव्हान देईल अशा शक्यतांना कोणतंही स्थान असू नये. जनादेश पवित्र आहे आणि तो कोणत्याही प्रकारच्या संशयापलीकडचा असायला हवा, माजी राष्ट्रपतींच्या या निवेदनामुळे विरोधकांना १०० हत्तींचे बळ मिळाले आहे. मात्र देशाचे सर्वोच्च पद भुषविणार्या एका तज्ञ, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाकडून एखाद्या घटनात्मक संस्थेवरच अविश्वास दाखविणे चुकीचे वाटते. ही अपेक्षा किमान प्रणवदांकडून तरी नव्हती, हे मात्र तितकेच खरे!
Post a Comment