राजकारणातील सभ्यता, सुसंस्कृतता हरवली!

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांत राजकीय नेत्यांच्या विखारी भाषणबाजीमुळे प्रचाराची पातळी अत्यंत खालावली आहे. दुर्दोधन, अफजल खान, औरंगजेब, रावण, जल्लाद, चोर, भ्रष्टाचारी नंबर वन अशी विशेषणे वापरत एकमेकांविरोधात गरळ ओकली जात असून हे राजकारण अजून किती खालच्या पातळीला पोहोचणार असा सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडू लागला आहे. यंदा प्रचारात विकासाचा मुद्दा हरवला असून व्यक्तीकेंदींत प्रचार व एकमेकांची उनी-दुनी काढण्यातच आतापर्यंतचे पाच टप्पे पार पडले आहेत. शेवटच्या दोन टप्प्यात तर वाचाळवीर नेत्यांनी सर्व पातळी ओलांडत निर्लज्जपणाचा कळस चढविण्यात कोणतीच कसूर सोडलेली नाही. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मागे नाहीत! एवढे असतांना निवडणूक आयोग क्लिनचीट देण्यासह ७२ तास भाषणबंदी करण्यापलीकडे काहीच करतांना दिसत नसल्याने, आयोगाच्या भुमिकेवरही संशयाचे ढग गडद होत आहेत. यातही एक गंभीर बाब म्हणजे, राजकीय नेत्यांबरोबरच आता स्वयंघोषीत विचारवंत व कलाकारही बोंबलायला लागले आहेत. गेल्या काही वर्षात देणातील कोणत्याही निवडणुका आल्या की लोकशाही धोक्यात आली, असे म्हणण्याची जणू फॅशनच झाली आहे. त्यांना रोखल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्याची ओरड सुरु होते, अशा विकृती मनोवृत्तीला वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे.


निवडणूक प्रचारात हीन पातळी

सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले असून, अखेरच्या दोन चरणातील ११८ जागांसाठीचे मतदान होणे अद्याप बाकी आहे. नुकताच पार पडलेला पाचवा टप्पा व आगामी दोन्ही टप्पे भाजपासह काँग्रेससाठी महत्त्वाचे असल्याने दोन्ही पक्षांसह त्यांच्या घटक पक्षांकडून आक्रमक प्रचारतंत्राचा वापर करण्यात येत आहे. निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप नवे नसले तरी यंदा प्रचंड नकारात्मक पध्दतीने प्रचार केला. यात मयतांना देखील सोडले जात नसल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. २०१९च्या निवडणूक प्रचारातील हीन पातळी गाठणारा प्रचार म्हणजे जातीयवादी प्रचार. मायावती, नवज्योतसिंग सिद्धू, प्रकाश आंबेडकर काँग्रेसचे विविध नेते, समाजवादी पक्ष या सगळ्यांनी उघडपणे मुस्लिमांनी आम्हालाच मतदान करावे असे आवाहन केले. मग भाजपनेही त्यांचा अली तर आमचा बजरंगबली असा प्रचार केला. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी आहे. या तीनही पक्षांच्या नावातील आद्याक्षरे घेऊन नरेंद्र मोदींनी त्यांना ‘सराब’ असे संबोधले आणि ही सराब जनतेला बरबाद करेल, अशी टीका केली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी मागे समाजवादी पक्ष, काँग्रेस, बसप यांच्या आघाडीला ‘स्कॅम’ असे संबोधले होते, तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अमित शहा यांनी काँग्रेस-समाजवादी-बसप यांच्या आघाडीला ‘कसाब’ असे संबोधून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी जातीयवादी विधाने करतांनाच भाजपच्या नेत्या जयाप्रदा यांच्यावर अत्यंत अश्‍लिल टीका केली. अशा प्रचाराची दखल घेऊन निवडणूक आयोगाने मायावती, आझमखान, योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात कारत ७२ तास प्रचार करण्यास बंदी घातली. मात्र आझमखान यांच्या पुत्राने तर आम्ही मुस्लिम आहोत म्हणून कारवाई झाली असे वक्तव्य करत पुन्हा जातीचे कार्ड खेळले. हेच जातीचे कार्ड मोदींनी देखील खेळण्याचा प्रयत्न केला. मी खालच्या जातीचा असल्याने माझ्यावर टीका केली जात असल्याचे मोदी म्हणाले होते. मोदी यांनी ‘मिस्टर क्लीन’ म्हणून पंतप्रधानपदी विराजमान झालेले राजीव गांधी हे ‘भ्रष्टाचारी नंबर वन!’ असल्याचा आरोप करत पंडीत नेहरु यांच्यानंतर स्व.राजीव गांधींनाही लक्ष केले. विद्यमान पंतप्रधानांनी माजी मयत पंतप्रधानांवर इतक्या खालच्या पातळीवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ होती.

सैन्याचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न

पश्‍चिम बंगालमध्ये ‘फनी’ वादळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.‘पश्‍चिम बंगालमधील वादळग्रस्तांच्या मदतीत ‘स्पीडब्रेकर’ ममतादीदी अडथळे आणत आहेत,’ असे वक्तव्य पंतप्रधानांनी केले तर या ‘एक्सापायरी डेट’ उलटून गेलेल्या पंतप्रधानांशी याबाबत बोलणी करण्याऐवजी आपण भावी पंतप्रधानांशीच संपर्क साधू, असा टोला ममतादीदींनी लगावला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या पक्षातील काही बड्या नेत्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत सैन्याचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे पंतप्रधान मोदीही जवानांच्या नावावर मते मागताना दिसले. फारुख अब्दुला, मेहबूबा मुफ्तींसारख्या नेत्यांना तर देशापेक्षा काश्मीरचीच चिंता जास्त असल्याने तेही वाट्टेल ते बरळत आहेत. साध्वी प्रज्ञासिंहने तर कहरच केला. मुंबई हल्ल्यात हुतात्मा झालेल्या एटीएस प्रमुख हेमंत करकरेंना शाप दिल्याचे त्यांचे वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. 

शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची जीभ घसरली 

आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांबाबत बोलायचे म्हटल्यास, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काय काय? बोलले हे अवघ्या महाराष्ट्राने ऐकले आहे. बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाने, अशी त्यांची गत असल्याने त्यांना फारसे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही परंतू शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची जीभ घसरली याचे मोठे आश्‍चर्य आहे. राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपत प्रवेश केलेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर टीका करत त्यांनी फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नये. नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल?, असे विधान केले. त्याआधी काय उखाडायचे ते उखाडा असे अमित शहांना म्हणण्यापर्यंतची त्यांची मजल गेली. राफेल प्रकरणावरुन माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याबाबतही पवारांनी वादग्रस्त विधान केल्याने पर्रिकरांचे चिरंजिव उत्पल पर्रिकर यांनी खुले पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली. भारतीय राजकारणाने गाठलेले खालच्या पातळीचे हे निदर्शक आहे, असेही उत्पल पर्रिकर यांनी पत्रात म्हटल्याने राजकारणाची पातळी खरोखरच खालावली असल्याचे प्रकर्षाने जाणीव होते. याला लगाम घालणे अत्यंत आवश्यक आहे कारण लोकशाही खर्‍या अर्थाने लोकांमध्ये रुजायची असेल तर राजकारणातील ही विषारी बीजे नष्ट व्हायला हवी. गेल्या दिड-दोन महिन्यांपासून घसरलेल्या प्रचाराचे पाप कुणाच्या माथी फुटणार हे २३ मे ला कळेलच. मात्र यावर विचार करण्याची वेळ आली आहे, हे निश्‍चितच!
BJP, Congress, Shard Pawar, Lok Sabha Election, 

Post a Comment

Designed By Blogger