महाराष्ट्रातील हाय होल्टेज राजकीय फॅमिली ड्रामा


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात जोरदार राजकीय ड्रामा पहायला मिळत आहे. हे राजकारणात नवे नसले तरी यंदा जुना डाव नव्या पध्दतीने खेळला जात असल्याने राजकीय नाट्य चांगलेच रंगत आहे. यंदा राज्यातील पॉवरफुल्ल नेते म्हणून ओळख असलेले पवार कुटूंब देखील चर्चेत आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये पहिल्या फळीतील मोठे नेते अशी ओळख असलेल्या राधकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुलं मोठी झाल्याने आता ते ऐकत नाही, अशी हतबलता वडीलांकडून मांडण्यात येत असली तरी त्याला राजकीय वास येत आहे. यामुळे हा सोईचा राजकीय डाव असल्याचे उघड सत्य आहे, हे कोणीही नाकारु शकणार नाही.


राष्ट्रवादीत शरद पवार जे सांगतील ती पूर्व दिशा, असा अलिखीत नियम आहे. त्यांच्या निर्णयावर कोणी छुप्या पध्दतीने कुरघोडी करु शकत नाही मग ते आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार का असो ना! हा आजवरचा शिरस्ता अनेक वर्षांपासून इनामेइतबारे पाळण्यात येत आहे. शरद पवारांच्या या एकहाती कारभाराला यंदा सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पवार कुटूंबातील तिसर्‍या पिढीचे रोहित व पार्थ यांच्या लोकसभा उमेदवारीवरुन पक्षात नाट्यमय घडामोडी घडतांना दिसत आहे. यापुढे निवडणूक लढणार नाही अशी घोषणा शरद पवार यांनी काही महिन्यांपुर्वी केली होती मात्र गेल्या आठवड्यात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे त्यांनी जाहीर केले. या घोषणेला काही तास उलटत नाही तोच त्यांनी पुन्हा माघार घेतली. अर्थात शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाही, व जे करतात ते कधीच बोलत नाही, असा महाराष्ट्राचा राजकीय इतीहास आहे! शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे. यासाठी अजित पवार यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शरद पवार यांचे दुसरे नातू आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे देखील काही दिवसांपासून कमालीचे सक्रिय झाले आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या घडामोडीबाबत काही नेत्यांच्या भेटीगाठी यामुळे रोहित चर्चेत आहेत. त्यात २०१९ विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांची तयारी पाहून अजित पवार यांच्या गोटात अस्वस्थता आहे. या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांची संधी हुकली तर विधानसभा निवडणुकीत रोहित पवार निवडणूक जिंकून पक्षात त्याच महत्त्व वाढेल आणि पार्थला अजून पाच वर्षे वाट पाहावी लागेल, अशी चिंता अजित पवार गटाला सतावत आहे. या वादात पार्थच्या मागे वडील अजित पवार आहेत तर रोहितच्या मागे आजोबा शरद पवार ठाम उभे आहेत. यामुळे पवार कुटुबिंयांचा हा राजकीय कलह राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. नगर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर सुजय यांची नाराजी होती. म्हणून सुजय विखे पाटील यांनी समर्थकांसह भाजपच्या गोटात प्रवेश केला. मुलाच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये असलले वडील अडचणीत आले आहेत. सुजय यांना काँग्रेसकडून उमेदवारी हवी होती आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची त्यांची मानसिकता नव्हती. म्हणून नाइलाजास्तव हा निर्णय त्यांनी घेतला, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर विखे-पाटील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा होती मात्र त्यांनी त्यास नकार दिला. असे असले तरी त्यांच्याही भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळे या राजकीय नाट्याची पटकथा आधीपासूनच लिहून तर ठेवलेली नाही ना? अशी शंका येणे चुकीचे ठरणार नाही. विखे पाटलांच्या या वादात माढ्याचे विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

रणजितसिंह मोहिते पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून असस्वस्थ आहेत. आपले राजकीय खच्चीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी सातत्याने बोलून दाखवला. गेल्या अनेक दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघात खदखद सुरु आहे. त्या वादातूनच स्वत: विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांना इथे निवडणूक लढण्यास सांगितले होते. कौटुंबिक कारण देत पवारांनी माढ्यातून माघार घेतली. यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव चर्चेत आले. मात्र आता रणजितसिंह मोहिते पाटील हे थेट भाजपच्या गोटात सहभागी होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. यामुळे मुलगा वेगळ्या पक्षात तर वडील वेगळ्या पक्षात या नाटकाचा दुसरा अंक पहावयास मिळणार आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात या फॅमिली ड्राम्याची रंगीत तालीम झाली होती. शरद पवार यांचे ऐकेकाळचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार इश्‍वरलाल जैन यांचे पुत्र काँग्रेसच्या तिकीटावर विधानपरिषवर निवडणून गेले होते. मुलगा आपला ऐकत नाही, अशी भुमिका त्यावेळी इश्‍वरलाल जैन यांनी मांडली होती. मात्र सोईस्कर राजकारणाचे हे नाट्य फार काळ टिकले नाही. अवघ्या दोन-तिन वर्षात मनिष जैन यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभा निवडणून लढली. यात ते विक्रमी मतांनी पराभूत झाले. यावेळी आमदारकीही गेली व खासदारकीही मिळाली नाही, अशी अवस्था मनिष जैन यांची झाली. आताही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात सुरु असलेल्या या फॅमिली ड्राम्याचा शेवट कसा होता? कोणास काय मिळते व कोण काय गमावतो? या प्रश्‍नांची उत्तरे आगामी काळच देईल.

Post a Comment

Designed By Blogger