अंतर्गत गटबाजीमुळे खान्देशात भाजपापुढे अडथळ्यांची शर्यत


लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खान्देशातील चारही जागा भाजपाच्या ताब्यात आहेत मात्र धुळे, नंदुरबारचा अपवाद वगळता जळगाव आणि रावेर मतदारसंघांमध्ये उमेदवारीचा घोळ अद्याप सुरु आहे. जळगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीने तर धुळे आणि नंदुरबारमधून काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांनी प्रचारचा नारळ फोडला आहे. रावेर मतदार संघात भाजपासह काँग्र्र्र्रेस व राष्ट्रवादीचा सावळा गोंधळ कायम आहे. जळगाव जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी, माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील गटबाजीमुळे जिल्हा भाजपाच्या तटबंदीला तडे गेले आहेत. धुळे व नंदुरबार हे एकेकाळचे काँग्रेसचे बालेकिल्ले २०१४ मध्ये मोदी लाटेत भाजपाच्या ताब्यात आले. मात्र धुळ्यात आमदार अनिल गोटेंची बंडखोरी तसेच जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल व उपमहापौर कल्याण अंपळकर यांच्यातील वादामुळे डॉ. सुभाष भामरे यांच्या वाटेत अनेक अडथडे निर्माण झाले आहेत. नंदुरबारमध्ये धनगर आणि आदिवासी सवलतींचा वाद काँग्रेसने उचलून धरल्यामुळे हिना गावितांचीही वाट बिकट मानली जात आहे.
जळगाव आणि रावेर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या भुसावळ दौर्‍यात भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले होते. यावेळी खडसेंनेही झाले गेले विसरून मुख्यमंत्री व सरकारच्या कामांचे तोेंडभरून कौतूक केल्याने फडणवीस-खडसेंमध्ये दिलजमाई दिसून आली. याला आठवडा उलटत नाही तोच खडसेंनी पुन्हा एकदा स्वकियांवर तोफ डागली. यावेळी चक्क त्यांनी अंबानींच्या नावाचा उल्लेख केल्याने थेट राष्ट्रीय पातळीवर या भुकंपाचे धक्के जाणवले. खडसेंसारखा नेता सहजासहजी असे धाडसी विधान करणार नाही, त्यामागे निश्‍चितच काहीतरी असणारच! मध्यंतरी खडसे भाजपाला रामराम करणार अशी जोरदार चर्चा होती, गेल्या काही दिवसांपासून रक्षा खडसें ऐवजी खुद्द एकनाथराव खडसे यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची चर्चा रंगत आहे. या पार्श्‍वभूमीवर खडसे काय निर्णय घेतात, यावर रावेर लोकसभा मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून राहील. भाजपाचा हा अंतर्गत कलह लक्षात घेता राष्ट्रवादीने उमेदवारीचे पत्ते अद्याप उघडलेले नाही. 

खा.रक्षा खडसे यांच्या विरुध्द तुल्यबळ उमेदवार ही विरोधीपक्षांची मोठी अडचण ठरत आहे. जळगाव मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार ए.टी.पाटील गेल्यावेळी विक्रमी मतांनी विजयी झाले होते. यंदाही त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती मात्र एका कथित व्हायरल क्लिपमुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेने राजकीय वजन जास्त असल्याने सेनेची मदत निर्णायक मानली जाते परंतू शिवसेनेचे आमदार किशोर पाटील व खा.पाटील यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण मतदारसंघाला माहित आहे. आ.पाटील व गिरीश महाजन यांच्यातील वादही गेल्या वर्षभरात विकोपाला गेला आहे. यामुळेच सेनेचे माजी आमदार आर.ओ.पाटील यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली होती. आता त्यांनी दोन पाऊले मागे घेतली असली तरी येथे सेना भाजपाला कितपत मदत करते यावर यश अपयशाचे सुत्र ठरणार आहे. येथे राष्ट्रवादीतर्फे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करुन प्रचाराला सुरुवात करत आगेकुच केली आहे. धुळे - धुळे मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी २०१४ साली आलेली मोदी लाट तसेच माजीमंत्री रोहिदास पाटील आणि काँग्रेसचे तत्कालीन उमेदार अमरिशभाई पटेल यांच्यातील वादामुळे काँग्रेसला खिंडार पडले. गतवेळीची चुक सुधारण्यासाठी काँग्रेसने येथे वरिष्ठपातळीवरुन लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांची गेल्या महिन्यात झालेली सभा त्याचेच प्रतिक आहे. येथे यंदा आ.पटेल यांनी माघार घेतल्याने रोहिदास पाटील यांचे नाव जवळपास निश्‍चित करण्यात आले आहे. भाजपातर्फे संरक्षणराज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. येथे राहूल गांधींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही जाहीर सभा झाली असल्याने दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

ना.महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली धुळे महापालिकेत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली असली तरी जळगाव प्रमाणे धुळ्याही अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागले आहे. अनुप अग्रवाल व कल्याण अंपळकर यांच्यातील वाद आणि आमदार अनिल गोटे यांनी मांडलेली वेगळी चूल डॉ.भामरेंना अडचणीच्या ठरु शकतात. नंदुरबार - नंदुरबार मतदारसंघात सलग नऊ वेळा खासदार राहणार्‍या काँग्रेसच्या माणिकराव गावित यांचा पराभव करुन भाजपाच्या तरुण उमेदवार हिना गावित गेल्यावेळी मोदी लाटेत निवडून आल्या होत्या. यंदाही भाजपातर्फे त्यांनाच संधीच मिळण्याची शक्यता आहे. त्या कामालाही लागल्या आहेत. या मतदारसंघात आदिवासी समाजाची मते निर्णायक ठरतात. आता निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी विरुध्द धनगर असा वाद निर्माण झाला आहे. हिना गावित यांच्या विरुध्द काँग्रेसतर्फे अक्कलकुव्याचे आमदार के.सी.पाडवी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी आदिवासींच्या सवलतीच्या विषयावरुन थेट राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. या विषयावरुन आदिवासींमध्ये भाजपाविरुध्द दिसून येणारा रोष ही सर्वात मोठी डोकंदूखी ठरु शकते. मात्र याचवेळी वैद्यकीय कारणास्तव राजकीय मैदानापासून लांब असलेले आ.चंद्रकात रघुवंशी यांची अनुपस्थिती काँग्रेससाठी त्रासदायक ठरु शकते, याची जाणीव पक्षश्रेष्ठींनाही असल्याने काँग्रेसने येथे जोरदार कंबर कसली आहे.

Post a Comment

Designed By Blogger