चीन सुधारणार केंव्हा?


दहशतवाद ही आज जागतिक डोकेदुखी ठरत आहे. अफाट शस्त्रास्त्रनिर्मिती आणि त्यांची जग भरात सुरू असलेली बेकायदा खरेदी-विक्री पाहता सारे जगच दहशतवादाच्या कचाट्यात सापडलेले आहे. त्याला अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया सारख्या अतिप्रगत देशांचाही आता अपवाद राहिलेला नाही. दहशतवाद्यांना पोसणारा देश असलेल्या पाकिस्तानला देखील आता दहशतवादाची झळ सोसावी लागत आहे. दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या अमेरिकेवर तालिबानचा म्होरक्या ओसामा बीन लादेन उलटल्यावर अमेरिकेने दहशतवादाविरोधात कडक भूमिका घेतली. आपल्या कडील एका प्रचलित म्हणीनुसार, पुढच्याला ठेच अन् मागचा शहाणा, मात्र या म्हणीचा अर्थ चीनला कळत नसल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानच्या दहशतवादावर चीन सातत्याने पांघरुन घालण्याचे काम करत आहे. पाकिस्तानमधील वाढते दहशतवादी संघटन आणि अफगाणिस्तानवरील अमेरिकेचे सुटत चाललेले नियंत्रण यामुळे आशिया खंड हिंसेच्या खाईत सापडण्याची भीती अनेक जणांनी अधोरेखित केली आहे. याची झळ चीनला बसायला वेळ लागणार नाही, मात्र चीन त्याची आडमुठी भूमिका सोडायला तयार नसल्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे चांगलेच फावत आहे.

पुलवामा हल्ला घडल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या संघटनेला दहशतवादी ठरवावे आणि मसूद अझर या ‘जैश’च्या म्होरक्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे या मागणीसाठी भारताने संयुक्त राष्ट्र संघटनेचा दरवाजा ठोठावला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेच्या पाच संस्थापक सदस्यात फ्रान्स आहे आणि चीनही आहे. २००९, २०१६ आणि २०१७ मध्ये या संदर्भातील प्रस्तावावर चीनने नकाराधिकाराचा वापर करत खोडा घातला होता. आताही चीनच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. मात्र इतीहासाची पुनर्रावृत्ती चीनने पुन्हा एकदा केली. चीनने स्वत: च्या व्हिटो पावरचा वापर करून मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवले. फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या मोठ्या देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसूद अझहरच्या विरोधात प्रस्ताव दाखल केला असतांना चीनने आडमुठी भूमिका कायम ठेवली. चीन मसूद अझरला गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने पाठीशी का घालत आहे? असा प्रश्‍न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.

चीन आणि पाकिस्तान हे कोणत्याही परिस्थितीत कायम मित्र असतात, हा इतिहास आहे. याचे पहिले कारण म्हणजे, चीन भारताला आपला प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो. चीनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर तिबेटी आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांना भारताने आश्रय दिला. यासह चीनने ‘वन रोड वन बेल्ट’ या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी पाकिस्तानमध्ये केलेली आहे. या सुमारे साडेतीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून चीन स्वत:साठी आफ्रिका खंडात आणि पश्चिम आशिया उपखंडांत पोचण्यासाठीचा व्यापारी मार्ग उपलब्ध करून घेत आहे आणि बदल्यात पाकिस्तानातील सर्वाधिक मागास प्रदेशांचा पायाभूत सुविधांद्वारे विकास करून देत आहे. त्यामुळे चीन पाकला नाराज करणार नाही आणि त्या बदल्यात पाकिस्तानही चीनकडून पूर्ण फायदा करून घेत आहे. यावेळचे वेगळेपण म्हणजे, मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरविण्याचा भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातल्यानंतर फ्रान्सने भारताची साथ देत मोठे पाऊल उचलले. मसूद अझरच्या फ्रान्समध्ये असणार्‍या सर्व मालमत्ता फ्रान्स सरकारकडून जप्त करण्यात येणार आहे. फ्रान्सचा हा निर्णय म्हणजे भारताचे मोठे यश मानावे लागेल. 

पुर्वी काश्मीरमधील दहशतवाद हा केवळ भारत-पाकिस्तानचा अंतर्गत वाद आहे, अशी भूमिका अमेरिकासह अन्य देशांची होती मात्र दहशतवाद ही केवळ भारताची नव्हे तर अवघ्या जगाची समस्या झाली आहे, हे कटूसत्य आता अन्य देशांनीही स्विकारले आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या दहशतवादी संघटनांनी आपली बांधिलकी मोठ्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी जपण्यास सुरु केल्याने, आता त्यांना मोठे पाठबळ मिळाले आहे. त्यामुळेच या दहशतवादाचा सामना करणे, हे एका राष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आता बहुराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणे अपरिहार्य बनले आहे. एका आकडेवारीनुसार जगातील १९३ देशांपैकी १०० हून अधिक देशांना दहशतवादाचा धोका आहे. जगभरात फार कमी राष्ट्रे आहेत, ज्यांना या दहशतवादाची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष झळ बसलेली नाही. भारताला ही समस्या १९८० च्या दशकापासून भेडसावत आहे. यामध्ये लाखो जणांना प्राण गमवावे लागले आहेत. परंतु भारताकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. भारतातील दहशतवादाकडे राष्ट्रीय पातळीवरील दहशतवाद म्हणून पाहिले गेले. परंतु आज भारताची दहशतवादाबाबतची जी भुमिका आहे, ती जगाला पटलेली आहे. २६/११ ला अमेरिकेला दहशतवादाचा क्रृर चेहरा दिसला यानंतर याचे लोणं युरोपीय देशांमध्ये पोहचले. ब्रिटननंतर पॅरिस आणि ब्रसेल्सवर इसीस या दहशतवादी संघटनेने हल्ले केल्यानंतर याची दखल संपुर्ण जगाने गांभीर्याने घेतली.

दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या बनल्यामुळे या समस्येचा बीमोड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून एकमताने आणि कसोशीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र चीन आजही याकडे कानाडोळा करत आहे. या विषयावर चीन-पाकिस्तानचे सोडाच मात्र या गंभीर विषयावर आपल्या देशात सुरु असलेले राजकारण ही दुर्दवी बाब म्हणावी लागेल. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात अपयश आल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्वीटरवर निशाणा साधल्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या ट्विटवर आक्षेप नोंदवला. जेव्हा देश दुःखात असतो, तेव्हा राहुल गांधी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतात. राजकारणात नेहमीच अंतर ठेवले पाहिजे. विरोध असतो आणि तो झालाही पाहिजे. चीनने पुन्हा एकदा जुन्याच नीतीचा वापर केल्याने राहुल गांधी खूश आहेत काय?, राहुल गांधींचे ट्विट आता पाकिस्तानमध्ये हेडलाइन होईल. पाकिस्तानी मीडियामध्ये झळकलेली ट्विट आणि कमेंट पाहून राहुल गांधींना आनंद होतो आहे. तुमच्याच पूर्वजांच्या कारणास्तव चीन सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे, असेही म्हणत रविशंकर प्रसाद यांनी थेट देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यावर निशाणा साधल्याने काँग्रेस-भाजपामध्ये जुंपली आहे. मात्र या राजकारणात दहशतवादाचा मुद्दा बाजूला पडत असल्याची जाणीव दोन्ही राष्ट्रीय पक्षांना नसावी, हे दुर्दव्य म्हणावे लागेल.

Post a Comment

Designed By Blogger