सख्खे शेजारी, पक्के वैरी


असे म्हणतात ना, कोणताही देश आपला मित्र किंवा शत्रु निवडू अथवा बदलू शकतो मात्र शेजारी निवडू किंवा बदलू शकत नाही. जगाच्या इतिहासात डोकावल्यास असे लक्षात येते की, फारच कमी देश आहेत की ज्यांचे शेजार्‍यांशी मैत्रीपुर्ण संबध आहेत. यास भौगोलिक, ऐतीहासिक, राजकीय, आर्थिक असे अनेक कारणे आहेत. त्यातही एकाच भुभागाच्या विभाजनातून वेगळे झालेल्या दोन देशांमध्ये कटुता अधिक दिसून येते. यास उत्तर कोरिया-दक्षिण कोरियापासून भारत-पाकिस्तान किंवा पाकिस्तान-बांग्लादेश अशी अनेक उदाहरणे देता येतील. भारत, पाकिस्तान व चीन या तिन्ही देशांमधील वाद नवे नाहीत. भारताने आंतरराष्ट्रीय संबंध कितीही सुधारण्याचे प्रयत्न केले तरी पाकिस्तान व चीनचे शेपूट नेहमी वाकडेच राहिले आहे. भारतात होणारे दहशतवादी हल्ले व सिमेवर होणार्‍या गोळीबारामुळे भारताने पाकिस्तान विरोधात कडक भुमिका घेतली आहे. दुसरा शेजारी असलेला चीनसोबत डोकलामच्या प्रश्‍नी जो संघर्ष झाला त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध हे तणावपूर्ण बनले होते. हा तणाव इतक्या सर्वोच्च पातळीचा होता की कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकली असती. परंतू या आठवड्यात भारताचे पाकिस्तान व चीन सोबत द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत. मात्र या दोन्ही देशांनी जेंव्हा जेंव्हा मैत्रीचा हात पुढे केला तेंव्हा पाठित खंजिर देखील खुपसले असल्याचे इतिहास सांगतो.
चीनची सरकारी वृत्तवाहिनी सीजीटीएन न्यूजने दोन दिवसांपुर्वी एका बातमीपत्राचे वार्तांकन करताना पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशाचा भाग असल्याचे दाखवले आहे. प्रथमदर्शनी हा छोटा मुद्दा वाटत असला तरी, यास आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींच्या दृष्टीने प्रचंड महत्व आहे. कारण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दहशदवादाविरोधात कडक भुमिका घेतल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दिल्या जाणार्‍या आर्थिक मदतीत मोठी कपात केली आहे. ही संधी हेरत चीनने पाकिस्तानच्या पुढे मैत्रीचा हात करुन कोट्यावधी रुपयांची मदत पाकिस्तानला दिली. यास चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपेकचा) याचेही मुख्य कारण आहेच. हा महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जातो आणि बलुचिस्तानमधूनही जातो. भारताची परवानगी न घेता पाकव्याप्त काश्मीरमधून हा महामार्ग बनवला जात असल्यामुळे भारताने या प्रकल्पाचा कडाडून विरोध केला आहे. सीपेकला भारत मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करू शकतो. चीनला सद्यस्थितीत भारताची नाराजी पत्करणं परवडणारं नाही. दुसरीकडे मंगळवारी कराचीतील चीनच्या दूतावासावर हल्ला झाला. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणार्‍या आणि चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा विरोध करणार्‍या घटकांनी हा हल्ला केल्याची चर्चा आहे. या हल्ल्याचे वार्तांकन करताना या वृत्तवाहिनीने पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशावर दाखवले. भारत गेली अनेक वर्षं पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशावर दाखवत आहे. तसंच पाकिस्तानने घेतलेला काश्मीरच्या काही भागाचा ताबा बेकायदेशीर असल्याची भूमिका घेत आहे. चीनने पहिल्यांदाच भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे, असा यावरुन अर्थ काढला जात आहे. पाकिस्ताननेही यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नसली तरी चीनने सीपेक प्रकल्पाच्या भल्यासाठीच ही भूमिका घेतल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं मत आहे. यामुळे एकीकडे भारत-चीन संबंध अधिक सुधारू शकतात तर चीन-पाकिस्तानचे संबंध दुरावले जाऊ शकतात. ‘वन बेल्ट वन रोड’ या नावाने देखील हा प्रकल्प ओळखला जातो. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत त्या देशांना आणत आहे ते पाहता या देशांमध्ये साधनसंपत्तीचा विकास करून चीन भारताला घेरण्याचा प्रयत्न करतो आहे. यामुळे या प्रकल्पाबाबत भारताने सुरुवातीपासून सावध भुमिका घेतली आहे. चीन आणि भारत यांच्यामध्ये अफगाणिस्तानबाबत काही समान मुद्दे आहेत. दोघांसाठी अफगाणिस्तानाती अस्थिरता व दहशतवाद ही प्रचंड मोठी डोकंदुखी ठरत आहे. १९९६ ते २००० या काळात तालिबान शासनाच्या राजवटीत जगभरातील दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात प्रशिक्षण दिले जायचे. आता तालीबान राजवट उलथवण्यात आली असली तरी तेथील दहशतवाद्यांचे अड्डे अजूनही कायम आहेत. त्यांना पाकिस्तानची छुपी मदत सुरुच असते. हे भारत व चीनसाठी त्रासदायक आहे. यामुळे भारत व चीन यांच्यातील संबंध सुधारल्यास पाकिस्तान ठिकाण्यावर येण्यास वेळ लागणार नाही, असेही तज्ञांना वाटते. यात दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यापासून अमेरिका जागतिक पातळीवरच्या विविध बहुराष्ट्रीय सहकार्य करारातून माघार घेत आहे. त्यूतन एक आंतरराष्ट्रीय सत्तापोकळी निर्माण झाली आहे. भारत - चीन यांचीसंयुक्त युती ही पोकळी भरुन काढू शकते. त्यादृष्टीने चीनची ही सकारात्मक सुरुवात आहे असे म्हणता येईल. या सगळ्या घडामोडी घडत असतांना बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताबाबत केलेल्या एका विधानामुळे त्यांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. भारतासोबत मला बळकट संबंध हवे आहेत. भारताने यासाठी एक पाऊल पुढे टाकलं तर पाकिस्तान दोन पावलं पुढे टाकण्यास तयार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. इथवरच न थांबता ’जर एकमेकांशी अनेक युद्ध लढलेले फ्रान्स आणि जर्मनी शांततेत जगू शकतात तर भारत आणि पाकिस्तान का नाही?,’ असा सवालही त्यांनी केला आहे. दोन्ही देशांनी चुका केलेल्या आहेत पण याचा अर्थ दोन्ही देशांनी या भूतकाळात रमावे असा नाही. भूतकाळाची जोखडे टाकली नाहीत, एकमेकांवर आरोप बंद केले नाहीत, तर दोन्ही देश याच स्थितीत राहतील पण दोन्ही देशांतील संबंध सुधारले पाहिजेत असे आम्हाला वाटते. दोन्ही देशांतील नागरिकांना शांतता हवी आहे, आता दोन्ही देशांच्या नेत्यांनी त्यावर एकत्र काम केले पाहिजे, अशी भुमिका मांडत एकाप्रकारे त्यांनी पाकिस्तानची चुक देखील मान्य केली आहे. मात्र पाकिस्तानने आतापर्यंत जेंव्हा-जेंव्हा मैत्रीचा हात पुढे केले तेंव्हा-तेंव्हा दगा दिला. याचे मोठे उदाहरण म्हणचे उरी हल्ला. यामुळे इम्रान खान यांच्या या भुमिकेवर भारत अजूनही विश्‍वास ठेवायला तयार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला असल्याचेही काही तज्ञांनी नमुद केले आहे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान विश्‍वास गमावून बसला आहे. यामुळे भारताचा वापर करुन बुडणार्‍या पाकिस्तानला वाचविण्याचा हा प्रयत्न कितपत उपयोगी ठरतो, हे आगामी काळच स्पष्ट करेल.

Post a Comment

Designed By Blogger