जळगाव काँग्रेसमध्ये फेरबदलाची मागणी


एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ख्याती असलेल्या जळगाव जिल्ह्यात पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे. स्थानिक नेत्यांनी काँग्रेसला भाजपच्या दावणीला बांधले, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांविरुध्द राज्य पातळीवरून ठोस कारवाई झाली नाही तसेच पक्षाने जिल्ह्याला एकही मोठे पद दिले नाही, या तीन प्रमुख कारणांमुळे काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जळगावला नेते जास्त अन् कार्यकर्ते कमी अशी स्थिती झाल्याने पक्षाचा आलेख दिवसेंदिवस खाली जात आहे. ही पडझड रोखण्यासाठी स्वत:च्या फायद्यासाठी पक्षाचा वापर करणाऱ्यांना हटवून मोठे फेरबदल करण्याची आवश्यकता असल्याची भावना काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

जळगाव जिल्ह्यात केवळ नावापुरताच उरलेल्या काँग्रेसला मतदारांनी १९९० नंतर सातत्याने नाकारले आहे. यास गटातटाचे आणि सोईस्कर राजकारण कारणीभूत मानले जाते. काँग्रेसने एके काळी मधुकरराव चौधरी, प्रतिभा पाटील, के. एम. बापू पाटील, ज़्‍ो. टी. महाजन आणि डी. डी. चव्हाण असे मंत्री जळगाव जिल्ह्याला दिले आहेत. याच जिल्ह्याने नंतर देशाला प्रतिभा पाटील यांच्या रूपाने राष्ट्रपती दिला. मधुकर चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षपदही पदही भूषविले. आता जिल्हा परिषदेत चार तर पंचायत समित्यांमध्ये केवळ सहा जागा आहेत. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या जळगाव महापलिका निवडणुकीत काँग्रेसचा गत पंचवार्षिकप्रमाणे यंदाही धुव्वा उडाला. एखाद्या जागेवर विजय मिळवणे दुरच, मात्र अनेकांना आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही. यास स्थानिक नेत्यांचे सोईचे राजकारण कारणीभूत आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान निवडणुकीचे प्रभारी तथा मराठवाडय़ाचे आमदार अब्दूल सत्तार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना स्वत: किंवा घरातून उमेदवारी देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून इतरांना उमेदवारी दिली गेली. यामुळे सत्तार यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत निवडणुकीकडे पाठ फिरवली. त्यानंतर राफेल विमान खरेदी विरोधात विदर्भाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केल्यानंतर तेथे कार्यकर्ते न जमल्याने केवळ निवेदन देऊन वेळ मारून नेण्याची नामुष्की पक्षावर ओढवली. त्यापाठोपाठ इंधन दरवाढी विरोधात भारत बंद आंदोलनाच्या माध्यमातून पक्षात नवसंजिवनी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र आंदोलनावेळी देखील काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते अधिक होते. तसेच दुकाने बंद करण्यास गेलेल्या काँग्रेस नेत्यांसमोर व्यापाऱ्यांनी मोदी समर्थनार्थ घोषणा दिल्याने काँग्रेसच्या नेत्यांना खाली मान घालून काढता पाय घ्यावा लागला. सातत्याने होत असलेल्या नामुष्कीमुळे सर्वसामान्यांसह पक्षाचे वरिष्ठ पातळीवरील नेते देखील जळगावला कंटाळले आहेत.

ओबीसी कार्ड खेळण्याची रणनीती

जळगाव जिल्ह्यात ओबीसींची संख्या सुमारे ५२ टक्के आहे. आधीच ओबीसींचा चेहरा असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आता कुठे सक्रिय होत आहे तर दुसरे नेते माजीमंत्री एकनाथ खडसे यांना त्यांच्याच पक्षाने अडगळीत टाकले आहे. यामुळे ओबीसींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने राज्यभर ओबीसी मेळावे घेतले. जळगाव येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ जागांपैकी निम्म्यापेक्षा जास्त जागांवर ओबीसी उमेदवार देण्याची रणनीती निश्चित करण्यात आली. या अनुषंगाने अनेक इच्छुक कामाला लागले आहेत. त्यात जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा, रावेर, यावल, बोदवड आदी मतदार संघांचा समावेश आहे. जामनेरमध्ये मराठा आणि बंजारा समाजाचे मतदान अधिक आहे. चोपडा, रावेरमध्ये लेवा समाजाचे वर्चस्व आहे. मुक्ताईनगरमध्ये मराठा आणि लेवा समाज निर्णायक मानला जातो. जळगाव ग्रामीणमध्ये मराठा समाजासह कोळी, गुजर आणि बंजारा समाजाचे वर्चस्व आहे. यादृष्टीने इच्छुकांची चाचपणी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह लोकसभा नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते प्रत्यनशील आहेत.

भाजपला पूरक राजकारण

जिल्हा परिषदेत सत्तेसाठी भाजप, काँग्रेस एकत्र आहेत. सभापतीपद देखील काँग्रेसकडे आहे. यामुळे काँग्रेसचे जिल्हा नेते भाजपच्या नेत्यांवर आक्रमक टीका करु शकत नाहीत. विद्यमान जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी गत नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून लढवण्याऐवजी भाजप-शिवसेनेच्या पॅनलकडून निवडणूक लढवली. यात त्यांनी चोपडा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद देखील भूषवले. तसेच त्यांचा स्वभाव मवाळ मानला जातो. यामुळे भाजपवर आक्रमकपणे टीका करत नाहीत. विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांवर आक्रमकपणेप्रहार केल्यास कार्यकर्त्यांमध्ये जोश येतो. मात्र असे होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आल्याचे बोलले जाते. यामुळे काहींनी छुप्या पध्दतीने जिल्हाध्यक्ष हटाओ मोहीम उघडली आहे. यात पक्षाला आर्थिक रसद पुरवणारे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची भूमिका निर्णायक मानली जात आहे. कारण, त्यांच्या गटाचे पक्षावर वर्चस्व असल्याने त्यांच्या मर्जी शिवाय पक्षात कोणताच निर्णय होत नसल्याचे सर्वश्रृत आहे. त्यासही एका गटाचा विरोध आहे. डॉ. पाटील यांची भूमिका त्यांच्या वैयक्तिक फायद्याभोवती फिरत असल्याने आतापर्यंत पक्षाला एकही यश मिळालेले नसल्याचा आरोप करण्यात येतो. आजच्या स्थितीत यावल, चोपडा, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, चाळीसगाव, जळगाव ग्रामीण, अमळनेर येथे काँग्रेसची स्थिती चांगली आहे. मात्र तेथील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देण्यासाठी एखादे मोठे पद द्यावे तसेच आक्रमक जिल्हाध्यक्ष देऊन पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असा सूर उमटत आहे.

(सदर बातमी दैनिक लोकसत्तामध्ये दिनांक १८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे. https://www.loksatta.com/maharashtra-news/jalgaon-congress-demand-for-reshuffle-1753439/ )

Post a Comment

Designed By Blogger