दिलीप वाघ भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. पाचोरा-भडगाव हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. यामुळे भाजप-शिवसेना युतीचा फैसला झाल्यानंतर वाघ आपली रणनिती स्पष्ट करतील, अशी अटकळ बांधली जाते. त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा समाज माध्यमांवर रंगत असते. याला अप्रत्यक्षपणे पुष्टी मिळण्याचे निमित्त ठरले ते त्यांच्या वाढदिवसाचे, नुकताच झालेल्या यांच्या वाढदिसानिमित्त त्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रर्दशन करण्यात आले मात्र कोणत्याच फलकावर किंवा जाहिरतींवर शरद पवार अथवा पक्षाचे चिन्ह टाळत त्यांनी सूचक संदेश मतदार संघात पोहचवला आहे. यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना जणू त्यांनी एक प्रकारे पुष्टीच दिल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभुमीवर पाचोरा शहरातील एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटना निमित्ताने पवार जिल्हा दौर्यावर येत आहेत. या निमित्ताने भडगाव येथे जळगाव लोकसभा मतदारसंघाचा मेळाव्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन वाघ करत आहेत. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थिती देण्यासह सर्व मार्गावर कमानी, शुभेच्छा फलक लावून उत्साहवर्धक वातावरणात पक्षाध्यक्षांचे स्वागत करण्याचे आवाहन वाघ यांनी केले आहे. दौर्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र देखील गेल्या आठवड्याभरापासून सुरु असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आल्याचे दिसून येत आहे. वाघ यांच्या संभाव्य भाजपा उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम देणारा ठरतो की त्यांच्या चाणाक्ष नजरेतुन ते दुसरा प्रतिस्पर्धी शोधत त्यांना शह देणारा ठरतो तसेच मेळाव्यात वाघ यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
भाकरी पुन्हा फिरवणार!
जिल्हा पातळीवर सरु असलेल्या गटबाजीमुळे गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादीचे पडझड सुरु आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळवता आले नाही. जळगाव महापालिका, जामनेर नगरपालिका व मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा पुर्णपणे धुव्वा उडाला. विद्यमान जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना कोणी जुमानत नाही, यामुळे गटबाजी वारंवार उफाळून येते. पवार यांच्या दौर्याच्या पार्श्वभुमीवर देखील याचा प्रत्यय आला आहे. ज्येष्ठ समाजवादी दादासाहेब अमृतराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १६ सप्टेंबर रोजी नेरी येथे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला पवार येणार आहेत. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर जिल्हा आणि जामनेर तालुक्यातील पदाधिकार्यांची नावे आहेत मात्र स्थानिक जामनेर तालुक्यातील असलेल्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांचे नाव मात्र पत्रिकेतून वगळण्यात आले आहे. जामनेर तालुक्यात राष्ट्रवादीत पडलेल्या दोन गटांची पार्श्वभूमी याला जोडली जात आहे. कार्यक्रम पत्रिकेत अरुण गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अॅड. वसंतराव मोरे, आमदार डॉ. सतीश पाटील, अॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, अरूण पाटील, गुलाबराव देवकर, राजीव देशमुख, दिलीप पाटील, रंगनाथ काळे, स्थानिक पदाधिकारी संजय गरूड, डिगंबर पाटील, प्रदीप लोढा आदींच्या नावाचा समावेश आहे. स्थानिक असूनही जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांचे नाव डावलण्यात आल्याने पक्षातील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा भाकरी फिरवली जाते का याकडे राजकीय वर्तळाचे लक्ष लागून आहे.
(सदर वृत्त दैनिक लोकसत्तामध्ये दिनांक १६ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध झाले आहे)
Post a Comment