जळगाव महापालिका निवडणुकित राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. त्याआधी जामनेर नगरपालिका व मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकित राष्ट्रवादीला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या अपयशाचे खापर संधीसाधू कार्यकर्ते व स्थानिक गटबाजीवर फोडण्यात आले मात्र जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीची पिछेहाट ही केवळ जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या सोईस्कर भुमिकांमुळे होत असल्याचे आता कार्यकर्त्यांमधून उघडपणे बोलले जात आहे. गटातटाच्या राजकारणामुळे राष्ट्रवादी दुभंगत असून येणार्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या नादुरुस्त झालेल्या घड्याळीला चावी देण्याची जबाबदारी नुतन जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांना देण्यात आली आहे मात्र त्यांच्या निवडीनंतर अनेकांनी नाके मुरडल्याने जिल्हाध्यक्ष हे आव्हान कसे पेलतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
गेल्या विधानसभा पंचवार्षिक मध्ये जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले होते. यामुळे गुलाबराव देवकर यांच्या रुपात जिल्ह्याला राज्यमंत्री पद देण्यात आले. त्यांच्याकडे जळगावचे पालकमंत्री पद देखील सोपविण्यात आले. यावेळी अनेक नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या घड्याळाची टीक टीक कमी होवू लागली. जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदार संघात दारुन पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही केवळ डॉ.सतीष पाटील हे एकमेव आमदार म्हणून निवडून आले. नंतरच्या तिन - चार वर्षात अनेक नेत्यांनी स्वत:च्या मतदार संघापूरता राजकारण करण्याची भुमिका घेतली. यामुळे गटा-तटाचे राजकारण सुरु झाले. याच काळात माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे निवटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अमळनेरचे माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील हे भाजपाच्या तंबुत दाखल झाले. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. हा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यातील आहे. यामुळे भाजप-शिवसेना युतीचा फैसला झाल्यानंतरच वाघ अंतिम निर्णय घेतील, अशी अटकळ बांधली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपुर्वी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देत शिवसेनेचा पराभव केला, या वरुन वाघ यांच्या वाटचालीचे संकेत मिळत आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार सतीष पाटील यांनी पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटपर्यंत त्यांना जळगावच्या राजकारणावर पकड मिळवता आली नाही. शहरात माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या सारखे मोठे नेते आहेत मात्र त्यांना माननारे कार्यकर्ते नाहीत. माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या सारखे दिग्गज नेते असले तरी त्यांची संघटनात्मक पकड नसल्याचे उघड सत्य आहे. शहरात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना माननारा एक गट आहे. मात्र त्यांनी सर्व लक्ष त्यांच्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात केंद्रीत केले आहे. महापालिका निवडणुकीत त्यांची भुमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आल्याने ते नाराज आहेत. जळगाव शहरात चार माजी नगरसेवकांसह काही पदाधिकार्यांनी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादी नेत्यांचे धोरण भाजपाच्या हिताचे होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा बैठकीत हा मुद्दा चांगलाच गाजला. राष्ट्रवादीच्या उमेदवार सविता बोरसे यांनी नेत्यांच्या सोईस्कर भुमिकेवर जाहिररित्या नाराजी व्यक्त केली. गेल्या दहा वर्षापासून आपण पक्षासाठी काम करत आहोत मात्र निवडणुकीत नेत्यांनी मार्गदर्शन न करता वार्यावर सोडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात झालेल्या विविध निवडणुकीमध्ये पक्षाचा झालेला दारुण पराभव हा पक्षातीलच काही पदाधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे झाल्याचे कार्यकर्त्यांनी उघडपणे बोलून दाखविले. भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनीही पक्ष आता शिस्तीत मागे पडला आहे. स्थानिक पातळीवर नेत्यांमध्येही नेतृत्व दिसून येत नाही, अशी नाराजी बोलून दाखवली. रमेश माणिक पाटील यांनी इतर पक्षांशी सलगी ठेवणार्यांना बाहेर काढाण्याची मागणी केली. राष्ट्रवादीची पडझड रोखण्यासाठी जिल्हाध्यक्ष बदलाची मागणी वाढू लागल्यानंतर ही जबाबदारी अॅड.रवींद्र पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. परंतु आमदार पाटील व देवकर यांनी जिल्हाध्यक्ष होण्यास नकार दिल्याने पर्याया अभावी अॅड.पाटील यांच्याकडे हे पद आले असल्याची जाणीव त्यांना देखील आहे. अॅड.पाटील हे शरद पवार यांच्या विश्वासातील जुने नेते असले तरी पक्षातर्फे लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये सातत्याने पराभूत होण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे तसेच संघटनेवर त्यांची भक्कम पकड देखील नाही. आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांच्या निवडीत भक्कम संघटन असलेल्या जळगाव लोकसभा मतदार संघाला डावलून रावेर लोकसभा मतदार संघात सर्वाधिक पदे देण्यात आली. जिल्हाध्यक्ष पाटील हे बोदवड तालुक्यातील आहेत. कार्याध्यक्ष विलास पाटील हे यावलचे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील या जामनेरच्या तर युवकचे जिल्हाध्यक्ष ललीत बागुल हे चोपड्याचे आहेत. यामुळे असंतोष निर्माण झाला असून जळगाव लोकसभा मतदारसंघातील नेत्यांनी पक्षाकडे नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे पक्ष संघटन मजबूत करण्याचे शिवधणुष्य नुतन जिल्हाध्यक्ष कसे पेलतात, याची सर्वांना उत्सुकता आहे.
I am a journalist and Social Researcher. My passion within journalism is much more than just writing the articles, I take great interest in researching & Utilizing all the information from my research I try to write in 360 degree.
Post a Comment