बोंडअळीचा सामना


बोंडअळीच्या आक्रमणामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी करण्यात येणारा किटकनाषकांचा खर्च परवडत नसल्याने शेतकर्‍यांनी उभ्या शेतातील कापसावर नांगर फिरवण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभागाने बोंडअळी नियंत्रणासाठी फेरोमेन सापळे लावण्याचे आवाहन केले मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. यावर मात करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी घरी तयार केलेल्या ‘बोंडअळी किलर मशिन’चा वापर करत असून यामुळे बोंडअळी नियंत्रणात येण्यास मदत होत असल्याचा दावा वापरकर्त्या शेतकर्‍यांकडून करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी सरासरी चार लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. जळगावसह खान्देशात दरवर्षी १२ ते १५ लाख गाठी कापसाचे उत्पादन होते. यातील जवळपास पाच लाख गाठी कापूस निर्यात होते. या वर्षी मात्र बोंडअळीमुळे जिल्ह्यातील कापसाची गुणवत्ता घसरण्याची शक्यता असून उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांपर्यंत घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी देखील याच बोंडअळीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकासान होवून उत्पादनात २० टक्के घट आली होती. याचा फटका शेतकर्‍यांसह जीनिंग उद्योगाला देखील मोठ्या प्रमाणात बसला. गेल्या वर्षी बीटी कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशी काळजी घेवून देखील यंदा जुलै महिन्यातच हजारे हेक्टर क्षेत्रफळावरील कापसावर बोंडअळीचा प्रादर्भाव झाला आहे. कृषी विभागाने तातडीने बोंडअळी नियंत्रणाची मोहीम हाती घेतली असून शेतकर्‍यांनी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याची खात्री करण्यासाठी शेतात फेरोमेन सापळे लावावेत, काड्यांची अ‍ॅन्टेना लावावी. फेरोमेन सापळ्यात नर पतंगाची संख्या जास्त असल्यास शेतामध्ये फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. सापळ्यामध्ये सापडलेल्या नर पतंगांना नष्ट करून त्यानंतर कपाशीवर निंबोळी अर्क तसेच कृषी विभागाने सुचवलेल्या औषधांची फवारणी करावी, शेतात अँटेना (पक्षी थांबे)बसवल्यास त्यावर पक्षी बसून कापसाच्या झाडावरील अळ्या टिपून घेत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. मात्र हा प्रयोग यशस्वी होत नसल्याने पाचोरा येथील तरुण संशोधक योगेश बारी यांनी घरगुती साधनांचा वापर करुन ‘बोंडअळी किलर मशिन’ तयार तयार केले आहे. हे उपकरण कपाशीच्या बोंडावर अळी होण्या अगोदर नष्ट करते. त्यामुळे बोंडअळी नष्ट करण्यासाठी लागणारा हजारो रुपयाच्या फवारणीच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. अल्प खर्चात तयार करणार आलेले बॅटरीवर चालणारे एक मशीन तब्बल दोन एकराच्या परिसरात काम करते. याचा प्रयोग काही शेतकर्‍यांच्या शेतात करण्यात आला असून तो यशस्वी झाल्याचा दावा बारी यांनी केला आहे. बोंडअळी ही पतंग किड्याच्या अंडीपासून तयार होते. त्यामुळे पतंग किड्यांना जर नष्ट केले तर कपाशीवर बोंडअळी पडणार नाही या अनुषंगाने हे मशीन तयार केले आहे. यासाठी दीड फुटाचा पाईप वापरण्यात आला आहे. किड्यांना आकर्षित करण्यासाठी पाईपमध्ये पिवळ्या रंगाचा बल्ब, कमगंध चॉकलेट, शॉक सिस्टिम-सेन्सर, व्हॅक्युम फॅन, हायफोकस एलएडी, बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. हे मशीन रात्री शेताच्या मध्यभागी लावल्यानंतर पतंग किडे त्याकडे आकर्षित होतात व जवळ आल्यावर पूर्णपणे नष्ट होतात. पतंग किडे नष्ट झाल्यानंतर बोंडअळीच पडत नाही. एक मशीन २ एकरमध्ये काम करत. बारी यांनी मशीन तयार करण्यासाठी प्रत्येकाच्या घरात सापडतील अशा काही वस्तूचा वापर केला आहे. यात प्लास्टिकचा डबा, १२ व्होल्टची बॅटरी, वायर, स्विच, पीव्हिसी पाईप-टी, इलेक्ट्रॉनिक सर्किट, हायफोकस, एलइडी लाईट, इलेक्ट्रॉनिक शॉक सेन्सर, बॅटरी चार्जर आदीचा समावेश असून त्यासाठी साधारणतः तिन हजार रुपये खर्च आला असून शेतकर्‍यांनी असे मशिन घरीच तयार करुन शेतात लावावे, असे आवाहन बारी यांनी केले आहे.

बोंडअळी कशी ओळखावी

बी.टी., संकरीत बियाणे वापरल्या जाणार्‍या शेतात याचा जास्त प्रादुर्भाव होतो. या अळ्यांची अंडी चपटी व सुमारे १ मिमी लांब असतात. ती पांढर्‍या रंगाची असतात.या कीडीची मादी झाडाची फुले,बोंड, देठ व कोवळ्या पानाच्या खालचे बाजूस आपली अंडी देते. ती पक्व झाल्यावर, या अंड्यांतून, पांढर्‍या रंगाची अळी उत्पन्न होते. कोषावस्थेत आलेली अळी ही लालसर तपकिरी अथवा क्वचित शेंदरी रंगाची दिसते. कोषावस्था एक आठवडा ते ३ आठवडा इतकी राहू शकते. मग त्यातुन पतंग बाहेर येतात.यांची पतंगावस्था ही एक आठवडा ते एक महिना इतकी राहू शकते. अंड्यातून निघालेली अळी ही खाद्य प्राप्त करण्यासाठी कापसाचे बोंडात शिरते. नंतर ती आपल्या विष्ठेने व बोंड कुरतडून प्राप्त झालेल्या बारीक कणांचे आधाराने आत शिरण्याचे छिद्र बंद करते. असे छिद्र साधारणपणे नजर टाकल्यावर दिसून येत नाही.म्हणून या कीडीचा प्रादुर्भाव झाला हे सहजपणे समजून येते नाही.अशी कापसाची बोंडे परिपक्व न होताच गळून पडतात व फुटतात.तसेच ही कीड/अळी बोंडाचे आत असलेल्या सरकीचेही नुकसान करते. किडलेल्या सरकीमुळे भविष्यात त्याची उगवणशक्ति कमी होते.याचे प्रादुर्भावाने कापसाच्या धाग्याची लांबी व मजबूती कमी होते. या कीडीचा शोध घेण्याचा सोपा प्रकार म्हणजे फेरोमेन सापळा लावणे. अशा सापळ्याचे निरिक्षण केले असता, त्यात सतत २-३ दिवस लागोपाठ ८-१० अथवा जास्त नर पतंग आढळून आल्यास, या अळीचा प्रादुर्भाव झाला असे समजावे.

बोंडअळी पडू नये म्हणून लागवडीनंतर ३० दिवसाने शेतकर्‍यांना औषधाची फवारणी करावी लागते. साधारणतः १ एकरासाठी एका हंगामात ६ ते ७ वेळा फवारणी करावी लागत असून यासाठी सुमारे ५ ते ६ हजार रुपयापर्यंत खर्च येतो; पण ‘बोंडअळी किलर मशिन’मुळे या खर्चात बचत होणार आहे.- योगेश बारी

(सदर लेख दैनिक लोकसत्तामध्ये ४ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध झाला आहे)

Post a Comment

Designed By Blogger