सुरेश जैन यांची सद्दी संपुष्टात!


जळगावच्या राजकारणातील दादा म्हणवणारे सुरेश जैन यांनी अनेकदा पक्ष बदलूनही निवडणुका जिंकल्या. यामुळे जळगाव शहर व सुरेश जैन हे गेल्या ४० वर्षांपासूनचे अतूट समीकरण राहिले. सतत आठ वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर १९८५ पासून दोन वर्षांचा अपवाद वगळल्यास गेल्या ३५ वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव महापालिकेवर सत्ता होती. घरकुल घोटाळाप्रकरणी अटक झाल्यानंतर २०१३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या वर्चस्वाला खिंडार पडले. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाल्याने जळगावमधील दादापर्व संपण्यास सुरुवात झाली. आता राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पालिका निवडणुकीत सुरेश दादांची सद्दी संपुष्टात आणून जैन यांचे संस्थान खालसा केल्याचे मानले जात आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे राजकारण जैन कुटुंबियांभोवती सतत फिरत राहिले. सुरेश जैन यांचे वडील भिकमचंद जैन नगरपालिकेच्या राजकारणात होते. त्यानंतर जैन हे जळगाव नगरपालिकेच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. सुरेशदादांनी अनेकदा पक्ष बदलले, पण त्यांच्या भूमिकेचे जळगावकरांनी नेहमीच स्वागत केले. यामुळे अनेकवेळा पक्ष बदलूनही जनतेच्या पाठिंब्यावर जैन सातत्याने निवडून आले. सुरेशदादांनी तब्बल आठ वेळा विधानसभेवर प्रतिनिधीत्व केले. १९८० मध्ये जैन पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर आमदारपदी विराजमान झाले. पुढे १९८५ आणि १९९० मध्ये समाजवादी काँग्रेसच्या तिकीटावर, १९९५ मध्ये काँग्रेस तर १९९९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर जैन आमदार झाले. २००४ मध्ये पुन्हा पक्ष बदलत जैन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. तर २००९ मध्ये पुन्हा शिवसेनेच्या तिकीटावर ते आमदार झाले. २००८ मध्ये त्यांनी खान्देश विकास आघाडीची स्थापना करत त्यांचे लहान बंधू रमेश जैन यांना राजकारणात आणले. रमेश जैन यांचा महापालिकेत तत्कालिन आयुक्त प्रविण गेडाम यांच्याशी वाद झाल्यानंतर सुरेश दादांच्या मानगुटीवर घरकुल घोटाळ्याचे भूत बसले.

तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी घरकुल घोटाळ्याच्या तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुरेश दादांच्या लोकप्रियतेचे बुरुज ढासळण्यास सुरुवात झाली. तत्कालीन महसूलमंत्री, सुरेश दादांचे कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांनी घरकुल घोटाळ्याच्या विषयावरून रान उठवले. यानंतर सुरेश दादा, त्यांचे वजीर मानले जाणारे प्रदिप रायसोनींसह अनेक रथी महारथींना तब्बल साडे चार वर्ष तुरुंगात काढावे लागले. या दरम्यान २०१३ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. सुरेश दादा तुरुंगात असतानाही त्यांच्या खान्देश विकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकत शहर विकास आघाडी, मनसे व जनक्रांतीच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली. अल्पमतात असतानाही त्यांनी पूर्ण पाच वर्षे सत्ता उपभोगली. मात्र, येथेच सुरेश दादांच्या साम्राज्याला खडसे यांनी खिंडार पाडले होते. २०१४ मध्ये शिवसेनेने आपला माणूस अशी भावनिक साद देत तुरुंगात असलेल्या सुरेश दादांना पुन्हा विधानसभा निवडणुकीत संधी दिली. मात्र त्यावेळी खडसेंनी तत्कालिन नगरसेवक सुरेश भोळे यांना भाजपतर्फे उमेदवारी देत निवडूनही आणले. भोळे यांनी विक्रमी मतांनी जैनांना पराभूत केले. याचे श्रेय पूर्णपणे खडसेंना मिळाले.

साडेचार वर्षांनंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर जैन यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करत भविष्यात केवळ सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचे स्पष्ट केले. दीड-दोन वर्ष ते अलिप्तही राहिले. मात्र, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत त्यांनी अचानकपणे उडी घेत खडसेंना पहिला धक्का दिला. सुरेशदादा राजकारणात सक्रिय झाल्याने शिवसेनेत उत्साह आला. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, ते कमालीचे सक्रिय झाले. यामुळे महापालिका निवडणुकीकडे सुरेश दादांची अस्तित्वाची लढाई म्हणूनही पाहिले जाऊ लागले. सुरूवातीला त्यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिका न घेता भाजपशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खडसेंच्या विरोधामुळे तो प्रयत्न फसल्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ते निवडणुकीला सामोरे गेले. यात भाजपने त्यांचा पूर्णपणे धुव्वा उडविला. यामुळे दादा पर्वाचा अस्त झाला. मात्र हा पराभव सुरेशदादांचा नसून शिवसेनेचा आहे, असा मानणारा मोठा गट जळगावात आहे. धरसोड भूमिकेमुळे शिवसेनेविषयी नकारात्मक वातावरण निर्माण होत आहे, याचा फटका निवडणुकीत बसला तसेच धनुष्य बाणावर निवडणूक लढविली गेल्याने सुरेश दादांना मानणारा मुस्लिम मतदारही दूर गेला. यामुळे एमआयएमसारखा पक्ष जळगावमध्ये शिरकाव करु शकला, अशी त्यांच्या समर्थकांची भावना आहे.

विधानसभा लढवणार का?

तुरुंगातून सुटून आल्यावर निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याचे सुरेशदादांनी जाहीर केले होते. पण महानगरपालिका निवडणुकीत सक्रिय झाल्याने सुरेशदादा पुन्हा विधानसभा लढणार, असे वातावरण तयार झाले. महानगरपालिका निवडणुकीत सुरेशदादांचा धुव्वा उडाल्याने ते विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत साशंक आहेत.

Loksatta Link - https://www.loksatta.com/maharashtra-news/suresh-dada-jain-political-power-end-in-jalgaon-after-defeat-1726570/

Post a Comment

Designed By Blogger