जळगावमधील यशाने गिरीश महाजन यांचे वर्चस्व वाढले


मराठा आंदोलनांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर असलेला समाजाचा रोष तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नाराजी अशा दुहेरी अडचणींच्या पाश्र्वभूमीवर जळगाव महापालिका निवडणुकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एकहाती भाजपला बहुमत मिळवून देण्यात यश मिळविले. भाजपच्या या यशाने महापालिकेवरील सुरेश जैन यांचे ३५ वर्षांपासूनचे वर्चस्व संपविलेच, परंतु पक्षांतर्गत विरोधक समजल्या जाणाऱ्या खडसे यांनाही हादरा दिला. त्यामुळेच महाजन यांनी ‘एका विजयाने दोन पराजित’ केले असे म्हटले तर वावगे ठरू नये.

निवडणुकीत भाजपने ७५ पैकी ५७ जागांवर विजय मिळवला. राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना हे दोघे या निवडणुकीत स्वबळ आजमावीत असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागून होते. एरवी पालिका निवडणूक खान्देश विकास आघाडीच्या शिक्क्याखाली लढविणाऱ्या सुरेश जैन यांनी प्रथमच शिवसेनेच्या चिन्हावर आपले उमेदवार उभे केले. त्यांना केवळ १५ जागांवर विजय मिळवता आला. अनपेक्षितपणे एमआयएमने तीन जागांसह महापालिकेत प्रवेश केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खातेदेखील उघडता आले नाही.

या निवडणुकीकडे विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनदेखील बघितले जात होते. मागील ३५ वर्षांपासून महापालिकेवर माजी मंत्री सुरेश जैन यांचे निर्विवाद वर्चस्व होते. जैन यांच्या या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी गिरीश महाजन यांनी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावली. गेल्या विधानसभा निवडणुकीत सुरेश जैन यांचा भाजपने पराभव केला. तेव्हा सुरेशदादा तुरुंगात होते. तुरुंगातून सुटल्यावर जळगावमध्ये आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा सुरेशदादांनी प्रयत्न केला. पण जळगावकरांनी गैरव्यवहारांच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगलेल्या सुरेशदादांना नाकारले.

आमदार सुरेश भोळे यांची किमया

महाजन यांच्याकडे निवडणुकीची धुरा सोपविल्याने पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे निवडणुकीच्या मैदानापासून लांबच राहिले. अशा परिस्थितीत महाजन यांच्यासह शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी सर्व सूत्रे हाती घेतली. ‘फिफ्टी प्लस’चा नारा देत भाजपने पहिल्या दिवसापासून आक्रमक प्रचार केला. सुरुवातीलाच तोडाफोडीचे राजकारण करत महाजन यांनी अन्य पक्षांना खिंडार पाडत १६ उमेदवार आयात केले. त्या सर्वाना तिकीट देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्यांना उमेदवारी या निर्णयाला भाजपमधील एका गटाने विरोध केल्यावरही महाजन यांनी रणनीतीत कोणताच बदल केला नाही.

शेवटच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना मराठा आरक्षणाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे वगळता अन्य कोणत्याही मोठय़ा नेत्याने जळगावात हजेरी लावली नाही. यामुळे पूर्णपणे स्थानिक पातळीवर लढल्या गेलेल्या या निवडणुकीत भाजपने शहर विकासासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मिळवणार या प्रमुख आश्वासनासह महापालिकेवरील कर्ज, गाळेधारकांचा प्रश्न, फेरीवाल्यांचे स्थलांतर, रस्त्यांची अवस्था या प्रमुख मुद्दय़ांवर लक्ष केंद्रित केले. सत्ताधारी शिवसेना अर्थात जैनांच्या खान्देश विकास आघाडीच्या विरोधात आक्रमकपणे प्रचार केला. वर्चस्व राखण्यासाठी शिवसेनेकडूनही जोरदार प्रचार करण्यात आला. भाजप हा केवळ आश्वासन देणाऱ्यांचा पक्ष आहे, असे सांगत त्यांनी भाजपविरोधी तयार झालेल्या वातावरणाचा फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे अस्तित्व शहरातून पूर्णपणे संपल्याने राष्ट्रवादीकडून काही अपेक्षा होत्या, परंतु काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील सत्तेच्या रस्सीखेचमुळे पक्षाला फटका बसला.

मावळत्या महापालिकेत १४ सदस्य असलेल्या राष्ट्रवादीला यंदा भोपळादेखील फोडता आला नाही. त्याच वेळी ओवेसी यांच्या एकमेव सभेच्या जोरावर एमआयएमने तीन जागांवर मिळवलेला विजय महत्त्वपूर्ण ठरला. भाजपची घोडदौड सुरू असताना आश्चर्याची गोष्ट म्हणजे खडसेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे भाजपचे तिन्ही उमेदवार पराभूत झाले. भाजपच्या या विजयामुळे पक्षातंर्गत गिरीश महाजन यांचे स्थानिक आणि राज्य पातळीवरील वजन अधिकच वाढणार आहे.

समीकरणे बदलली

आतापर्यंत जळगाव म्हटल्यावर एकनाथ खडसे विरुद्ध सुरेश जैन, असे समीकरण होते. पण दादा (सुरेशदादा) आणि नाथाभाऊ (एकनाथ खडसे) या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना जळगावकरांनी धक्का दिला आहे. गिरीश महाजन यांचे जिल्ह्य़ाच्या राजकारणात वर्चस्व वाढले आहे. एकनाथ खडसे यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना जिल्ह्य़ाच्या राजकारणात ताकद दिली.

लोकसत्ता लिंक - https://www.loksatta.com/maharashtra-news/girish-mahajan-won-in-jalgaon-election-1725066/

Post a Comment

Designed By Blogger