जळगावमध्ये आयात उमेदवारांवर भाजपची भिस्त!


जळगाव महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी भाजपने पन्नास जागा जिंकण्याचा नारा देत सर्व ७५ जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या १६ आयात नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. त्यात मनसे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, शिवसेना पुरस्कृत खान्देश विकास आघाडीचे तीन, जनक्रांतीचे एक यांच्यासह गेल्या वेळच्या अपक्षांचाही समावेश आहे. तोडफोडीच्या राजकारणात भाजपच्या दोन विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली तसेच अनेकांना डावलण्यात आल्याने त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. यामुळे भाजपसमोर बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे.

जळगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. भाजप-शिवसेना युतीचा विषय बारगळल्यानंतर दोन्ही पक्षांनी सर्व ७५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आघाडी केल्याने तिरंगी लढती होण्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ६१५ इच्छुकांनी अर्ज दाखल केले. यात भाजप ७५, शिवसेना ७५, राष्ट्रवादी ५२, काँग्रेस १७, समाजवादी पक्ष सहा आणि ३९० अपक्षांचा समावेश आहे. गेल्या पंचवार्षिकला ४६ जागा लढवून १२ जागा जिंकणारी मनसे आणि गेल्या वर्षभरापासून निवडणुकीच्या तयारीला लागलेला आप निवडणुकीच्या रिंगणातून लांब आहे. मावळते महापौर ललित कोल्हे यांच्यासह मनसेच्या सहा नगरसेवकांना भाजपने तर अनंत जोशी आणि लीना पवार यांना शिवसेनेने तिकीट दिले आहे. तसेच आपच्या दोघांनी काँग्रेसमधून उमेदवारी मिळवली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठ पैकी सहा जणांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. तर गेल्या २५ वर्षांपासून भाजपचे सक्रिय सदस्य असलेले नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांना डावलल्याने शिवसेनेने त्यांना उमेदवारी देण्याची खेळी करत भाजपच्या अडचणी वाढवल्या आहेत. भाजपच्या महानगराध्यक्षा जयश्री पाटील यांनाही पुन्हा संधी न देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी भाजप हा पैशांवर चालणारा पक्ष असल्याची टीका करत बंडाचे निशाण फडकावले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कोल्हे आणि एकेकाळचे जैन समर्थक कैलास सोनवणे हे भाजपतर्फे निवडणुकीची सूत्रे हलवत असल्याने ते भाजप कार्यकर्त्यांना आतापासून खटकू लागले आहे. माजी मंत्री सुरेश जैन यांनी शिवसेनेकडून २२ विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी देत ५५ टक्के नवीन आणि युवा कार्यकर्त्यांना रिंगणात उतरवले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांपासून अनेक माजी मंत्र्यांनी जळगाव जिल्हा काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न केला. यासाठी त्यांनी पदाधिकारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी उमेदवारी देण्याच्या सूचनाही केल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष कोणीही उमेदवारी घेतली नाही. गेल्या वेळी निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या १२ नगरसेवकांपैकी यंदा चार सदस्य शिवसेनेकडून तर चार सदस्य भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. उर्वरित चार सदस्यांना राष्ट्रवादीने पुन्हा संधी दिली आहे. भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे यादेखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने दोघांच्या लढती पक्षासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. माघारीसाठी १७ तारखेपर्यंत मुदत असल्याने अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्यांची मनधरणी करण्यास सुरुवात झाली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा सावळागोंधळ

पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजप आणि शिवसेनेला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने मतभेद बाजूला ठेवत आघाडी केली आहे. राष्ट्रवादी ५३, काँग्रेस १७ तर सपा पाच जागा लढविणार असल्याचे सूत्र निश्चित झाल्यानंतरही तिन्ही पक्षांमध्ये गोंधळ सुरू आहे. काँग्रेसचा गेल्या १५ वर्षांपासून एकही नगरसेवक निवडून येत नसल्याने यंदा राज्य पातळीवरून मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. यामुळे यंदा काँग्रेस किमान खाते तरी उघडेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीलाही गटबाजी, ऐनवेळी दगाफटका करण्याची लागण झाली. निवडणुकीची धुरा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर सोपविण्यात आली. भाजप आणि शिवसेनेने युतीची भाषा करत सर्व ७५ जागांवर जय्यत तयारी करत तगडे उमेदवार दिल्याने बहुतांश ठिकाणी या दोन्ही पक्षांमध्येच तुल्यबळ लढती होण्याची चिन्हे आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे विधिमंडळाच्या कामात तर माजी मंत्री एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर नगर पालिकेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने जळगावमध्ये शहराचे आमदार सुरेश भोळे हे एकहाती कमान सांभाळत आहेत. शिवसेनेची सर्व सूत्रे माजी मंत्री सुरेश जैन यांच्या शिवाजीनगर निवासस्थानावरून हलविली जात आहेत. शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी सर्व आजी-माजी नेते एकत्र आल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

Designed By Blogger