जळगावमध्ये भाजपची शिवसेनेमागे फरफट


जळगावमध्ये भाजपचे नेतृत्व एकनाथ खडसे करीत असताना त्यांचे आणि सुरेश जैन यांचे विळ्याभोपळ्याचे नाते होते. उभयतांमधून विस्तवही जात नव्हता. पुण्यातील जमीन गैरव्यवहारप्रकरणी आरोप झाल्यावर खडसे यांचे मंत्रिपद गेले आणि जळगावच्या भाजपच्या राजकारणातून नाथाभाऊंना पद्धतशीरपणे दूर करण्यात आले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बेरजेच्या राजकारणावर भर देत सर्वाशी जमवून घेतले. यातूनच जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने सुरेश जैन किंवा शिवसेनेशी युती करण्याची योजना आखली आहे.

राज्यात व केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना-भाजपची युती तुटेपर्यंत ताणली गेली आहे. वरिष्ठ पातळीवर संबंध कितीही ताणले गेले असताना जळगाव महापालिका निवडणुकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते सुरेश जैन यांच्या पुढाकाराने भाजप-सेनेची युतीची मोट बांधली जात आहे. या युतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनीही हिरवा कंदील दाखविल्याने युतीचा नवा अध्याय जळगावमधून लिहिला जाण्याची शक्यता आहे. यामुळे जळगावच्या राजकारणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जळगावात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. गेल्या आठवडय़ात गिरीश महाजन आणि सुरेश जैन यांनी मुख्यमंत्र्यांशी युतीबाबत चर्चा केली. त्यानंतर जैन यांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. सध्या जळगाव महापालिकेवर जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीची (खाविआ) सत्ता असली तरी आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका लक्षात घेत घराघरात पक्षाचे चिन्ह पोहोचावे यासाठी ही निवडणूक धनुष्यबाण चिन्हावरच लढवावी, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली. या पाश्र्वभूमीवर, जैन यांच्या निवासस्थानी शिवसेना नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला जैन यांच्यासह सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार आर. ओ. पाटील, संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, खाविआचे अध्यक्ष रमेश जैन, महापौर ललित कोल्हे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर महापालिका निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याची घोषणा करण्यात आली.

खान्देश विकास आघाडी आणि शिवसेना हे दोन्ही एकच आहेत. शहराच्या विकासाच्या मुद्दय़ावर आम्हाला निवडणूक लढायची आहे. त्यामुळे यंदा आम्ही महापालिका निवडणूक ही धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याची भूमिका जैन यांनी स्पष्ट केली. या निर्णयामुळे शिवसेना की खाविआ, या वादावर पडदा पडला आहे. जळगावची निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढली जाणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. हा निर्णय म्हणजे युतीच्या दिशेने उचलण्यात आलेले ठोस पाऊल मानले जात आहे. दुसरीकडे महाजन यांनी नाराज असलेले शहराचे आमदार सुरेश भोळे यांना जवळ करत स्वबळाचा नारा देणाऱ्या या गटाची तीव्रता कमी केली आहे. जळगाव शहरात भाजप, शिवसेना हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. मात्र जैन-महाजन यांच्या जोडीने एकत्र येत नव्या राजकारणाची सुरुवात करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. सेना-भाजप युतीचा हा जळगाव पॅटर्न राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

जागावाटपाचा तिढा

२००८च्या सार्वत्रिक निवडणुकीत सुरेशदादांचे धाकटे बंधू रमेश जैन यांच्या नेतृत्वाखाली खान्देश विकास आघाडीने कैलास सोनवणे यांच्या शहर विकास आघाडीशी युती करत सर्वप्रथम सत्ता मिळवली होती. त्यानंतर २०१३ च्या निवडणुकीत खाविआने जनक्रांती, अपक्षांच्या सहकार्याने सत्ता काबीज केली होती. या काळात अनेक राजकीय उलथापालथी झाल्यानंतरही मनसे आणि राष्ट्रवादीला हाताशी धरून सुरेश जैन यांनी महापालिकेवर आपले वर्चस्व कायम ठेवले. सध्या खान्देश विकास आघाडीचे ३३, शिवसेना दोन, मनसे १२ असे एकूण ४८ नगरसेवक शिवसेनेकडे आहेत, तर भाजपचे १५ नगरसेवक आहेत. यामुळे युती झाल्यास शिवसेनेचा अधिक जागांवर दावा राहणार आहे. याबाबत दोन्ही पक्षांनी अद्याप भूमिका जाहीर केली नसल्याने जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरावयाचे बाकी आहे. ४ जुलैनंतर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यासह महापौर कोणाचा, या विषयावर देखील दोन्ही पक्षांची जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

Post a Comment

Designed By Blogger