भाजप-शिवसेनेची भाषा युतीची, तयारी मात्र स्वबळाची


जळगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी, खान्देश विकास आघाडी (खाविआ) व मनसेला खिंडार पाडले असून गेल्या ४८ तासात १३ वजनदार नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी व काही माजी नगरसेवक भाजपाच्या तंबुत दाखल झाले आहेत. यात गेल्या आठवड्यात खान्देश विकास आघाडीसोबत गेलेले मनसेचे माजी महापौर ललित कोल्हे यांचाही समावेश आहे. कोल्हे यांच्यासह ऐकेकाळी जैन यांच्या सोबत असलेले शहर विकास आघाडीचे कैलास सोनवणे देखील भाजपासोबत आल्याने भाजप-शिवसेनेचे संबंध ताणले गेले आहेत. जलसंपदामंत्री गिरीष महाजन व माजी मंत्री सुरेश जैन भाजप-शिवसेना युतीची भाषा करत असले तरी दोन्ही पक्षांनी स्वबळाची जय्यत तयारी चालवली असल्याचे उघड झाले आहे.

जळगाव महापालिकेच्या निवडणुकसाठी दि.१ ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून जळगावची निवडणूक चर्चेत आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वबळाची भुमिका मांडल्यानंतर शहराचे भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांनी फिफ्टी प्लसचा नारा देत जोरदार तयारी सुरु केली. मात्र त्याच वेळी गिरीश महाजन व सुरेश जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन भाजप-शिवसेना युतीची घोषणा केली होती. जैन यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचीही भेट घेवून चर्चा केली. दोन्ही पक्षांच्या श्रेष्टींकडून युतीसाठी हिरवा कंदिल मिळाल्याने युतीवर शिक्कामोर्तब झाले. यामुळे जैन यांच्या गोटात आनंदाचे वातावरण होते मात्र महाजन वगळता भाजपा पदाधिकार्‍यांकडून यास विरोधच होता. याच वेळी ही निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले. यामुळे जैन यांच्या खाविआच्या गोटात अस्वस्थता पसरली. निवडणूक धणुष्यबाण या चिन्हावर लढवल्यास खाविआचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी भीती खाविआच्या नेत्यांना सतावू लागली. यामुळे महाजन यांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांशी जवळीक करण्याचा जैन यांचा प्रयत्न स्वत:वरच उलटल्याने खाविआची रणनिती बदलण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे महाजन यांनीही भाजपातर्फे सर्व ७५ जागांसाठी मुलाखती घेवून चाचपणी केली, खाविआने देखील सर्व जागांसाठी ÷इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. तोपर्यंत दोन्ही बाजूने युतीचीच भाषा केली जात होती. मात्र शनिवारनंतर जोरदार घडामोडी घडण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादी, खाविआ व मनसेच्या सात वजनदार नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून निवडणुकीची धुरा सांभाळणारे महानगराध्यक्ष निलेश पाटील हे देखील भाजपाच्या तंबुत आल्याने राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला. त्यापाठोपाठ शहर विकास आघाडीचे कैलास सोनवणे यांनीही भाजपात प्रवेश करत तिन प्रभागांमधून उमेदवार देखील जाहीर केले. अन्य पक्ष या पडझडीच्या धक्क्यातून सावरत असतांना गेल्या पाच वर्षांपासून खाविआसोबत असलेले मनसेचे माजी महापौर यांनी सहा नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला. शिवसेना शहर प्रमुख कुलभूषण पाटील हे देखील भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांचे लहान बंधू पंकज पाटील यांनी भाजपात प्रवेश केला असल्याने कुलभूषण पाटील यांचाही भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. या तोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्‍वभुमीवर युती तुटण्याची केवळ औपचारीक घोषणा होणे बाकी असतांना युतीसाठी चर्चा सुरु असल्याचा दावा दोन्ही बाजूकडच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान येत्या २४ तासात काही आजी-माजी नगरसेवकांचाही भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती भाजपातर्फे देण्यात आली.

खडसेंच्या भुमिकेचा विजय

गेल्या दोन-तिन दिवसांपासून होत असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर महाजन यांचाही सुर बदलला आहे. गेल्या १५ वर्षांत शहरात जे चालले आहे, त्याचा कंटाळा आला आहे. शहरात कुठलीही ठोस कामे झालेली नाहीत. शहरातील विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. म्हणूनच वजनदार नगरसेवकांना भाजपत प्रवेश करून घेतला जात आहे. शहराचा महापौर व एकहाती सत्ता भाजपचीच येईल, असा दावा महाजन यांनी केला आहे. तर खाविआचे अध्यक्ष रमेश जैन यांनी शिवसेनेला ४७ जागांची अपेक्षा आहे. भाजपने ४० जागांवर दावा केला असला, तरी कशाच्या आधारे ही मागणी करताय? ते आधी सिद्ध करावे लागेल, अन्यथा स्वबळावर लढावे, अशी भुमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार सतीष पाटील यांनी भाजपाच्या तोडीफोडीच्या राजकारणावर जोरदार टिका केली आहे. या घडामोडींमुळे खडसेंच्या गोटात जोरदार उत्साह पसरला आहे. कारण महाजन यांनी हा विषय प्रतिष्ठेचा करत पुर्ण ताकद पणाला लावली होती मात्र मात्र खडसे यांच्याच भुमिकेचा विजय झाल्याचे मानला जात आहे.

Post a Comment

Designed By Blogger