जामिनावर बाहेर आल्यावर आता सक्रिय राजकारण नाही तर समाजकारण करणार, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. सध्या ते जामिनावर बाहेर असले तरी खटल्याचा निकाल अजून लागलेला नाही. निकाल काय लागतो, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असल्याने ते सावध खेळी करत आहेत. जळगाव शहर आणि सुरेश जैन हे गेल्या ४० वर्षांतील समीकरण आहे. जळगाव विधानसभा मतदारसंघातून जैन यांनी सलग नऊ वेळा आमदारकी भूषविली. अनेकदा पक्ष बदलले, मात्र प्रत्येक वेळी ते निवडून आले. २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत भाजपचे सुरेश भोळे यांनी जैन यांचा पराभव केला. भोळे यांच्या विजयात जैनांचे कट्टर राजकीय विरोधक माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुख्य भूमिका होती. त्यावेळी जैन धुळे कारागृहात होते. कारागृहात असतानाही शिवसेनेने ‘आपला माणूस’ म्हणून त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली, उद्धव ठाकरेंनी त्यांचा प्रचारही केला. मात्र जळगावकरांनी त्यांना नाकारले.
जळगाव महापालिकेच्या घरकुल योजनेत २९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जैन यांना १० मार्च २०१२ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून जैन यांनी अनेकदा जामीन मागण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी नामांकित वकिलांची फौज उभी केली. पण त्याला यश आले नाही. अखेर तीन सप्टेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान शहरात एका कार्यक्रमात त्यांनी यापुढे मला मते मागण्यासाठी जायचे नाही, तुम्हालाच जायचे आहे, असे विधान सुरेश भोळे यांना उद्देशून केले. यामुळे जैन हे राजकारणातून संन्यास घेणार असल्याची चर्चा शहरात रंगली होती. मात्र काही महिन्यांतच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करत जैन राजकारणात सक्रिय झाले. कारण नारखेडे हे खडसेंचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांची ही खेळी खडसे गटावर पहिला डाव म्हणून ओळखली गेली.
महाजनांच्या माध्यमातून भाजपशी जवळीक
जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच जैन हे अचानक सक्रिय झाले. इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असताना त्यांनी महापालिकेसाठी भाजप-शिवसेना युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे सांगत राजकीय बॉम्बगोळा टाकला. त्यांनी गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भाजपशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला. महाजन यांनीही जैन यांच्या खान्देश विकास आघाडी (खाविआ) आणि भाजप युतीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यास शहरातील भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांच्यासह एका मोठय़ा गटाचा तीव्र विरोध आहे. जैन यांचे राजकारण भल्याभल्यांना समजलेले नाही. कारण, ते एकीकडे शिवसेना नेते असले तरी जळगाव शहरात खाविआच्या नावाखाली शिवसेनेचे अस्तित्व जवळपास संपले आहे. गेल्या वेळी मनसेचे १२ नगरसेवक निवडून आले. मात्र त्यांनीही आता खाविआ बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने शहरातून मनसेदेखील संपली आहे. यामुळे ते भाजप-शिवसेना युती म्हणत असले तरी ती भाजप-खाविआ युती राहणार आहे. यास भाजपच्या एका गटाचा विरोध आहे.
Post a Comment