सत्तासंघर्षामुळे जळगाव जिल्हा भाजपात उभी फुट


माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सत्तासंघर्षामुळे जळगाव जिल्हा भाजपात उभी फुट पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पातळीवरुन हा वाद मिटवण्या ऐवजी त्यास सातत्याने खतपाणी दिले जात असल्याने संपुर्ण राज्यात भाजपाचा भक्कम बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या जळगाव जिल्ह्यात अनेक बुरुज ढासळू लागली आहे. महाजन यांनी केळी उत्पादक शेतकर्‍यांना अरेरावी केल्याने त्यांच्या कार्यालयावर करण्यात आलेले केळी फेक आंदोलन, भाजपा जिल्हाध्यक्षांवर ड्रग माफियांना सरंक्षण देण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप, खडसेंमुळे भाजपात आलेल्या चोपडा साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष शशिकांत देवरे यांची झालेली हकालपट्टी, वाकडी येथे मागासवर्गीय मुलांना नग्न करुन केली मारहाण आदी घटनांमुळे भाजापाची वाट बिकट असल्याचे मानले जात आहे.

राज्यात व केंद्रात सत्ता असतांना जळगाव जिल्हा भाजपा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अडचणीत येत आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकत्व असलेले महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जिल्हावासियांचा विशेषत: शेतकर्‍यांचा प्रचंड रोष आहे. पाटील हे दोन ते तिन महिन्यातून एकदा जिल्ह्यात हजेरी लावतात व जिल्हाधिकारी कार्यालयात बसून एकाच दिवसात मॅरेथॉन बैठका घेवून निघून जातात, यामुळे भाजपला नाराजीचा फटका बसत आहे. गेल्या १५ दिवसांत पाच मोठ्या घटना घडल्यामुळे भाजपासाठी आगामी काळ किती कठीण असेल याची प्रचिती येत आहे.

घटना क्र. १ - मंत्रीमंडळातून हटविण्यासाठी व बदनाम करण्यासाठी माझ्या विरुध्द मोठं षडयंत्र रचण्यात आले. मला न्याय मिळू न देण्यासाठी पोलिसांवर देखील कोणाचातरी दबाव आहे. यात एका मंत्र्याचाही समावेश आहे, असे धक्कादायक विधान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गेल्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत केलं. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अंजली दमानिया यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून त्यांनी न्यायालयात सादर केलेले कागदपत्रेही बनावट असल्याचे उघड झाल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार दमानिया यांच्यासह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. खडसे मंत्रीमंडळाच्या बाहेर गेल्यामुळे कुणाला फायदा होईल,यासाठीच हे षडयंत्र रचण्यात आले आहे. मी मंत्रीपदाचा राजीनामा देईपर्यंत माझी बदनामी सुरु ठेवण्याचा हा कट होता. या मागे कोण कोण आहे हे हळूहळू समोर येत आहे. मंत्रीमंडळात परत येण्यापेक्षा मला दोन वर्ष जो त्रास झाला त्याचा हिशोब चुकता करणे महत्वाचे आहे. याकाळात अ‍ॅन्टी करप्शन, इंन्कमटॅक्ससह अनेक यंत्रणांनी माझी कसून चौकशी केली मात्र त्यांना काहीच चुकीचे आढळले नाही. आता कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांची परतफेड करायची आहे. मी कुणालाही सोडणार नाही, असे सांगत त्यांनी त्यांची रणनीती स्पष्ट केली.

घटना क्र.२ - मातंग समाजाची दोन मुलं एका विहिरीत पोहले म्हणून त्यांना पट्टयाने मारहाण करत नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील वाकडी येथे घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात हा प्रकार घडल्याने विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपाला टीकेचे लक्ष केले आहे. याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी ही ट्विट केल्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी वाकडी गावात धाव घेतली. हा प्रकार दडपण्यासाठी महाजन यांचा पोलीसांवर दबाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

घटना क्र.३ - गेल्या आठवड्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर, फैजपूर तालुक्यांमध्ये प्रचंड वादळी पाऊस झाल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात केळी उत्पादक शेतकर्‍यांचे सुमारे १२० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हा परिसर मध्यप्रदेश राज्याला सिमेला लागून असल्याने परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची तात्काळ दखल घेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी भेट देत पाहणी केली व तात्काळ मदतीची घोषणा केली. मात्र मध्यप्रदेशपेक्षा जास्त नुकसान जळगाव जिल्ह्यात झाले असतांना मुख्यमंत्रीच काय पण पालकमंत्री देखील तिकडे फिरकले नाहीत. विशेष म्हणजे त्यावेळी पालकमंत्री जळगाव शहरातच होते. शेतकर्‍यांची नाराजी वाढल्याने गिरीश महाजन यांनी रावेर तालुक्याला भेट देवून पाहणी केली. मात्र मुख्यमंत्री व पालकमंत्री कुठे आहेत? असा सवाल शेतकर्‍यांनी केल्याने वाद झाला. तेथे शेतकरी नेते सोपान पाटील यांच्याशी अरेरावी करण्यात आल्याने दोन दिवसांपुर्वी शेतकर्‍यांनी जळगाव येथे येवून महाजन यांच्या कार्यालयावर केळी फेक आंदोलन केले. वादळात खराब झालेली एक ट्रक्टरभर केळी तेथे फेकून देत शेतकर्‍यांनी भाजप विरोधी जोरदार घोषणाबाजी केली.

घटना क्र.४ - केळी फेक आंदोलनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी ड्रग माफियांना सरंक्षण देण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप केला. यावेळी त्याचे व्हिडीओ चित्रण दाखवून खळबळ उडवून दिली. केवळ आरोप झाल्याने मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तसाच वाघ यांचाही राजीनामा घेत खडसेंनी भुमिका जाहीर केली. त्यावर वाघ यांनी माझे नेते मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष असल्याचे सांगत सर्व हे राजकीय आरोप असल्याने राजीनाम्याचा विषयच नसल्याचे स्पष्ट करत खडसेंवर कुरघोडी करण्याच प्रयत्न केला. याचेही जिल्ह्यात पडसाद उमटले. भाजपाचे माजी आमदार डाॅ.बी.एस.पाटील यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांसह पत्रकार परिषद घेत वाघ यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. संपूर्ण जिल्ह्यात व उत्तर महाराष्ट्रात जिल्हाध्यक्षांच्या अशा वर्तवणुकीमुळे प्रचंड चीड व संताप व्यक्त होत असून भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या जिल्ह्यात भाजपाची प्रचंड मानहानी झाली असून जिल्हाध्यक्ष यांचे वर्तन पक्षाला काळिमा फासणारे आहे. या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून सत्य काय ते उजेडात आणावे; तोपर्यंत जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची जिल्हाध्यक्ष पदावरून पक्षातून हकालपट्टी करावी, अशी भुमिका त्यांनी मांडली. त्यास प्रतिउत्तर म्हणून एका गटाने पुढे येत वाघ यांचा बचाव करत प्रशासनाला निवेदन देत आरोप करणार्‍यांचीच चौकशी करण्याची मागणी केली.

घटना क्र.५ - चोपडा तालुक्यात भाजपाची ताकद वाढविण्यासाठी एकनाथ खडसेे यांनी शशिकांत देवरे यांना पक्षात घेतले ते आता चोपडा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. मात्र तालुक्यातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांची अचानक पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यावर त्यांनी पत्रकार परिषद घेवून नाराजी व्यक्त केली. नाथाभाऊंच्या निमंत्रणामुळे भाजपत आलो. काम करण्याच्या शैलीमुळे तालुक्याचा युवक आमच्याशी जोडला गेला आहे. नाथाभाऊ व गिरिष महाजन यांच्यात वादात काड्या करणारांचा गट जिल्ह्यात बळावतो आहे. क्लिमिश कालविणार्‍यांमुळे तालुक्यात भाजप संपविण्याचा प्रयत्न होतो आहे. भाजपत राहून मोठे काम करुन सुध्दा हकालपट्टी झाली असे सांगणे याचा खेद वाटतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.

Post a Comment

Designed By Blogger