जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत एक हजार ८४० प्राथमिक शाळा आहेत. यात सुमारे एक लाख ९२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून सात हजार ३५२ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो. गेल्या तिन वर्षात विद्यार्थी संख्या अभावी ५० पेक्षा जास्त शाळांचे समायोजन किंवा वर्ग बंद करण्यात आले आहेत. हि परिस्थिती सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने अनेक योजना हाती घेतल्या असून त्यात आता सुधारणा दिसू लागल्या आहेत. गेल्या दोन वर्षात ६६ शाळांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. एक हजार २२१ शाळा पुर्णपणे डिजीटल झाल्या असून रावेर, भुसावळ, धरणगाव व अमळनेर या तालुक्यातील सर्व शाळा डिजीटल झाल्या आहेत. या शाळांमध्ये टीव्ही संच, प्रोजेक्टर, शिक्षणिक सीडीज् असून येथे स्वतंत्र्यरित्या तयार करण्यात आलेला डिजीटल अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जातो.
लोकसहभागातून एक कोटी १३ लाख रुपयांचा निधी
शाळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी लोकसहभागातून एक कोटी १३ लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला सून त्यातून शाळांचे सुशोभिकरण, डिजीटलायजेशन, बसण्यासाठी बाक, संगणक आदी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती पोपटतात्या भोळे यांनी दिली. आता याचे पुढचे पाऊल म्हणून जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक हे ज्या शाळेत कार्यरत आहेत त्या शाळेत त्यांच्या मुलांचे प्रवेश घेणे आवश्यक करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वत; शिक्षकांची मुलेच या शाळेत शिक्षक असतील तर गुणवत्ता देखील वाढून गावातील इतर पालकांचादृष्टीकोन बदलून पटसंख्या वाढीस मदत होईल. यास शिक्षण समितीसभेत मंजूरी देण्यात आली असून येत्या सर्वसाधारण सभेचीही मंजूरी घेण्यात येणार आहे. पालक सहसा आपल्या पाल्यांचा जि.प. शाळांमध्ये प्रवेश घेण्याऐवजी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात. पर्यायाने जि.प. शाळांकडील विद्यार्थ्यांचा ओढा कमी होऊन पटसंख्या टिकविणे कठिण झाले आहे. जर तेथे शिक्षकांचीच मुले शिकतील तर अन्य पालकांचा विश्वास देखील वाढेल, असे भोळे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवी यासाठी कोणत्या उपाय योजना राबविल्या पाहिजेत यासंदर्भात आम्ही पालकांची वेळोवेळी चर्चा केली. त्यानुसार डिजीटल अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना बसायला बाक, संगणक शिक्षण आदी नाविन्यपुर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविले. याचवेळी काही पालकांनी सांगितले की, आम्ही आमची मुलं पाठवितो मात्रे तुमचे शिक्षक त्यांच्या मुलांना येथे शिकवतील का? असा प्रश्न उपस्थित केला. आता आमच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारल्याने अनेक शिक्षकांनी पालकांच्या भुमिकेचे स्वागत केले. त्यानुसार हा निर्णय आम्ही घेतला आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
-पोपटतात्या भोळे, सभापती - शिक्षण समिती, जिल्हा परिषद, जळगाव
Post a Comment