मुख्यमंत्र्यांपुढे १४०० फूट उंचीवर पाणी लिफ्टिंगचे आव्हान


दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्राला नवसंजीवनी ठरू शकणाऱ्या नार-पार प्रकल्पाचा मुद्दा किसान सभेच्या लाँग मार्चनंतर पुन्हा चर्चेत आला आहे. नार-पार, दमणगंगा, वाघ-पिंजाळ नद्यांचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून गिरणा-गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. यामुळे महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या पाणीवाटपात गेली अनेक वर्षे रखडलेला विषय मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र राष्ट्रीय नदीजोड समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्राला १४०० फूट उंचीवरून पाणी वर उचलावे (लिफ्टिंग) लागणार आहे. हे तांत्रिकदृष्टय़ा अवघड असल्याने पाणी उचलण्याचे शिवधनुष्य महाराष्ट्र सरकार कसे पेलणार, यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

पूर्ववाहिनी नद्यांतील संपलेले पाणी आणि कार्यक्षेत्रातील दुष्काळसदृश परिस्थिती तर पश्चिम वाहिनी नद्यांतील दुर्लक्षित असलेली जलसंपत्ती ही चिंताजनक तफावत दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी नदीजोड योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडील टंचाई असलेल्या गिरणा खोऱ्याकडे वळविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. सुरगाणा तालुक्यातील नार-पार, दमणगंगा आणि ताण या पश्चिमवाहिनी प्रांतातील मोठय़ा प्रमाणातील उपलब्ध जलसंपत्ती उत्तर महाराष्ट्राचा कायापालट घडवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. नार-पार, दमणगंगा या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्य़ातील पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, बागलाण, सटाणा, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला तर जळगाव जिल्ह्य़ातील चाळीसगाव, पारोळा, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, जळगाव, अमळनेर तालुक्यांतील काही गावे तसेच धुळे जिल्ह्य़ातील बराच मोठा, औरंगाबाद जिल्ह्य़ातील वैजापूर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, औरंगाबाद, पैठण अशा २५ तालुक्यांचा समावेश आहे. चितळे समितीच्या अहवालानुसार दमणगंगाचे ८३ टीएमसी, नार-पारचे ५० टीएमसी असे एकूण १३३ टीएमसी पाणी दुर्लक्षित असून ते अरबी समुद्रात वाहून जाते. ही आकडेवारी आता राष्ट्रीय जलविकास अधिकरणाने सुधारित केली असून त्यांच्या आकडेवारीनुसार दमणगंगाचे ५५, नार-पारचे ३१ असे एकूण ८६ टीएमसी पाणी आहे. नार-पार योजनेचे पाणी अडविल्यास, प्रचंड पाणीटंचाई असलेल्या गिरणाच्या उगमस्थानी म्हणजे गिरणा खोऱ्यात वळविल्यास पुनोद प्रकल्प, चणकापूर धरण, ठेंगोडा लघू प्रकल्प, गिरणा धरण आणि गिरणा नदीवरील जामदा बंधारा, दहिवद बंधारा, पूर्ण क्षमतेने प्रत्येक वर्षी १०० टक्के भरतील. त्यामुळे जवळपास ८२ हजार ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.

१३३ टीएमसी जलसंपत्ती दुर्लक्षित

सह्य़ाद्रीच्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस धो धो कोसळतो. मात्र ते पाणी नार-पार, दमणगंगा नदीद्वारे अरबी समुद्रात वाहून जाते. प्रत्येक वर्षी पडणाऱ्या पावसाची आकडेवारी तीन ते साडेतीन हजार मिलिमीटर आहे. उत्तर महाराष्ट्रातील तालुक्यांपेक्षा पाच पटींनी अधिक पाऊस या परिसरात पडतो. हे प्रत्येक वर्षांच्या शासकीय आकडेवारीवरून लक्षात येते. म्हणून महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी नद्यांचे अरबी समुद्रात वाहून वाया जाणारे नार-पार, दमणगंगा नद्यांचे पाणी पूर्वेकडील पाणीटंचाई असलेल्या गिरणा खोऱ्याकडे वळविण्याची मागणी सातत्याने होत आहे. नार-पार दमणगंगा नद्यांची एकूण उपलब्ध जलसंपत्ती १३३ टीएमसी इतकी आहे. आजवर ही जलसंपत्ती दुर्लक्षित राहिली. हे पाणी उचलून बोगद्याद्वारे तर काही ठिकाणी धरणे बांधून हवे तसे वळविणे आणि वापरात आणणे हाच उत्तर महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

महाराष्ट्र-गुजरात पाणीवाटप वाद

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात पार, तापी आणि नर्मदा प्रकल्पातील पाणीवाटपाचा करार होऊन महाराष्ट्राला ३१ टीएमसी तर गुजरातला ३५ टीएमसी पाणीवाटप झाले आहे. महाराष्ट्राच्या वाटय़ाचे पाणी गुजरातला देण्यास सर्वाचा विरोध असून यावरून वाद सुरू आहेत. राष्ट्रीय नदीजोड समितीच्या बैठकीत पार, तापी आणि नर्मदा नदीच्या प्रकल्पांपैकी नर्मदा नदीवरील सरदार सरोवराच्या खालच्या बाजूने गुजरातला पाणी जाणार असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे महाराष्ट्राला तब्बल १४०० फूट उंचीवरून पाणी वर घ्यावे लागणार आहे. १४०० फूट उंचीवरून पाणी वर उचलणे (लिफ्टिंग) तांत्रिकदृष्टय़ा कठीण असल्याने यावर सर्वेक्षण करण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी साडेतीन कोटींचा निधी मंजूर केला आहे.

Post a Comment

Designed By Blogger