वाढत्या तापमानाने केळीच्या सुकल्या बागा!


जळगाव जिल्ह्य़ात तापमानाचा पारा ४५ अंशाच्या वर पोहोचला आहे. गेल्या आठ दिवसांत सरासरी ४४ अंश तापमानाची नोंद झाली. वाढत्या तापमानाबरोबर पाणी टंचाईचे संकटदेखील वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर जिल्ह्य़ातील ८८९ गावे पाणी टंचाईच्या छायेत आहेत. त्यातील ८८ गावांमध्ये ५५ तर १६० गावांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने १५९ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. विविध उपाय करूनही अनेक गावांमध्ये १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. वाढत्या तापमानाची झळ केळी बागांनाही बसली आहे. रावेर, फैजपूर परिसरात केळी बागा सुकण्याच्या मार्गावर असल्याने उत्पादक धास्तावला असून आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रशासनाने दिलेल्या महितीनुसार, एप्रिल ते जून या काळात २७१ गावांना टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेने जिल्हा प्रशासनाकडे २९ कोटी ५० लाखांचा आराखडा मंजूर केला आहे. सद्य:स्थितीत अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ४३ गावांमध्ये पाणी टंचाई संकट भेडसावत आहे. या तालुक्यात १८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खालोखाल जामनेर तालुक्यात २२, पारोळा तालुक्यात १५ गावांमध्ये पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्य़ातील ९७ गावांमध्ये २५७ विंधन विहिरी करण्यात आल्या. तालुकानिहाय विचार केल्यास धरणगाव तालुक्यात सर्वाधिक ५८ विंधन विहिरी २४ गावांमध्ये, तर त्या खालोखाल जळगाव तालुक्यात ५१ विंधन विहिरी १८ गावांमध्ये करण्यात आल्या. पाचोऱ्यात ५०, एरंडोलमध्ये १५, भुसावळ २७, यावल, मुक्ताईनगर प्रत्येकी दोन, रावेर आठ, बोदवड १३, अमळनेर तीन, पारोळा दहा, चोपडा १८ विंधन विहिरींचा समावेश आहे. पाणी टंचाई निवारणार्थ अनेक गावांमधील सार्वजनिक, खासगी विहिरींचे खोलीकरण, तात्पुरत्या पाणीपुरवठय़ासाठी २० कामांना मंजुरी देण्यात आली. मात्र अमळनेर, जामनेर, पाचोरा, एरंडोल येथे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. नळाला तब्बल २० दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाणी विकत घ्यावे लागते. टंचाईचा लग्नकार्यानाही मोठा फटका बसत आहे. तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने रावेर, फैजपूर परिसरातील केळी बागा अडचणीत सापडल्या आहेत. काही भागांत पाणी टंचाईचा प्रश्न, तर काही भागात पाणी असूनही ते पिकांना देण्यात अडचणी अशा कोंडीत उत्पादक सापडल्याचे दिसून येते.

बागांना पाणी देण्यात अडचणी

जळगाव जिल्ह्य़ात मुख्य पीक म्हणून केळीकडे पाहिले जाते. पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत आहे. यामुळे केळी बागा सुकण्यास सुरुवात झाली आहे. केळीची पाने करपू लागली आहेत. शेतकरी पाणी देण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहे, मात्र त्रोटक वीजपुरवठय़ामुळे पाणी देण्यात अडथळे येत आहेत. त्यातच पाण्याची पातळी खोलवर गेल्याने कृषीपंप टप्प्याटप्प्याने चालवावे लागतात. ४० ते ५० फूट पाणी खोल गेले असून दिवसागणिक ही पातळी आणखी कमी होत आहे. अनेक भागांत विहिरी, कूपनलिका बंद पडल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी लांबच्या शेतातून पाणी आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करून जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. पाण्याअभावी काही केळी बागा करपू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या केळीचे भाव स्थिर असले तरी कापणीमध्ये व्यापारी मंडळापेक्षा २०० ते ३०० रुपये कमी दराने केळीची मागणी करीत असल्याने वेगळेच नुकसान होते, याकडे शेतकरी लक्ष वेधतात.

प्रशासकीय दिरंगाईचे चटके

पाणी टंचाई कार्यक्रमात जिल्ह्य़ात विहीर खोलीकरण, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, विशेष दुरुस्तीअंतर्गत ५९ गावांमध्ये एकूण दोन कोटी ४२ लाख ४३ हजार रुपयांची ५९ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे त्यास प्रशासकीय मान्यता नसल्याने ती सुरूच झाली नसल्याचे उघड झाले आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठाअंतर्गत ६२ गावांमध्ये १६७ विंधन विहिरींच्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यातील केवळ १४ कामे झाली आहे. १५३ विहिरींची कामे अद्याप अपूर्ण आहेत. कूपनलिकांसाठी १५ गावांमध्ये ३६ कामे मंजूर आहेत. त्यातील केवळ दोनच कामे झालेली असून उर्वरित कामे अपूर्ण आहेत. या दिरंगाईमुळे सर्वसामान्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत टप्पा दोनमध्ये ५७ कोटी ९८ लाखांच्या निधीतून ५५७ कामे घेण्यात आली असून त्यापैकी ५४२ कामे पूर्ण होऊन जिल्ह्य़ातील तीन हजार ५५७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याचा दावा केला जातो. तरीदेखील टंचाईची समस्या कायम राहिल्याने या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Post a Comment

Designed By Blogger