सुरेश जैन यांच्या भूमिकेने सेना-भाजपमध्ये संभ्रम


जळगाव महापालिका निवडणुकीची घटिका समीप आल्याने राजकीय पटलावर पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असतानाच शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांनी महापालिकेसाठी भाजप-शिवसेना युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे सांगत राजकीय बॉम्बगोळा टाकला आहे. यामुळे खुद्द भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. महापालिकेतील युतीच्या नावाखाली सुरेश जैन स्वत:चे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

घरकुल घोटाळा प्रकरणातील संशयित म्हणून माजी मंत्री सुरेश जैन साडेचार वर्षे तुरुंगात होते. जामिनावर बाहेर पडल्यावर आता राजकारण नाही तर समाजकारण हा आपला पिंड आहे, असे त्यांनी जाहीर केले होते. या काळात सुमारे दीड-दोन वर्ष ते राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त राहिले. मात्र, जळगाव महापलिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होताच ते अचानक सक्रिय झाले आहेत. गेल्या आठवडय़ात बुलढाणा येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांशी निवडणुकीबाबत चर्चा केली असून ते भाजप-शिवसेना युतीसाठी तयार आहेत. या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित असल्याचा दावा जैन यांनी केला आहे. या दाव्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. कारण, जळगाव शहराचे राजकीय वातावरण मुळात सुरेश जैन विरुद्ध भाजप असे आहे. भाजपचे वजनदार नेते एकनाथ खडसे यांचे चिरंजीव आणि भाजपचे अधिकृत उमेदवार दिवंगत निखिल खडसे यांना सुरेश जैन यांनी शिवसेनेच्या मदतीने विधान परिषद निवडणुकीत पराभूत केले होते.

भाजपचा विरोध

भाजपचे प्रदेश संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत गेल्या आठवडय़ात महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. यात बुथ रचना, वॉर्ड रचना आदींवर चर्चा झाली. या वेळी जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळेदेखील उपस्थित होते. महापालिकेची निवडणूक कोणाच्या मार्गदर्शनाखाली लढण्यात येणार आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. कारण, आतापर्यंत जिल्ह्य़ात भाजपला एकहाती यश मिळवून देणारे एकनाथ खडसे यांना पक्षानेच दूर लोटले आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन जिल्ह्य़ाकडे लक्ष देत नाहीत तर पालकमंत्रिपदाची जबाबदारी असणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे तर जळगावला येतच नाहीत, असा तक्रारीचा सूर कार्यकर्त्यांनी आळवल्याने बैठकीत वादंग झडले.

गिरीश महाजनांचे सोईचे राजकारण

गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेच्या कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांचे राजकारण हे त्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मनसेचे नेते विद्यमान महापौर ललित कोल्हे, शहर विकास आघाडीचे कैलास सोनवणे यांच्या अवतीभोवती फिरत असते. यामुळे भाजपच्या नगरसेवकांमधून नेहमी ओरड होते. सध्या तर ते प्रत्येकाला निवडणुकीचे गाजर दाखवीत आहेत. त्यांच्या ताब्यात मानल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हा परिषदेत भाजपमध्येच दोन गट पडले आहेत. एकहाती सत्ता असूनही भाजप कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने अध्यक्ष बदलण्याची नामुष्की भाजपवर आली आहे.

Post a Comment

Designed By Blogger