खडसे - महाजन या दोन्ही मातब्बर नेत्यांच्या मतदारसंघात असंतोषाची धग


एकमेकांचे राजकीय खच्चीकरण करण्याची एकही संधी न सोडणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन या दोघांना स्वत:च्या मतदारसंघातच प्रचंड असंतोषाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे हा असंतोष राजकीय नसून सर्वसामान्यांचा असल्याने दोन्ही दिग्गज नेत्यांची डोकेदुखी वाढत आहे. गेल्या आठवडय़ात मुक्ताईनगर तालुक्यात दारुबंदी व्हावी, या मागणीसाठी हजारो महिला रस्त्यावर उतरल्या तर जामनेर तालुक्यांतील पाणीटंचाईविरोधात महिलांनी हंडा मोर्चा काढला. राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या मतदारसंघातच पाणी प्रश्नावर महिलांना आंदोलन करत रस्त्यावर उतरावे लागल्याने भाजपची नाचक्की झाली.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्य़ाला सध्या खडसे-महाजन गटाने ग्रासले आहे. यास दोन्ही नेते नकार देत असले तरी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या एकमेकांवरील राजकीय कुरघोडय़ांमुळे याची प्रचीती येते. याचा परिणाम जिल्ह्य़ाच्या विकासावरदेखील होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. गेल्या आठवडय़ात मुक्ताईनगर तालुक्यात संपूर्ण दारुबंदी व्हावी, या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारो महिलांचा सहभाग होता. या मोर्चानंतर पंचायत समिती कार्यालयासमोर सभाही झाली. तालुक्यात पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे गावठी दारू, देशी दारू, गुटखाविक्री तसेच अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. त्यामुळे अनेक संसार देशोधडीला लागले असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या आंदोलनाचा शिवसेनेने पुरेपूर फायदा उचलला. शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनावर टीकाही केली. या आधीही दोन-तीन वेळा सर्वसामान्यांना रस्त्यावर उतरावे लागले होते.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील पाणीटंचाईचा विषय अजून मार्गी लागलेला नाही. तालुक्यातील नेरी गावातील नागरिक तब्बल तीन वर्षांपासून पाणीटंचाईला तोंड देत आहेत. महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा होत असल्याने महिलांच्या संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. या ठिकाणी उत्तर देण्यासाठी सरपंच किंवा ग्रामसेवक नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. सुमारे १० हजार लोकसंख्या असलेले नेरी हे जलसंपदामंत्री महाजन यांच्या मतदारसंघातील गाव आहे. १३ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत भाजपचे १२ सदस्य तर एकमेव राष्ट्रवादीच्या महिला सदस्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या पॅनलचे ग्रामपंचायतीत बहुमत आहे. मात्र तरीदेखील तीन वर्षांपासून या गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. जामनेर तालुक्यात सद्य:स्थितीला ६८ गावांमध्ये टंचाईसदृश स्थिती आहे. सध्या मोहाडी, खर्चाने, रोटवद, सार्वे प्र.लो., लाखोली, मोरगाव, पळासखेडे वाघारी, तिघ्रे वडगाव, शंकरपुरा, सारगाव आदी ११ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे तर जामनेर तालुक्यातील काळखेडे, कोदोली, नांद्रा प्र.लो, मोहाडी, रोटवद, सार्वे प्र.लो, लाखोली, मोरगाव, वाघारी, पळासखेडे प्र.न., तिघ्रे वडगाव, पाळधी, शंकरपुरा या गावांत खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यात असंतोषाची धग वाढत आहे.

Post a Comment

Designed By Blogger