रद्द झालेले राज्य नाट्य संमेलन व परिषद निवडणुकीतील वादाचे जळगाव कनेक्शन


अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद निवडणूक आणि राज्य नाटय़ संमेलन या विषयांवरुन होणाऱ्या वादांचे जळगावशी जुने नाते आहे. राज्य नाटय़ संमेलन जळगावात घेण्याचे निश्चित झाल्यानंतर एक नाही तर दोन वेळा ते रद्द झाले. पहिल्यांदा आपापसातील मतभेदांमुळे तर दुसऱ्यांदा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे मंत्रिपद गेल्यामुळे हा विषय मागे पडल्याचा इतिहास आहे. या कटू आठवणी विस्मृतीत जात असताना आता परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या निवडणुकीत जळगाव शाखेमधून कोणाची निवड करावी, हा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

जळगाव नाटय़ चळवळीला बळ देण्यासाठी १९९८-९९ मध्ये पुन्हा नाटय़ संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. आयोजनाची सर्व तयारी पूर्ण झाली. त्यावेळी संमेलन अध्यक्ष म्हणून चंद्रकांत गोखले आणि रमेश शिंदे यांची नावे चर्चेत होती. नाटय़ परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मच्छिंद्र कांबळी यांनी शिंदे यांची निवड जाहीर केली आणि वादाला सुरुवात झाली होती. जळगाव शाखेने शिंदे यांच्या निवडीबद्दल नाराजी व्यक्त करून गोखले यांच्या समर्थनार्थ परिषदेला लेखी पत्र पाठविले. या वादात संमेलनच रद्द झाले. नंतरच्या काळात लहान-मोठे कार्यक्रमवगळता नाटय़ चळवळीला बळ मिळेल असे काहीच झाले नाही. यानंतर २०१६ मध्ये जळगावला नाटय़ संमेलन घेण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या. यात तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी मुक्ताईनगर शाखेची स्थापनाही करण्यात आली. परिषदेच्या बहुतांश जिल्ह्यात एक शाखा असताना जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि मुक्ताईनगर अशा दोन शाखा झाल्या. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी जळगावला येऊन सर्व चाचपणी केली आणि सकारात्मकता दर्शवली. मात्र त्यानंतरही माशी शिंकली अन् नाटय़ संमेलनाचा विषय गुंडाळला गेला. यास अंतर्गत गटबाजीसह राजकीय किनारदेखील आहे. मध्यंतरीच्या काळात खडसेंचे मंत्रिपद गेल्याने मुक्ताईनगर शाखेचा राजकीय आश्रय गेला. दुसरीकडे जळगावमधील नाटय़गृहाचे कामदेखील थंडावले. एक जानेवारीला हे अद्ययावत नाटय़गृह प्रेक्षकांसाठी खुले करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र अजूनही हे काम अपूर्ण आहे. यंदाचे राज्य नाटय़ संमेलनच रद्द झाले आहे. नाटय़गृहाचे काम वेळेत पूर्ण झाले असते आणि खडसे मंत्री असते तर नाटय़ संमेलन खंडित करण्याची नामुष्की ओढावली नसती, अशी सल जळगावमधील नाटय़कर्मी व्यक्त करत आहेत.

जळगाव शाखेतील गोंधळ

मतदानासाठी जळगाव शाखेच्या २२३ सदस्यांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. यातील काही सदस्य मयत आहेत तर नाटय़ परिषदेशी काहीही संबंध नसलेल्या लोकांचा या यादीत समावेश असल्याने जळगाव शाखेचे सदस्य रमेश भोळे यांनी आक्षेप घेत निवडणूक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जळगाव शाखेत मोठा गोंधळ आहे. यादीत अनेक मयत, नाटय़ क्षेत्राशी संबंध नसलेल्या व्यक्तींची नावे आहेत. यामुळे नाटय़ चळवळीचे नुकसान होणार आहे.

नियामक मंडळावर सात सदस्य

नाटय़ संमेलन घेण्याचे रद्द झाल्यापाठोपाठ जळगाव शाखेतील वाद राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची निवडणूक जाहीर झाली असून, प्रारंभी नियामक मंडळ सदस्यांची निवड होणार आहे. नाटय़ परिषदेच्या सदस्यांनी निवड होणार आहे. नाटय़ परिषदेचे राज्यात एकूण २३ हजार ४८९ सभासद असून ३५० सभासदांसाठी एक नियामक मंडळ प्रतिनिधी असे समीकरण आहे. त्यानुसार नियामक मंडळावर राज्यभरातून ६० सदस्य निवडून येणार आहे. त्यातून मध्यवर्ती शाखेची कार्यकारिणी निवडली जाईल. यापूर्वी नाशिक जिल्ह्यातून दोन, अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातून प्रत्येकी एक असे एकूण चार सदस्य उत्तर महाराष्ट्रातून नियामक मंडळावर होते. परंतु नव्या घटनेनुसार आता जळगाव-मुक्ताईनगर-धुळे मिळून दोन, नाशिक शाखेतून तीन, नगर-संगमनेर-शेवगाव मिळून दोन असे एकूण सात सदस्य नियामक मंडळावर निवडले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी राज्यात १९ मतदान केंद्रे उभारली जाणार असून चार मार्च रोजी हे मतदान होणार आहे. सात मार्च रोजी निकाल आहे.

नाटय़ संमेलनाला जत्रेचे स्वरूप

काही मंडळींना निवडणूक इतकी महत्त्वाची वाटते की, त्यांनी नाटय़ संमेलनाची परंपराच मोडून टाकली. नाथाभाऊ मंत्री असते तर चित्र वेगळे असते. अनेक गोष्टींसाठी राजकीय पाठबळ आवश्यक असते. मात्र आपल्याकडे तसे झाले नाही. नाटय़ संमेलन किंवा साहित्य संमेलन यांना यात्रा, जत्रा, उरूस असे स्वरूप येत आहे. तो एक ‘इव्हेंट’ झाला आहे. नाटय़ संमेलनामुळे नाटय़ चळवळीला बळ दिले पाहिजे. मात्र असे काही दिसून येत नाही, ही कटू परिस्थिती आहे.

- शंभू पाटील (ज्येष्ठ रंगकर्मी)

पुढील वर्षांसाठी प्रयत्न

जळगावचे नाटय़गृह तयार नाही. नाथाभाऊंचे मंत्रिपद गेल्यानंतर नाटय़गृहाचे काम थंडावले. इतर राजकीय योगही जुळून आले नाही. मात्र, झाले गेले विसरून पुढील वर्षी नव्या दमाने काम करून नाटय़ संमेलन जळगावमध्ये घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

- अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर

Post a Comment

Designed By Blogger