कोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड


राज्यात कधीकाळी आक्रमक नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यापासून जळगाव जिल्हय़ातील भाजप नेत्यांसह अनेक पदाधिकारीही हातचे अंतर ठेवू लागल्याने खडसेंची अस्वस्थता वाढली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे जिल्हय़ावरची पकड मजबूत करत असल्याने कोणाचा झेंडा घेऊ हाती, हा प्रश्न खडसे समर्थकांना पडला आहे. त्यातच नाथाभाऊ विविध विधाने करीत असल्याने संशयाला अधिकच बळकटी मिळते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मंत्री जळगाव दौऱ्यावर आल्यावर नाथाभाऊ लवकरच मंत्रिमडळात परततील, असे सांगत टाळ्या मिळवून निघून जातात. परंतु, आगामी वाट बिकट असल्याची जाणीव खडसेंना झाल्याने महिनाभरापासून ते देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सलगी सुरू केली. खडसेंसाठी आता लेवा पाटीदार समाज मैदानात उतरला आहे. लेवा पाटीदार समाजाच्या कार्यकर्त्यांनी खडसेंच्या समर्थनार्थ मुंबईत निदर्शने केली. आता भोरगाव लेवा पंचायतीतर्फे लेवा समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन ४ फेब्रुवारीला यावल तालुक्यातील पाडळसे येथे होत आहे. यावेळी खडसेंच्या विषयावर रणनीती निश्चित होण्याची शक्यता आहे.

भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांमुळे खडसेंना मंत्रिपद गमावून दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनांचे गाजर दाखवत त्यांना झुलवत ठेवले जात आहे. पक्ष उभारणीसाठी आयुष्याची ४० वर्षे खर्ची घातल्यानंतरही पक्ष अशा प्रकारे अवहेलना करत असल्याने आपण अस्वस्थ असल्याची कबुली खडसेंनी नुकतीच दिली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात होते. त्याच वेळी त्यांनी जळगावात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत व्यासपीठावर हजेरी लावली.

पक्षाला इशारा

माझ्या मनात आहे ते मी अजितदादांच्या कानात सांगितले असल्याचे ते म्हणाले. या घडामोडी सुरू असतानाच त्यांनी रावेर येथे काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावत पक्षच आपल्याला बाहेर ढकलत असल्याचे सांगत स्वकीयांवर तोफ डागली. पक्ष सोडण्यास भाग पाडू नका, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी ‘नाथाभाऊ तुम्ही फक्त निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासाठी केव्हाही तयार’ असल्याचे सांगितल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या वातावरणात खडसेंच्या नुकत्याच झालेल्या दिल्लीवारीकडे त्या अनुषंगाने पाहिले जात आहे. खडसेंचे हे नाराजीनाटय़ इथेच न संपता त्यांनी भुसावळ येथे बोलताना पक्ष उभारणीसाठी गेल्या ४० वर्षांपासून आपण झटत आहे, आपण काय चोरी, भ्रष्टाचार, दरोडा टाकला ते आता तरी सांगा. आतापर्यंत आपल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून आपण २० महिन्यांपासून संशयाच्या फेऱ्यात आहोत. आतापर्यंत आपला छळ झाला आहे, आता आपण बोलणारच आहे, विनाकारण बदनामी होत असेल तर आपण जनतेच्या दरबारात दाद मागणार असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.

भाजपला फटका?

स्वस्त धान्य वाटपात १०० कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोपही केला. आपली मागणी मंत्रिपदासाठी नसून स्वत:वरील आरोपांचे स्पष्टीकरण मागण्यासाठी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भाजपचे गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही हाल करू असा इशारा लेवा समाजातर्फे देण्यात आला आहे. जळगाव जिल्हय़ासह खानदेशात लेवा पाटीदार समाज मोठय़ा प्रमाणात आहे. या नाराजी नाटय़ाचा फटका आगामी निवडणुकांमध्ये भाजपला बसण्याची शक्यता आहे.

काय करणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कोंडी आणि परतीचे सारे दोर कापले गेल्याने अस्वस्थ झालेले नाथाभाऊ गेले काही दिवस सतत विविध वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत. काँग्रेस वा राष्ट्रवादीची दारे आपल्याला उघडी आहेत, असे सूचित करीत असले तरी खडसे भाजप सोडण्याचा विचार करणार नाहीत हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी कोंडी केली असताना दिल्लीतील भाजप नेते मदत करीत नाहीत याचे नाथाभाऊंना जास्त दु:ख आहे.

Post a Comment

Designed By Blogger