खान्देश कन्या बहिणाबाईंवर ८० वर्षांच्या आजीने रचला पोवडा


युध्दात, रणांगणात शौर्य गाजवणार्‍यावर पोवाडा रचला जातो. शाहीर डफावर थाप देवून पराक्रमांची व प्रसंग वर्णनांची काव्यात्मक स्वरुपात मांडणी सादर करत तो प्रसंग जिवंत करतो. मात्र शेतात व घरात काम करतांना मानवी जीवनविषयक तत्वज्ञान सांगणार्‍या कवयित्री बहिणाबाई चौधरींवर रचण्यात आलेला पोवाडा संपुर्ण खान्देशात चर्चेचा विषय ठरत आहे. निसर्ग कन्या,खान्देशकन्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या कवयित्री बहिणाबाई चौधरींवर साहित्य लिखाण करण्यास संपुर्ण आयुष्य वाहून घेणार्‍या जळगावच्या निवृत्त प्रा.डॉ. प्रमिला चौधरी यांनी वयाच्या ८०व्या वर्षी बहिणाबाईंवर पोवाडा रचला आहे. बहिणाई - गाते शाहिराची वाणी असे या पोवाड्याचे नाव आहे.
डॉ.प्रमिला भिरूड या आज ८० वर्षांच्या असून आतापर्यंत त्यांची बहिणाई यांच्या जीवनावर आधारित १४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे १५वे पुस्तक बहिणाबाईंचा पोवाडा नुकतेच प्रकाशित झाले. त्यांनी बहिणाईंची गाणी एक अभ्यास’, मी बहिणाई’ हे आत्मचरित्र ग्रामीण बोलीभाषेतून तसेच सीडीदेखील स्वत:च्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेले आहे. बहिणाबाई या केवळ खान्देश किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहू नये यासाठी त्यांनी ‘बहिणाईंची कविता एक अध्ययन’ हे हिंदी भाषांतरीत व पोयम्स ऑफ बहिणाई या इंग्रजी भाषेतील पुस्तक देखील लिहीले आहे. लग्नांतर दहावी ते पीएच.डी असा प्रवास करणार्‍या डॉ.भिरुड या जळगाव शहरातील मूलजी जेठा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे कार्यरत होत्या. अंध मुलांना बहिणाई माहिती व्हावी यासाठी डॉ. प्रमिला भिरूड लिखित ‘बहिणाईची जीवन कहाणी’ व कोंबडा आरावतो या मूळ पुस्तकांचे ब्रेल लिपीत रूपांतरीत करण्यात आले आहे. त्यांच्या पुस्तकांना मंगेश पाडगावकर, नागनाथ कोत्तापल्ले यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेला बहिणाई - गाते शाहिराची वाणी हा पोवाडा ३४ चौकात असून त्यात त्यांनी बहिणाबाईंच्या जीवनाच्या चित्तकथेचे निवेदन केले आहे. निर्सग आणि जीवनाला मार्गदर्शक सूत्र शिकवणार्‍या बहिणाबाईंचे सार्थ वर्णन या पोवाड्यात करण्यात आले आहे. बहिणाईचे विचार सर्वदूर पोहचावेत यासाठी लेखन, व्याख्याने, आकाशवाणीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचे डॉ.भिरुड यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. सध्या पाश्‍चात्य संस्कृतीचे भारतीय संस्कृतीवर अतिक्रमण होत आहे. यात भारतीय संस्कृती टिकायला हवी. भारतीय संस्कृती जगातील सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे कारण भारताने कधीही केवळ स्वत:चा विचार न करता संपुर्ण जगाचा केला. हे विश्‍वच माझे घर... यात त्याची प्रचिती येते. पसायदान असो का संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, सानेगुरुजी व बहिणाबाईंच्या काव्यातूनही ते दिसून येते. स्वत: निरक्षर असणार्‍या बहिणाबाईंनी सुशिक्षित समाजाला जीवनाचे जीवनपण शिकविले. यामुळे बहिणाबाईंचे कार्य खुप मोठे असल्याचेही डॉ. भिरुड म्हणाल्या.

शेतात राबतांना, चुलीवर भाकरी भाजतांना, घरोट्यावर दळण दळतांना बहिणाईंना जीवन विषयक तत्वज्ञान गवसलं. मानवी कल्याणाची तळमळ हाच तिच्या चिंतनाचा विषय होता. मानवी भाव भावनांचा, जीवन व्यवहाराचा तिने डोळसपणे वेध घेतला, तिचे हे कार्य पुढच्या पिढ्यांना माहित होणे गरजेचे आहे.

- प्रा.डॉ.प्रमिला भिरुड

1 comment :

Designed By Blogger