अस्वच्छतेमुळे जळगाव महापालिकेच्या स्वच्छता ब्रँड अ‍ॅम्बेसेडरला सोडावे लागले घर


जळगाव शहरात स्वच्छतेचा प्रश्‍न एैरणीवर आला आहे. महापलिकेकडून सर्व करांची आकारणी केली जात असली तरी त्या बदल्यात जळगावकरांना सुविधा देण्यात येत नाहीत. व्यापारी संकुले, खुले भुखंडांसह रहिवाशी भागांमध्येही मोठ्याप्रमाणात घाण व कचर्‍याचे ढिग साचल्याने साथ रोगांचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य जळगावकरच नव्हे तर जळगाव महापालिकेच्या स्वच्छता अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, पद्मश्री कविवर्य ना. धों. महानोर हे देखील त्रस्त झाले आहेत. आदर्शनगरातील त्यांच्या घराजवळील परिसर स्वच्छ करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही त्याकडे लक्ष न दिल्याने स्वत:चे घर सोडून ते रायसोनी नगरात भाड्याच्या घरात राहायला गेले आहेत. यामुळे महापालिकेची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत.

जळगाव शहरातील अस्वच्छतेच्या विषयावरुन नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिम हाती घेतली त्याचा मोठा गाजावाजाही झाला. व्यापारी संकुलातील स्वच्छतेसाठी गोलाणी मार्केटमधील व्यापार्यांकडून प्रत्येक ११०० रुपये गोळा करुन एका खाजगी ठेकेदाराला ही जबाबदारी सोपविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला होता. मात्र आता पैसे देवूनही तेथे जागोजागी कचर्‍याचे ढिग साचल्याचे दिसून येत आहेत. महापालिकेने ठेवलेल्या कचरा कुंड्याही ओसंडून वाहत आहेत. याबाबात व्यापार्‍यानी महापालिकेकडे विचारणा केल्यानंतर त्यांच्यावर दमदाटी करण्यासाठी गाळ्यांमध्ये फेरबदल केल्याची चौकशी त्यांच्यामागे लावण्यात आली आहे. याप्रकरणी २०० पेक्षा जास्त व्यापार्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या या धोरणामुळे व्यापार्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. आता खुल्या भुखंडासह रहिवाशी भागातील स्वच्छतेच्या प्रश्‍नावरुन महापालिकेच्या धोरणावर जोरदार टिका होत आहे. जळगाव शहरात सुमारे २८ हजार मालमत्ताधारक असून अनेक जागांचे मूळ मालक बाहेरगावी असतात परिणामी शहरातील विविध भागात असलेल्या खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणात केरकचरा, गवत झाले आहे. याचा फटका महानोर यांनाही बसला आहे. सध्या शहरात साथीच्या आजारांचा उद्रेक असून डासांचा प्रादुर्भाव वाढला असून उघड्या जागेवर कचर्‍याचे ढीग साचल्यामुळे अनेक परिसरात दुर्गंधीचे वातावरण आहे. कचरा उचलण्याबाबत संबंधित मालकांना वेळोवेळी सूचना देऊनही त्याचे पालन होत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. यामुळे प्रशासन लवकरच अशा खुल्या जागांवर बोजा चढविण्याच्या विचारात असल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली. शहरात २५० कंटेनर्स ठेवण्यात आले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे वार्डात व शहरात दैनंदिन साफसफाईची कामे सुरु आहेत, असा दावा करत शहरातील कचर्याच्या समस्येला नागरिकच जबाबदार असल्याचा ठपका महापालिकेने ठेवत हात झटकले आहेत. दुसरीकडे शहरातील आरोग्य विभागातर्फे घनकचरा प्रकल्प बंद पडल्यानंतर आता प्रशासनाने घनकचर्याचे विघटन करण्यासाठी इंदौर पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी दोन वर्षात शहरात कुठेही कचर्याचे प्रमाण दिसणार नाही यासाठी ३५ कोटी रुपये खर्चाचा नवीन डीपीआर तयार केला जात आहे. १६ रोजी होणार्या बैठकीत याबाबत प्रस्ताव सादर केला जाणार आहे. नवीन डीपीआरनुसार ६५ टक्के खर्च शासनाकडून मिळणार असून उर्वरित खर्च महापालिकेला करावयाचा आहे. जळगाव महापालिकेला गेल्या चार महिन्यांपासून नियमित आयुक्त नसल्याने महापालिकेचा प्रभारी कारभार जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या कडे आहे. त्यांची व महापालिकेतील प्रमुख सत्ताधारी असलेल्या सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची जवळीक ही सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण त्यांच्याकडे आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार असतांना अनेक वादग्रस्त विषयांना मंजूरी देण्यात आली मात्र या काळात मुलभुत प्रश्‍नांकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. जैन गटाने जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून फिल्डींग लावल्याने गेल्या चार महिन्यांपासून जळगाव महापालिकेला नियमित आयुक्त मिळू दिले जात नसल्याचीही चर्चा आता शहरात सुरु झाली आहे.

Post a Comment

Designed By Blogger