जळगावच्या केळी व कापसाचा डंका केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाजतो. तापी व गिरणा या दोन प्रमुख नद्यांच्या काठावरील जमीन सुपिक असली तरी गेल्या काही वर्षात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे या कसदार जमीनीला विविध किडरोगांचा ‘व्हायरस’ लागला आहे. कृषी विभागाच्या माहिनीनुसार व केंद्र शासनाच्या फर्टिलायझर मॉनिटरिंग सिस्टिमच्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्हा हा रासायनिक खतांचा वापर करणारा राज्यातील प्रथम तर देशातील दुसर्या क्रमांकावरील जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्यात दर वर्षी खरिप व रब्बी हंगामात सरासरी ५ लाख ३० हजार मेट्रीक टन खतांचा वापर होतो. रासायनिक खतांच्या अति वापरामुळे येथे जमिन नापिक होत चालली असून उत्पादन देखील कमी होऊ लागले आहे. पिकांवर विविध प्रकारांच्या किड रोगांचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे तणनाशकांचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.
जळगाव जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात खरीपाचा सरासरी ७ लाख ५० हजार तर रब्बीचा एक ते सव्वा लाख हेक्टर क्षेत्रफळावर पेरा होतो. खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र ४ लाख ५० हजार क्षेत्रफळावर कापसाचा पेरा होतो. यासाठी दरवर्षी सुमारे २० लाखापेक्षा बियाणे पाकिटांची गरज भासते. उवरित क्षेत्रफळावर ज्वारी बाजरी, मका, मूग, उडीद, तूर, तिळ, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमुग, ऊसाचा पेरा होतो. दोन्ही हंगामात सरासरी पाच लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त रासायनिक खतांचा वापर एकट्या जळगाव जिल्ह्यात होत असल्याचे चौधरी यांनी सांगितले. हा वापर महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचेही ते म्हणाले. तण नाशकाच्या वापरात नाशिक पाठोपाठ जळगाव जिल्ह्याचा क्रमांक लागतो. येथे कपाशीसह केळी, पपई, सोयाबीन व इतर पिकांमध्येही तणनाशकांचा वापर होऊ लागला आहे. जिल्ह्यात रावेर, जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा येथे तणनाशकांचा मोठा वापर होतो. जिल्ह्यात यंदा सुमारे एक लाख लिटर एवढ्या तणनाशकांचा वापर शेतकर्यांनी केला असून त्याची किंमत चार कोटींवर असल्याचे सांगण्यात आले. ज्वारी, बाजरी, ऊस, मका या एकदल पिकांमधील द्वीदल तण नष्ट करणारी तणनाशके वापरली जात आहेत, तर कपाशी, सोयाबीन, तूर आदी द्विदल पिकांमधील एकदल तण नष्ट करणारी तणनाशके वापरली जात आहेत.
Post a Comment